लोलदर्शन👉 मोहन भारती
चंद्रपूर २१ जुलै – शहरातील मत्स्यविक्री केंद्रांवर (Fish Aquarium) चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे गप्पी मासे उपलब्ध करून देण्यात आले आहेत, डेंग्युचा संभाव्य प्रकोप टाळण्यासाठी नागरीकांनी गप्पी माश्यांचा वापर करण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांचा प्रसार या पावसाळ्यात होऊ नये या दृष्टीने महानगरपालिकेमार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहे. याअंतर्गत मनपाची प्राथमिक आरोग्य केंद्रे व शहरातील १५ मत्स्यविक्री केंद्रे (Fish Aquarium) येथे मनपामार्फत गप्पी मासे देण्यात आले आहेत तेव्हा या जागी संपर्क साधुन नागरीक गप्पी मासे प्राप्त करू शकतात.
गप्पी मासे सर्व प्रकारच्या डास अळ्यांचे भक्षण करतात त्यामुळे घरातील डासांची पैदास कमी होण्यास मदत होते.गप्पी माशांची मादी गप्पी मासे अंडी न घालता पिल्ले देतात त्यामुळे त्यांचा जगण्याचा दर जास्त असतो. एक मादी एका वेळेस मोठ्या प्रमाणात पिल्ले देत असल्याने दोन महिन्यातच पिलांची वाढ होऊन विकसित मासे तयार होतात.गप्पी माश्यांना टाकीमध्ये किंवा ज्याही पाण्याच्या साठ्यात ठेवाल तिकडे ऑक्सिजन युनिटची गरज नसते.
डेंग्युचा डास हा स्वच्छ व साचलेल्या पाण्यात आढळतो त्यामुळे आपल्या घराची तपासणी करा. कूलर,टायर, भंगारातील वस्तु,डबे यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. पाणी साठवण्याची भांडी कोरडी करा. डासअळी आढळल्यास अबेट द्रावण टाका. पाणी साठा मोठा असले तर त्यात गप्पी मासे टाका. गप्पी मासे पाण्यातील डासांची अंडी खाऊन टाकतात ज्याने डासांचा प्रादुर्भाव कमी होतो.
डेंगू हा जीवघेणा आजार आहे असल्याचे लक्षात ठेवणे गरजेचे आहे त्यामुळे डास वाढीला प्रतिबंध हाच सर्वात उत्तम उपाय आहे. डेंग्यु रोगासंदर्भात आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.