विदर्भात ७ मोठे उद्योग उभारणार : डॉ. राऊत

By : Shankar Tadas
लोकदर्शन👉
*डाव्होस बैठकीत ३ हजार ५८७ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार

* ४ हजार ८०० रोजगार उपलब्ध होणार

नागपूर : स्वीत्झर्लंडमधील डाव्होस येथे पार पडलेल्या “वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेत विदर्भात सुमारे ३ हजार ५८७ कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असलेले ७ मोठे उद्योग उभारण्यासंदर्भात सामंजस्य करार झाले असून या उद्योगांची उभारणी झाल्यास ४ हजार ८०० रोजगार उपलब्ध होतील, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. हरित व नवीनीकरण ऊर्जा क्षेत्रात पुढच्या ७ वर्षांसाठी ५० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा खात्रीशीर करार झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या संयुक्त समन्वय समितीतर्फे आयोजित बैठकीत पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी आर. विमला, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सुर्यवंशी, व्हीआयएचे अध्यक्ष सुरेश राठी, बुटीबोरी इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल, एमआयएचे अध्यक्ष सी. जी. शेगांवकर, केआयएचे अध्यक्ष अमर मोहिते, व्हीआयएचे उपाध्यक्ष आर. बी. गोएनका, महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी,मुख्य अभियंता दिलीप दोडके, प्रादेशिक संचालक महाऊर्जा वैभव पाथोडे आदी उपस्थित होते.
डॉ. राऊत म्हणाले, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत सामंजस्य करार होतात, पण प्रत्यक्षात उद्योग उभारले जात नाहीत, अशी ओरड केली जाते. मात्र, यंदाच्या परिषदेत विदर्भासाठी खूप चांगल्या गोष्टी खेचून आणल्या असून मोठमोठ्या ७ उद्योग कंपन्यांनी विदर्भात गुंतवणूक करण्याविषयी सामंजस्य करार केले आहेत. नुसते करारच झाले नाही तर त्याबाबत प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी सकारात्मक पावले उचलण्यात आली आहेत.. “इंडोरामा” ही कंपनी वस्त्रोद्योग क्षेत्रात बुटीबोरी येथे ६०० कोटींचा नवा उद्योग प्रकल्प उभारणार आहे. त्यातून १५०० कुशल मनुष्यबळासाठी रोजगार निर्मिती होणार आहे. “जीआर कृष्णा फेरो अलॉईज लिमिटेड” ही दुसरी कंपनी पोलाद क्षेत्रात मूल, चंद्रपूरमध्ये ७४० कोटींचा उद्योग उभारणार असून तिथे ७०० कामगारांना रोजगार मिळणार आहे. “कलरशाईन इंडिया लिमिटेड ” या तिसऱ्या कंपनीशी ५१० कोटी रुपयांच्या उमरेड येथील प्रस्तावित पोलाद प्रकल्पाबाबत सामंजस्य करार झाला आहे. या प्रकल्पातून ५०० रोजगार निर्माण होतील. “कार्निव्हल इंडस्ट्रीज” ही चौथी कंपनी इथेनॉल इंधनाच्या क्षेत्रात मूल चंद्रपूर येथे २०७ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून तिथे ५०० कामगारांना रोजगार मिळेल. “गोयल प्रोटीन्स लिमिटेड” या पाचव्या कंपनीत ऑईल निर्मितीमध्ये बुटीबोरी येथे ३८० कोटींची गुंतवणूक केली जाणार असून या उद्योगासाठी ५३४ मनुष्यबळ लागणार आहे. “अँप्रोस इंडस्ट्रीज लिमिटेड” कंपनीचा १५० कोटींचा सहावा वस्त्रोद्योग प्रकल्प अमरावतीमध्ये उभारला जाणार असून त्याठिकाणी ६०० जणांची रोजगार क्षमता निर्माण होणार आहे. तडाली, चंद्रपूर येथे इथेनॉल इंधनाचा सुमारे १ हजार कोटी गुंतवणुकीचा सातवा प्रकल्प होणार असून तिथे ६०० कामगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
याशिवाय हरित व नवीनीकरण ऊर्जा क्षेत्रात सुमारे ५० हजार कोटी रुपयांची खात्रीशीर गुंतवणूक होणार असून संबंधित कंपनीकडून त्याबाबतचा प्रस्ताव मागविण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. मॅग्नेटिक महाराष्ट्र उपक्रम ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये राबविण्यात येईल. लॉजिस्टीक क्षेत्रात रिलायन्स कंपनीचे पार्क आले आहे. अदानी कंपनीने एक पार्क उभारला असून दुसऱ्या पार्कसाठी जागेचा शोध सुरु आहे. भाजीपाल्याच्या व्यापारासाठी रेल्वेच्या बोगीमध्ये “कोल्ड स्टोरेज” व्यवस्था केली जाणार असून पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी गोसीखुर्द धरणाचे पाणी बुलडाणा जिल्ह्यापर्यंत नेण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. उप्पलवाडी या जुन्या औद्योगिक परिसरात रस्ते आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एनएमआरडीएमार्फत लॉजिस्टिक हबचे काम सुरु असून १४९ कोटींच्या निविदा काढण्यात आल्या असल्याची माहिती नासुप्रचे सभापती मनोज सूर्यवंशी यांनी दिली. ५५ किलोमीटरचे रस्ते, ७०० कोटींच्या सिव्हर लाईनची निविदा कामे सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूरला उदयॊग क्षेत्रात “हॅपनिंग हब” बनविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे जिल्हाधिकारी आर.विमला यांनी सांगितले.
प्रास्ताविकातून सुरेश राठी यांनी विस्तृत भूमिका मांडली. आर. बी. गोयंका यांनी उद्योग क्षेत्राला होणारा वीजपुरवठा आणि सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात अडचणींची माहिती ऊर्जामंत्र्यांना दिली. गौरव सारडा यांनी सूत्रसंचालन तर आभारप्रदर्शन डॉ. सुहास बुद्धे यांनी केले.

चौकट…

ऊर्जामंत्र्यांनी कथन केले
“डाव्होस” बैठकीचे अनुभव

विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या विंनतीवरून ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नुकत्याच झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेविषयीची रंजक माहिती उपस्थितांना कथन केली. डाव्होस परिषदेत जगभरातील नामवंत उदयॊजक सहभागी होतात. त्यांच्यामध्ये होणाऱ्या भेटीत विचार व तंत्रज्ञानाचे आदानप्रदान होते. मोठमोठ्या कंपन्याचे चेअरमन, सीईओ बैठकीला हजर राहतात. अनेक राष्ट्रांचे पंतप्रधान, भारतातील राज्यांचे मुख्यमंत्री तिथे हजर राहतात. आपआपल्या राज्यांमध्ये उद्योग खेचून नेण्यासाठी त्यांच्यात चढाओढ सुरु असते. कोट्यवधींच्या गुंतवणुकींचे सामंजस्य करार केले जातात, अशी माहिती ऊर्जामंत्र्यांनी यावेळी दिली. पुढच्या वेळेला डोव्होस बैठकीत महाराष्ट्र, विदर्भातील खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावून आपली संस्कृती विदेशात पोहोचविण्याचा संकल्प डॉ. राऊत यांनी बोलून दाखविला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *