लोकदर्शन 👉
आपण नाटक बघतो …
आपण चित्रपट बघतो …
पण नाटक आणि चित्रपट एकत्र बघायचं असेल तर म्हणजे नाटकाचा चित्रपट बघायचा असेल तर ‘झॉलीवुड ‘ हा चित्रपट नक्की बघा…
गेल्या कित्येक वर्षांपासून मी झाड़ीपट्टी रंगभूमी बद्द्ल ऐकत, वाचत आले आहे. रंगभूमी प्रयोग परीक्षण मंडळ( सेन्सॉर बोर्ड ) यावर सदस्य म्हणून कार्य करत असतांना या रंगभूमीशी संबंधीत बऱ्याच संहिता परीक्षण करण्याची संधी मिळाली. मा. सुधीरभाउ मुनगंटीवार पर्यटन मंत्री असतांना त्यांनी ‘ झाड़ीपट्टी पर्यटन महोत्सव’आयोजीत केला होता, त्या निमित्ताने समिति सदस्य म्हणून काढलेल्या अभ्यासदौऱ्या दरम्यान या परिसरातील रंगभूमीशी संबंधीत बहुतांश निर्माता ,कलावंत, तंत्रद्य यांची भेट झाली आणि ही रंगभूमी समजण्यास मदत झाली होती. एक रंगकर्मी म्हणून कायम या रंगभूमी बद्द्ल आकर्षण,कुतूहल व आदर राहिलेला आहे…..
हा चित्रपट म्हणजे झाड़ीपट्टी रंगभूमीच्या नाटकांची निर्मिती, प्रसिद्धी, कलावंताची जुळवणूक, तालमी, त्याची प्रसिद्धी, नाटकाची तयारी (तंबू उभारणे व इतर तयारी ), प्रेक्षकांचा जल्लोष, झाड़ीपट्टीतील लोकांचे नाटक प्रेम, झाड़ीबोली ,नाटक गावात येतेय म्हटल्यावर निर्माण होणारं चैतन्य … प्रत्यक्ष नाटक सुरु असतांनाचे चित्रण तर खुप वास्तववादी आहे . अर्थात हा फक्त डॉक्यूमेंट्री चित्रपट नसल्यामुळे , एका कथेच्या माध्यमातून हा चित्रपट घडतो….. नाटक आणि नाटकासोबतची बाहेरची कथा अश्या दोन प्रसंगातून चित्रपट घडतो…. मला यातल्या नाटकाच्या भागातील चित्रण खुप आवडले नकळत आपण ते स्टेज , नांदी , lights , साऊंड , performance,प्रेक्षक जल्लोष यात हरवून जातो.
झाड़ीपट्टी रंगभूमीवर बऱ्याच वर्षापासून कार्यरत असणाऱ्या आसावरी नायडू यांची कथा आणि दिग्दर्शक तृषांत इंगळे यांचा अभ्यास व पटकथा यातून तयार झालेला ‘ झॉलीवुड ‘ एक छान अनुभव देतो.
‘झाड़ीपट्टी रंगभूमी ते झॉलीवुड’ ची ओळख डॉक्यूमेंट्री म्हणजे माहीतीपट द्वारे करण्यापेक्षा फिचरफिल्म मधून करुन देण्याचा व या फिल्म द्वारा दिग्दर्शनात पहिलं पाउल टाकणाऱ्या तृषांत इंगळे यांचं मला कौतुक वाटतय … अविनाश पोइनकर च्या युथॉलॉजी मधून वाचलेला व किरणदादा माने यांच्या शब्दात ‘ लै भन्नाट पोरग हाय ‘ या लेखातून जाणवलेला , तृषांत खरचं लै भन्नाट आहे.
खुप कष्ट पडलेत त्याला हा चित्रपट उभारतांना … 6 वर्षांची मेहनत आणि त्याचा प्रामाणिक सच्चेपणा चित्रपट बघतांना जाणवतो…. दिग्दर्शनाची वेगळी नजर त्याला लाभलीय हे चित्रपट बघतांना जाणवतं.
आपल्या भागातील 130 कलावंतांना मोठ्या पडद्यावर त्याने आणलेय , आमची निशा धोगड़े खुप गोड दिसलीय आणि सर्व कलावतांनी चोख काम केलय.
चित्रपटाचा शेवट खुप सुन्न करतो ….. शो मस्ट गो ऑन चा सन्देश देतो …
मधे मी ‘पिकासो’चित्रपट बघितला त्यातून दशावतार हा लोकनाट्य प्रकार बघतांना मला वाटलं होतं की असे चित्रपट बनले पाहिजे. प्रादेशिक लोककला, नाट्यकला यांना चित्रपट माध्यमातून राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय अवकाश मिळतं. झाड़ीपट्टी रंगभूमीची न्यारी दुनिया या चित्रपटाच्या निमित्ताने सर्वांच्या समोर आली आहे … याचे खुप खुप स्वागत आणि निर्माता अमित मासुरकर , तृषांत इंगळे , आसावरी नायडू आणि सर्व टिमचे मनापासून अभिनंदन …
‘असे कित्येक निर्माते येतीन , प्रेस बंद पडतींन , कलाकार येतीन जातींन पण झाड़ीपट्टीची तिकीट विक्री सुरुच राहीन ‘ या डायलॉग द्वारे, झाड़ीपट्टीच्या प्रेक्षकांच्या नाट्यप्रेमावर विश्वास दाखविणाऱ्या तृषांतला पुढील वाटचालीसाठी खुप खुप आशीर्वाद आणि शुभेच्छा
*****
डॉ जयश्री कापसे गावंडे , चंद्रपुर