लोकदर्शन सांगली👉राहुल खरात
दि. १३ मे २०२२
वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्या शिष्टमंडळाने आज समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सांगली यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे,
माता रमाई आंबेडकर घरकुल आवास योजने मार्फत मागासवर्गीय समाजातील कुटुंबांना घर बांधण्यासाठी निधी दिला जातो. सद्यस्थितीत ग्रामीण भागातील व्यक्तीला १.४० लक्ष रुपये व शहरी भागातील व्यक्तीला २.५० लक्ष रुपये इतका निधी दिला जातो. परंतु सध्याच्या महागाईच्या काळात घर बांधण्यासाठी हा निधी तोकडा पडत आहे. बांधकाम करण्यासाठी लागणारे साहित्य विट,सिमेंट,स्टिल व इतर इमारत बांधण्यासाठी लागणारे साहित्यांच्या किंमतीत दिवसेदिवस वाढ होत आहे त्यामुळे शासनाने आखून दिलेल्या रक्कमेत सद्या वाढत्या महागाईत संडास व बाथरूम बांधणे ही शक्य होत नाही. त्यामुळे मागासवर्गीय समाजातील कुटुंबांना बांधणे जिकरीचे झाले आहे. लाखो मागासवर्गीय कुटुंबांना आजही हक्काचे पक्के घर नाही. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किंमती त्यामुळे जिवन जगणे मुश्किल झाले आहे त्यात अशी लाखो मागासवर्गीय कुटुंबे आपल्या हक्काची पक्की घरे बांधणार कशी? तरी आदी प्रश्नांचा विचार करून माता रमाई आंबेडकर घरकुल आवास योजनेच्या निधीत वाढ करून मागासवर्गीय समाजातील कुटुंबांना घर बांधण्यासाठी ग्रामीण भागात ५ लक्ष रुपये व शहरी भागात १० लक्ष रुपयांची तरतुद करावी व लाखो कुटुंबांना हक्काचे पक्के घर मिळवून द्यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. यावेळी सांगली जिल्हा महासचिव (दक्षिण) उमर फारूक ककमरी, जिल्हा संघटक संजय कांबळे, ऋषिकेश माने आदी उपस्थित होते.