पोभुर्णा ग्रामीण रुग्णालय तातडीने उपकरणांसह सज्ज करा: आ.सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर

*दोन दिवसांत निविदा काढण्याच्या सूचना*

*आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी संवेदनशील व सतर्क राहण्याची व्यक्त केली अपेक्षा*

*दिरंगाई टाळण्यासाठी निविदा आणि खरेदी प्रक्रियेत योग्य बदल करण्याच्या सूचना*

 

मुंबई: राज्यात आरोग्य व्यवस्थैची जबाबदारी सांभाळणार्‍या अधिकाऱ्यांनी अत्यंत संवेदनशीलपणे आणि सतर्क राहून काम करण्याची आवश्यकता असून केवळ अडचणी न सांगता योग्य उपाय सुचवून सरकारशी सतत समन्वय ठेवून काम करणे अपेक्षित आहे, अशा भावना व्यक्त करत, आदिवासीबहुल पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयाचे शक्य तितक्या लवकर लोकार्पण करायचे आहे ; त्यादृष्टीने आवश्यक उपकरणांसह ते सज्ज करा सूचना माजी अर्थमंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांसह उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयाची इमारत बांधून तयार आहे, पण विविध वैद्यकीय उपकरणांंची उपलब्धता आणि पदभरती यामुळे रखडलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी आ.मुनगंटीवार यांनी मंत्रालयात आज बैठक घेतली. या बैठकीस राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास, सचिव श्रीमती नीलम केरकेट्टा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, हाफकीन च्या व्यवस्थापकीय संचालक सीमा व्यास, आयुक्त रामस्वामी, आयुक्त विरेंद्र सिंग, आरोग्य संचालक श्रीमती तायडे, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आ.सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले, ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणूस प्राथमिक आरोग्य केंद्र, सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय याकडे आशेने बघतो. सध्याच्या महापूराच्या वातावरणात, साथीचे रोग पसरण्याची भीती बघता ही यंत्रणा चोख आणि सजग असणे आवश्यक आहे. पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयासाठी सन २०१७ मंंजूर झालेली उपकरणे निधी उपलब्ध असताना देखील निविदा प्रक्रियेमुळे रखडतात याबद्दल त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. केंद्र सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या जेम (GEM) पोर्टलमध्ये उपकरण खरेदीसाठी नियमात व अटीत योग्य बदल अपेक्षित असतील तर सूचवा मी पुढाकार घेतो, पण निर्णयानंतर अंमलबजावणीत कसूर होता कामा नये असे निर्देश त्यांनी दिले.
प्रशासनाकडून समन्वय नसल्याने होत असलेली दिरंगाई आणि वर्तमान प्रक्रियेतील त्रुटी यावर पुनर्विचार करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारकडून लावण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेतील व निधी वाटपातील निर्बंध हे अत्यावश्यक आरोग्य व वैद्यकीय क्षेत्राला लागू करु नयेत अशी विनंती आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्य सचिव श्री मनुकुमार श्रीवास्तव यांना केली; याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनाही निवेदन करेन असे त्यांनी सांगितले.

*दोन दिवसांत निविदा काढणार*
दरम्यान याच बैठकीत आ. सुधीर मुनगंटीवार यांचा आग्रह गांभीर्यपूर्वक घेवून येत्या दोन दिवसांत पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयाकरिता आवश्यक उपकरणांची निविदा काढण्यात येईल असे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी यावेळी सांगितले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *