लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे
उरण दि ५ जून उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोडमधील भेंडखळ, बोकडविरा, फुंडे, डोंगरी, पाणजे, पागोटे, नवघर, धुतुम, चाणजे, मुळेखंड गावातील प्रकल्पग्रस्तांचा मेळावा वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य कॉलेज फुंडे येथे दि. ०५ जून २०२२ रोजी संपन्न झाला.
ऍडव्होकेट कॉम्रेड धनंजय म्हात्रे यांनी ऍडव्होकेट कॉम्रेड विजय पाटील यांच्या नावाची सूचना कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदासाठी केली. कॉ.रमेश ठाकूर यांनी ह्या मेळाव्याच्या आयोजनाबाबतची भूमिका मांडली. द्रोणागिरी परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या उर्वरीत भूखंडाच्या वाटपाला ३१ वर्षांचा विलंब झाल्याचे सांगितले. संघटना म्हणून केलेला पत्रव्यवहार व सिडको प्रशासनाबरोबरच्या झालेल्या चर्चेबाबतची माहिती दिली.
या चर्चेत कॉ.मधुकर म्हात्रे, कॉ.अशोक म्हात्रे (मुळेखंड), कैलास क. पाटील, नरेश ए. म्हात्रे (भेंडखळ), कृष्णकुमार पाटील (बोकडविरा), ऍडव्होकेट सागर कडू – माजी सभापती पं.स.उरण इत्यादींनी सहभाग घेऊन आपल्या अमूल्य सुचना मांडल्या.
ऍडव्होकेट कॉम्रेड विजय पाटील यांनी १२.५% भूखंड वाटपाबाबत तसेच गरजेपोटी बांधलेल्या घराबाबतची मांडणी केली व याबाबत सिडको, राज्यशासन यांनी प्रसिद्ध केलेली परिपत्रके, शासन निर्णय या विषयी माहिती दिली.
१२.५% वाटपाची पूर्तता किती वेळात करणार हे सिडको प्रशासनाकडून कळणे गरजेचे असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. तसेच याबाबत आपण न्यायालयाची प्रक्रिया सुरू करण्याची गरज विषद केली. गरजेपोटी घरांच्या प्रश्नाबाबत आपण संघटना म्हणून पत्रव्यवहार करणे आवश्यक आहे. तसेच सर्व ग्रामपंचायतींनी पत्रव्यवहार करून गरजेपोटी घरे नियमित करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मांडले. गरजेपोटीची घरे नियमित करून त्यांची सनद देण्यात यावी व कोणत्याही परीस्थीतीत ही घरे भाडेपट्टयावर नकोत असे त्यांनी सांगितले. पुढील काळात लढ्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी गोविंद घरत, सुरेश ठाकूर, जनार्दन म्हात्रे, के.बी. ठाकूर, शांताराम कडू, गजानन पाटील, कॉ.लक्ष्मण पाटील, रतन पाटील, हसुराम भोईर इ. कार्यकर्ते उपस्थित होते. चांगल्या उपस्थितीत हा मेळावा प्रकल्पग्रस्तांनी यशस्वी केला.