लोकदर्शन 👉 राहुल खरात
*●संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील सहभागी शाहीर नामदेव सोळवंडे यांचा केला सत्कार*
*●आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड चा अनोखा उपक्रम*
१ मे २०२२ ला महाराष्ट्र राज्याचा ६२ वा स्थापना दिवस होता.आपल्या महाराष्ट्राची निर्मिती १मे १९६०ला झाली ती लोकलढ्यातून.१९५६ ते १९६० हा चार वर्षाचा काळ म्हणजे संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या लढ्यातील मंतरलेला काळ होता.
मुंबईचा गिरणीकामगार हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेला.तर राज्याच्या विविध भागातून लोकांना रस्त्यावर आणण्यासाठी शाहीरांचा डफ खणाणत होता.१०६ हुतात्म्यांच्या रक्ताने न्हाऊन निघालेला संयुक्त महाराष्ट्र चा लढा १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन संपला.क्रांतिसिंह नाना पाटील,जी.डी.लाड,
नागनाथ आण्णा,एस.एम.जोशी,प्र.के.अत्रे,आण्णाभाऊ साठे,अमर शेख,द.ना.गवाणकर,कॉ.श्रीपाद अमृत डांगे,गोदावरी परुळेकर,अहिल्या रांगणे अशा शेकडो बिनीच्या शिलेदारांनी लढा टोकाला नेला. या संयक्त महाराष्ट्र लढ्यातील घटनांवर आधारित माहिती आणि जागतिक कामगार दिनाची माहिती देणारे चित्ररूप व वृत्तपत्रीय कात्रणे यांचे प्रदर्शन शिवाई प्रबोधन वाचनालय भारतीनगर पलूस या ठिकाणी महाराष्ट्र दिनानिमित्त भरवण्यात आले होते.आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड चे राज्य निमंत्रक मारुती शिरतोडे यांनी संकलित केलेल्या माहितीवर आधारीत या प्रदर्शनाचे उद्घाटन संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील शाहीर नामदेव सोळवंडे (वय ९०) यांचे हस्ते संपन्न झाले.आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र च्या वतीने या वयोवृद्ध शाहिराचा सत्कार करणेत आला.तसेच जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून किर्लोस्कर इबारा पंपस लिमिटेड किर्लोस्करवाडी येथील आदर्श व गुणवंत कामगार श्री संगाप्पा बसगोंडा करोले यांचा ही सत्कार करणेत आला.सदर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष सुनिल दलवाई यांनी केले तर आभार राज्य सरचिटणीस हिम्मतराव मलमे यांनी मानले.यावेळी मारुती शिरतोडे, पत्रकार दिपक पवार ,देवकुमार दुपटे,सौ.कल्पना मलमे,ऋतुराज शिरतोडे,वरदराज मलमे, आर्या मलमे,धनश्री चव्हाण,बाबासाहेब सोळवंडे,महेश मदने सह स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी उपस्थित होते.या प्रदर्शनाचा दोन दिवस लाभ स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी घेतला.