*चंद्रपूर, पोंभुर्णा बस स्थानकाच्या कामाचही घेतला आढावा*
लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर
मुंबई: चंद्रपूर जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकांच्या बांधकामास तात्काळ गती देवून मूल येथील बस स्थानक दोन महिन्यांत पूर्ण करा अशा स्पष्ट सूचना विधिमंडळ लोकलेखा समितीप्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. विधानभवन येथे यासंदर्भात आ.सुधीर मुनगंटीवार यांनी आढावा बैठक घेऊन चर्चा केली.
‘एस.टी.’ ही ग्रामीण प्रवाश्यांची रक्तवाहीनी आहे. प्रवासाकरीता सहज उपलब्ध होणारी व सोयीची ही व्यवस्था सर्वार्थाने बळकट व्हावी यासाठी सर्वांकश प्रयत्न करणार असून एस टी च्या प्रतिक्षेत असणाऱ्या प्रवाश्यांच्या सोयीकरीता असलेली बस स्थानके सर्व सोयी सुविधायुक्त व प्रशस्त असावित असे त्यांनी आवर्जून सांगितले.
स्वच्छ प्रसाधनगृह, उत्तम लाईट्स, पिण्यायोग्य पाणी आणि सुलभ बैठक व्यवस्था यांसह सर्व स्थानके उत्कृष्ठ व्हावीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मूल आगाराकरीता मंजूर करण्यात आलेल्या 150 बसेस अद्याप का मिळाल्या नाहीत, दिनांक २४ डिसेंबर,२०२१ रोजी विधानसभा अधिवेशनात यासंदर्भात आ.मुनगंटीवार यांनी अर्धातास चर्चा उपस्थित केली, त्यावेळी मंत्र्यांनी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, कार्यवाही न झाल्याने आ.मुनगंटीवार यांनी या बैठकीत नाराजी व्यक्त करुन, यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याची सूचना केली.
चंद्रपूर, पोंभुर्णा येथील बस स्थानक देखील सुसज्ज व्हावे, बांधकामास वेग आणा असेही निक्षून सांगितले. नागभीड बस स्थानकाच्या कामासंदर्भातदेखील त्यांनी माहिती घेतली.
या बैठकीस चंद्रपूरचे जिल्हाधिकारी श्री अजय गुल्हाने, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक (बांधकाम) श्री भूषण देसाई, मुख्य स्थापत्य अभियंता श्री वादिराज काळगी, परिवहन सहसचिव श्री होळकर, वित्त सहसचिव श्री विवेक दहिफळे, सारिका मेंढे आदी उपस्थित होते.