*__________________________*
लोकदर्शन 👉 राहुल खरात दि. २७ मे
ओबीसींचे आरक्षण कायम राहावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार साहेब यांनी ओबीसींच्या जातीय जनगणनेची केलेली मागणी रास्त आहे. या मागणीने भाजप आणि संघ परिवाराचा बुरखा फाटला असून ओबीसी आरक्षणाच्या मध्ये खडे घालणाऱ्या मंडळींना चपराक बसली आहे . असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलच्या वतीने बुधवारी राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशन घेऊन विविध ठराव करण्यात आले. या ठरावांच्या माध्यमातून ओबीसींच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राज्यकर्त्यांना एक रस्ता दाखविण्याची भूमिका ओबीसी समाजातील कार्यकर्ते यांनी घेतली आहे असे पवार साहेब म्हणाले.
महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे अधिकार वापरून समाजाला न्याय दिला. समाजातील असमानता दूर करण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी मागासवर्गीयांना ५० टक्के आरक्षण लागू केले. हा निर्णय घेत असताना विरोधाला त्यांनी जुमानले नाही. अशी आठवण करुन देत पवार साहेबांनी, आजही आपण हेच प्रश्न मांडत आहोत. कारण स्वातंत्र्याला इतकी वर्ष होऊनही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याची वाच्यता घटनेत केली होती ते समान पातळी गाठण्याचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. यासाठी समाजात जी कमतरता आहे ती घालवली पाहिजे. घटनेने एस.सी., एस.टी. समाजाला काही सवलती देऊ केल्या. ज्याचा त्यांना फायदा झाला. तशा सवलतींचा आधार ओबीसी समाजाला देखील देण्याची गरज आहे. जोपर्यंत एखादा समाज सन्मानाने उभा राहत नाही, तोपर्यंत सवलती देण्याची गरज आहे.
हे करण्यासाठी ओबीसींची नेमकी लोकसंख्या किती, असा प्रश्न काही लोक उपस्थित करतात. खरंच या समाजाची लोकसंख्या मोठी आहे का हे तपासण्याची गरज आहे. त्यामुळे ओबीसींची जातिनिहाय जनगणना करायला हवी, असा जो ठराव बुधवारच्या अधिवेशनात करण्यात आला आहे, तो अतिशय योग्य आहे, असे पवार साहेबांनी अनुमोदन दिले आहे. एकदाची जातिनिहाय जनगणना करूनच टाका म्हणजे या देशाला नेमकी संख्या कळेल. मग त्या संख्येप्रमाणे न्यायाची वाटणी करा. इथे कुणी फुकट काही मागत नाही. जो न्यायाचा अधिकार आहे, तो मिळायलाच हवा. यासाठी जातिनिहाय जनगणना केल्याशिवाय गत्यंतर नाही. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न काल पुन्हा उपस्थित केला. ते भाजपचे सहयोगी आहेत, तरीही त्यांनी जातिनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडला. पण केंद्रातील सध्याचे सरकार असेपर्यंत हे होईल असे मला वाटत नाही असे स्पष्टपणे पवार साहेबांनी जाहीर केले आहे. कारण ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, त्या संघ भाजपची मानसिकताच वेगळी आहे. भैय्याजी जोशी नामक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाहक आहेत. त्यांनी एके ठिकाणी सांगितले की, याप्रकारची जनगणना अजिबात मंजूर नाही. अशी जनगणना झाल्यास समाजात चुकीचे वातावरण निर्माण होईल. पण मला विचारायचे आहे की, सत्य समोर आले तर चुकीचे वातावरण कसे होईल? असा सवाल पवार साहेबांनी केला आहे. जातींच्या जनगणनेमुळे जर समाजात अस्वस्थता येत असेल तर त्यावर जे काही करावे लागणार असेल ते करण्याची आमची तयारी आहे. त्याशिवाय न्याय मिळणार नाही. यासाठी जागृती करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल. आमची भूमिका अतिशय स्पष्ट असून जे करावे लागेल, ते करायचे आमची तयारी आहे अशी ठाम ग्वाही पवार साहेबांनी दिली आहे.
श्री. छगन भुजबळ यांनी सांगितल्याप्रमाणे कोर्टाने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याची उत्तरे कशी द्यायची याचा विचार सुरू आहे. त्यासंबंधी आकडेवारी आणि डाटा गोळा करण्याचे काम गतीने सुरू आहे. आज भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री सांगतात की, महाविकास आघाडीने धोका दिला. पण मागे पाच वर्षे राज्यात आणि केंद्रात तुमच्या हातात सत्ता असताना तुम्ही झोपला होतात का ? त्यामुळे तुम्हाला आमच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. आज भाजपचे लोक काहीही बोलत असले तरी त्यांच्या मनातली मळमळ स्पष्ट दिसत आहे. या लोकांकडून ओबीसींना न्याय मिळेल, याची कोणतीही शक्यता नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राज्य सरकारचा घटक म्हणून स्पष्ट भूमिका घेत आहे की, आगामी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लावूनच निवडणुकांना सामोरे जाईल. ओबीसींना त्यांचे प्रतिनिधित्व देऊनच पक्ष सत्तेचा कारभार चालवेल. तसेच हे फक्त महाराष्ट्रापुरते करून चालणार नाही, तर संबंध देशात ओबीसींना न्याय देण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल, अशी भूमिका पवार साहेबांनी या राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशनात मांडली.
ओबीसी समाजाने पवार साहेबांची ही भूमिका समजून घेऊन आपल्या प्रत्येक जाती घटकांना महाराष्ट्र सरकारचे म्हणणे समजून सांगावे, ओबीसींचे आरक्षण वाटेला लावण्यामागे ज्यांचा डाव आहे त्या संघ आणि भाजप ला दलित, आदिवासी, ओबीसी अशा सर्वांच्याच आरक्षणाला डावलायचे आहे. त्यांचा कावा ओबीसी समाजाने समजून घ्यावा आणि त्यांच्या भूमिकेला साथ द्यावी असे आवाहन सादिक खाटीक यांनी केले आहे .
देशातल्या भाजप विरोधी सर्वच राजकीय पक्षांनी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या ओबीसी जनगणने संदर्भातील भूमिकेचे जोरदार समर्थन करावे आणि या प्रश्नावर पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी मोठा लढा उभारला जावा अशी करोडो ओबीसींची अपेक्षा राहणार असल्याचे ही सादिक खाटीक यांनी स्पष्ट केले आहे .