लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे
केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था वेश्वी उरण चे संस्थापक सन्माननीय श्री. राजु बळीराम मुबंईकर यांनी आज पर्यंत केलेल्या निःस्वार्थ कार्याला समाजात तोड नाही. सामाजिक, नैसर्गिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात आपल्या सेवेचा झेंडा रोवला आहे.2009-2022 या अल्पशा कालावधी मध्ये त्यांनी एकूण 57 पुरस्कार प्राप्त केले आहे. यामध्ये शासनाचे महाराष्ट्र भूषण, रायगड भूषण आणि शूरवीर पुरस्कार या मानाच्या पुरस्काराचे मानकरी ठरल्या बद्दल सर्वांना त्यांचा अभिमान वाटतो.
CON संस्थेचे सर्वेसर्वा असणारे आदरणीय राजु सर सतत वन आणि वन्यजीव संरक्षण व संवर्धन याबद्दल प्रयत्नशील असतात. आज पर्यत त्यांनी 10 हजार वृक्षारोपण केले,5000 साप, 4 भेकरे,3 मोर,1 बिबट्या आणि अनेक पक्षांना जीवनदान दिले.एवढेच नव्हे तर 115 च्या वर डोंगराला लागलेले वणवे विझवून आपल्या वनसंपदेचे संरक्षण केले, अशा कर्नाळा रत्न पुरस्कार प्राप्त मुंबईकर सरांचा नेहमीच आदर वाटतो.
“जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले….”अशा निराधार कुष्टरोगी माय बापानां शांतीवन नेरे येथील वृद्धाश्रमात अन्नधान्य, कपडे आणि मिठाई वाटून त्यांच्या ही जीवनात आनंद आणला.
राना वनात भटकंती करणारा आपल्या हक्काचा माणूस म्हणजे राजु दादा… आज प्रत्येक आदिवासी वाडीवरील लहान मोठी व्यक्ती राजु दादांना आपलाच देवदूत मानतात..त्याचे कारण ही तसेच आहे,दुर्गम भागात राहणाऱ्या जंगल च्या राजांना चालण्यासाठी सिमेंट चे रस्ते तयार केले, सोलर इनवर्टर बसवण्यात आले,156 च्या वर आदिवासी बांधवांची कॅटरॅक सर्जरी केली, वाडीवरील मराठी शाळा दुरुस्ती केल्या, कोरोना काळात 12 लाख रुपयांचे 13 आदिवासी वाडयावर अन्नधान्य, कपडे, खाऊ वाटप केले. एवढेच नव्हे तर 3 वर्षात 24 लाख रुपयांचे डाबर कपंनीचे रिअल फ्रेश ज्यूस, मध, शॅम्पू, ग्लुकोण्डी, ऑइल, हँडवॉश, एअर्फ्रेश्नर, गुलाबपाणी, कोरोना किट असे कित्येक वस्तू मोफत गरजू लोकांपर्यत पोहचवल्या.ज्यावेळी आपण सर्व घरात स्वतः ला जपत होतो, तेव्हा राजु सर मात्र स्वतः सह कुटुंबाची पर्वा न करता गोर गरिबांच्या पोटाची काळजी करत होते.. अशा समाजसेवकांना सलाम..
पैशासाठी काही पण करणाऱ्या स्वार्थी लोकांनी राजु मुंबईकर सरांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा. त्यांनी . स्वतः च्या खिशातून कित्येक समाजपयोगी कामे केली आहेत, त्यामध्ये स्टॅन्ड वर बसण्यासाठी बेंच, प्रियदर्शनी कमानी,बसथांबा,बोधचिन्हे,वाचनालय तसेच वेश्वी येथे गणेश घाट तयार केले..
ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी स्मारकांची साफसफाई करून रंगरंगोटी केली. एलिफन्टा बेट, कार्ला लेणी वर सुद्धा आपल्या सहकारी वर्गसोबत साफसफाई करून स्वच्छतेचे धडे समाजाला दिले.
उरण, पेण, पनवेल येथील आदिवासी बांधवाना मोफत 6500 च्या वर ईश्रम कार्ड काढून दिले.उरण पूर्व विभागाची संस्कृती जपणाऱ्या सुईन आणि धवलारीण यांना सन्मानित करून मानधन देण्याचे काम आपल्या कर्नाळा रत्न मुंबई कर सरांनी करून समाजात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.
1400च्या वर संपूर्ण महाराष्ट्रभर निसर्गाविषयी, स्त्री भ्रूण हत्येवर तसेच वाढत्या प्रदूषणावर निशुल्क व्याख्याने दिली.त्यासंदर्भातील स्लोगन स्टिकर, पथनाटये बसवून जनजागृती केली.
निसर्गावर अपार प्रेम करणाऱ्या सन्माननीय राजु सरांनी पाणी अडवा, पाणी जिरवा या मोहिमेअंतर्गत अनेक बंधारे बांधून वसुंधरा मातेचे थोडे ऋण फेडण्यामध्ये खारीचा वाटा उचलला.
देशाचे भवितव्य असणाऱ्या युवा पिढीला प्रोत्साहित करून त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी कर्नाळा पक्षी अभयारण्यात मॅरेथॉन स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा राबवतात.तसेच आपल्या जन्म भूमी आणि कर्मभूमी असलेल्या रायगड च्या खेळाडू साठी कला, क्रीडा महोत्सव भरवून त्यांना प्राधान्य दिले जाते.
‘रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान ‘मानणारे राजु सर यांनी रक्तदान शिबीरे लावून स्वतः 34 वेळा रक्तदान करून 4000 च्या वर रक्ताच्या बॉटल जमा केल्यात.त्यांच्या या दानशूर सेवा वृत्तीचा प्रत्येकाने अभिमान बाळगायला हवा.
केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे निर्माते श्री.राजेंद्र बळीराम मुंबईकर यांनी आपल्या जन्मभूमी असलेल्या वेश्वी गावामध्ये सुमारे 5 लाख रुपये खर्च करून रॉक ऍनिमल पार्क तयार केले. तेथे विविध प्रकारचे वृक्षारोपण करून पर्यावरणाच्या सौंदर्यात भर टाकली. तसेच काळानुसार नष्ट होत चाललेल्या पशु पक्षांची हुबेहूब चित्रे आणि पुतळे बसवण्यात आले. एक पर्यटन स्थळ निर्माण करण्या मागे त्यांचे मोलाचे योगदान आहे.
अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या महाराष्ट्र भूषण श्री. राजु मुंबईकर सर यांना मानाचा मुजरा. तुमच्या हातून सतत समाज सेवा घडत राहो आणि गोर गरीब लोकांना जगण्याचे बळ देत राहो आणि सदैव आपल्या सेवेमध्ये तत्परता यावी. दुसऱ्यांचे आरोग्य सांभाळता आपणास ही निरोगी आरोग्य व उदंड आयुष्य लाभो हीच साई चरणी प्रार्थना.
लेखक -विठ्ठल ममताबादे, उरण