.
लोकदर्शन 👉 राहुल खरात
काल मंगळवार दि.७ जून२०२२,वेळ संध्याकाळी ७ वाजता, स्थळ:- अभ्यागत हॉल शासकीय विश्रामगृह कराड ..निमित्त होते रामोशी समाजाचे नेते आनंदराव जाधव उर्फ नाना यांचा वाढदिवस….. Un
या वाढदिवसाला पाटण तालुका, कराड तालुका ,कडेगाव तालुका, खानापूर तालुका ,पलुस तालुका कराड शहर अशा विविध ठिकाणाहून जमलेल्या वेगवेगळ्या सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आघाडीवर काम करणाऱ्या संघटनांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावलेली…कसलीही घाई नाही, गडबड नाही, गोंधळ नाही, नशा पानाचा प्रश्नच नाही, जेवणाचा ठरलेला बेत नाही, पै पावण्याचा संबंध नाही पण विचारांची पक्की बैठक असलेला, समाज परिवर्तनाचा ध्यास घेतलेला असा जोडलेला समाजबांधव दूरवरून एकत्र आलेला मला दिसला.अन अशा माणसांचा गोतावळा मला समाज बदलासाठी आश्वासक वाटला.
खरं तर गेली तीस,बत्तीस वर्षे विद्यार्थिदशेपासून समाज परिवर्तनाच्या चळवळीत सहभागी होताना जी अनेक माणसं मला सहप्रवासात भेटली. जी वेगवेगळ्या बैठकात दिसली, कार्यक्रमात वावरली, मोर्चात घोषणा देऊन लोकांचा आवाज बनली,आंदोलनात वीरश्रीने पेटली आणि तळागाळातील जनतेच्या सुखदुःखात वेळ काळ न बघता सतत धावत राहिली अशा मोजक्या माणसा पैकीच मला भावलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे आनंदराव जाधव नाना…….
नानांच्या वाढदिवसानिमित्त नानांची प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा द्यायच्या आणि मोठ्या माणसाला भेटल्याचा आनंद
घ्यायचा हे ठरवून काल सायंकाळी आम्ही आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे पदाधिकारी मी,हिम्मतराव मलमे, महेश मदने, पी एस पाटील आदींनी कराड गाठले.शासकीय विश्रामगृह कराड येथे प्रत्यक्ष
नानांना भेटून वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या….
. शांत, संयमी ,अभ्यासू ,निर्व्यसनी, भारदार व्यक्तिमत्वाचे नाना सगळ्यांना भावतात, आपलेसे वाटतात. तसं वाटणं खरं तर स्वाभाविकच आहे. कारण परिस्थितीच्या मुशीतून घडलेले ते एक चांगलं व्यक्तिमत्त्व आहे.व्यक्तीमत्वा सारखं लेणं माणसाला एकदाच मिळतं पण ते सार्थ करणं माणसाच्या प्रयत्नावर अवलंबून असतं.हा विचार नानांच्या डोक्यात कायम दिसतो. घरचं वळण, वातावरण ,वाट्याला येणारे गाव, शाळा, मित्र, हातून घडणारा व्यासंग, लावून घेतलेल्या सवयी ,उपजीविकेचे क्षेत्र, समाज भर आढळणारे सामाजिक व सांस्कृतिक वातावरण यातूनच मी घडत गेलो अन गेल्या 35 वर्षापासून समाज चळवळीत काम करत आलो हे सांगताना नानांना मोठा अभिमान वाटतो. परिस्थितीच्या मुशीतून आकाराला आलेलं नाना सारखं व्यक्तिमत्व समाजातल्या विघातक बाबी कोणत्या अन विधायक बाबी कोणत्या याच सतत प्रबोधन करून चांगल्या परिस्थितीच्या रचनाकारांच्या मांदियाळीतील भाग झालेत याचा आम्हाला ही अभिमान वाटतो.समाज बदलाचा ध्यास घेतलेले नाना असे म्हणतात की ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास होत नाही म्हणूनच मी रात्री-अपरात्री केव्हाही आणि कुठेही संकटात सापडलेल्या माणसाच्या हाकेला वेळ काळ न बघता ‘ओ’देतो अन धावून जातो. यातच मला मोठा आनंद मिळतो. हितसंबंधांच्या गुंत्यात विचारशक्तीला गळफास लागतो असं म्हणणाऱ्या नानांनी कोणत्याही राजकीय पक्षाची झूल जरी आपल्या अंगावर घेतलेली दिसत नसली तरी राजकीय पक्ष व संघटना शिवाय समाज परिवर्तन शक्य नाही हा मंत्र नाना भेटेल त्या व्यक्तीला देतात.शिवाय चांगलं काम करा ,चांगलं वागा ,निर्व्यसनी रहा, माणसांना आपलं म्हणा,संघटनेत काम करा असं नेहमी चारचौघात सांगताना दिसून येतात. अशा एका भल्यामोठ्या विचारशील लोकनेत्यास वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देताना मनाला खूप आनंद वाटला. “व्यक्ती तितक्या प्रकृती”हा निसर्गाचा चमत्कार लक्षात घेता आपली मतं भिन्न असली तरी मैत्रीत अंतर पडता कामा नये असं ठरवून माणसात जाणारा, माणसात वावरणारा ,माणसांना आपलंसं करणारा मैत्री बाज माणूस आनंदराव जाधव उर्फ नाना यांना निरामय आरोग्य लाभो ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा🌹 सागर जाधव, कृष्णा मदने, संदीप मदने, भंडलकर सर बेलवडेचे जाधव सर, पत्रकार विश्वास मोहिते ,अशोक मदने, दिपक पाटील सह महिला भगिनी आदी चांगल्या गुणी माणसांच्या उपस्थितीत नानांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होताना एका लोकगीताचे बोल मला वारंवार आठवत होते.ते म्हणजे *जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर!!!*!
मारुती शिरतोडे
राज्य निमंत्रक- आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र ९०९६२३९८७८