–
ज्ञानेश वाकुडकर
•••
महाराष्ट्राचे नेते कोण, असा प्रश्न जर कुणी विचारला तर ? किंवा महाराष्ट्रात कोण कोण नेते आहेत ? या प्रश्नाचे आपण काय उत्तर देऊ ? आपापल्या आवडीनुसार ही यादी वेगवेगळी असेल. मोठीही असेल. छोटे छोटे स्थानिक नेते म्हणता येतील अशी बरीच नावं आपल्यासमोर येतील.
पण महाराष्ट्राचे नेते किँवा महाराष्ट्रातील नेते असा विचार केल्यास शरद पवार हे सर्वात मोठे नेते आहेत, हे मान्य करावेच लागेल. त्यांचे राजकारण कुणाला पटो, न पटो, तो वेगळा मुद्दा झाला.. पण स्वतःच्या भरवशावर पन्नास – साठ आमदार आणि अर्धा डझन खासदार निवडून आणण्याची ताकद त्यांच्यात आहे, याबद्दल वाद नाही. महाराष्ट्राचे दुसऱ्या नंबरचे नेते म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव घ्यावे लागेल. स्वतःच्या भरवश्यावर किती खासदार निवडून आणतील हे आज सांगता येत नसले, तरी ५० – ६० आमदार मात्र ते नक्कीच निवडून आणू शकतात. आणले आहेत. सांसदीय प्रणालीमध्ये स्वतःची वजनदार संख्या दाखविण्याची क्षमता असलेले हे दोनच नेते सध्या महाराष्ट्रात आहेत. हे दोन नेते आणि त्यांचे पक्ष जर मनापासून एकत्र आले, त्यांचे स्थानीय वतनदार, सरंजामदार लोकाभिमुख झाले आणि चांगल्या लोकांना जोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तर २०२४ च्या निवडणुकीत या दोनच पक्षांना निर्विवाद बहुमत मिळू शकेल, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. कारण १००/१२५ आमदारांची आताच त्यांची ताकद आहे. शिवाय शिवसेना आता बऱ्यापैकी माणसाळलेली आहे, हेही आपल्याला लक्षात घ्यावे लागेल.
संसदीय संख्येच्या दृष्टीने (आमदार/खासदारांची संख्या) या दोन नेत्यांच्या जवळपास पोहचू शकणारा अन्य नेता महाराष्ट्रात सध्या तरी अस्तित्वात नाही. यात १०५ आमदार पाठीशी असलेल्या फडणवीस यांचे नाव न घेतल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना राग येईल. पण इलाज नाही. त्यांच्यामागे १०५ आमदारांचा आकडा दिसत असला, तरीही फडणविस महाराष्ट्राचे नेते नाहीत. कारण ते सारे आमदार भाजपचे आहेत, फडणवीस यांचे नाहीत. किंवा समजा काही कारणामुळे फडणवीस यांना बाजूला केलं, तर त्यांच्यामागे ५ आमदार तरी जातील का ? किंवा स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची हिम्मत त्यांच्यात आहे का ? आणि हिम्मत केलीच तर पाच – सात आमदार तरी निवडून आणू शकतील का ? याबतीत भाजपा मधलीच तीन मोठी उदाहरणं पाहता येतील. एक – उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह, दोन – मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती आणि तीन – कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येदी युरप्पा ! हे तिन्ही भाजपा नेते फडणवीस यांच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे होते. कल्याणसिंह बाबरी प्रकरणानंतर बाजपेयी, अडवाणी यांच्या नंतरचे तिसऱ्या नंबरचे राष्ट्रीय नेते वाटायला लागले होते. पण स्वतःचा वेगळा पक्ष काढल्यावर काय हाल झालेत ? फायर ब्रँड साध्वी म्हणून उमा भारती ह्या राष्ट्रीय चेहरा होत्या. पण बाहेर गेल्यावर त्यांची आणि त्यांच्या पक्षाची अवस्था किती केविलवाणी झाली ? येदी युरप्पा देखील लिंगायत समाजाचे मोठे नेते आहेत. कर्नाटकातील साधारण १० टक्के मते त्यांच्या सोबत असतील. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस कोठे बसतात?
फडणवीस सोडाच पण खुद्द गडकरी देखील स्वयंभू नेत्याच्या कसोटीला सध्यातरी उतरू शकतील असे दिसत नाहीत. मोदी – शहा यांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहण्याची जी हिम्मत योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात दाखविली, ती गडकरींना अद्याप दाखविता आली नाही. अर्थात गडकरींची एकूण प्रतिमा नकीच मोठी आहे, सकारात्मक आहे. पण समजा त्यांनी स्वतःचा पक्ष काढला तर..? डझनभर तरी आमदार निवडून आणू शकतील का ? थोडक्यात स्वयंभू लोकनेता या कसोटीला उतरेल असा एकही नेता महाराष्ट्रात भाजपाकडे नाही. तशी त्यांच्याकडे नेहमीच बोंब असते. म्हणून तर त्यांना उधार उसनवार करून, बाहेरच्यांना बोलावून नवरदेव करावे लागते. त्यांच्या वरातीत नाचावे लागते.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन नेत्यानंतर तिसरा क्रमांक द्यायचाच झाला तर अॕड प्रकाश आंबेडकर यांना द्यावा लागेल. स्वतःच्या भरवश्यावर काही लोकांना आमदार, मंत्री बनविणारे, विस्थापितांचे राजकारण करणारे ते एकमेव नेते आहेत, याबद्दल संशय नाही. इतिहास त्याला साक्ष आहे. त्यांच्या काही अतिरेकी हट्टामुळे बरेचदा त्यांचे राजकीय गणित चुकले. अन्यथा महाराष्ट्राची सत्ता नियंत्रित करण्याएवढी मतांची ताकद त्यांच्या खात्यावर वेळोवेळी जमा झालेली महाराष्ट्राने पाहिली आहे. त्यामुळे आंबेडकर हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात तिसऱ्या नंबरची शक्ती म्हणून विचारात घ्यावेच लागेल. या तीन नावाव्यतिरिक्त एक चौथे आणि शेवटचे नाव आहे, राज ठाकरे यांचे. (आजच्या परिस्थीतीत अनेकांना कदाचित हे नाव पटणार नाही). ते लोकप्रिय आहेत, त्यांच्या सभेला मोठी गर्दी होते, त्यांच्या विधानाची देशव्यापी दखल घेतली जाते, हे खरे असले तरी त्यांचे स्वयंभू राजकारण सध्यातरी विनाशाच्या वाटेवरील प्रवासाला निघाले आहे. सध्या त्यांचा एकच आमदार आहे. अशा परिस्थितीत त्यांना नेता मानायचे किंवा चौथ्या नंबरवर नाव घ्यायचे, म्हणजे तसे धक्कादायक किंवा न पटण्यासारखेच आहे, याची मला जाणीव आहे. भाजपा सोबत त्यांची युती झालीच तर त्यांना थोड्याफार जागा मिळतीलही. त्यातून त्यांचे काही आमदार सभागृहात देखील प्रवेश करतील. पण भाजपा त्यांचा महादेव जानकर करण्याची संधीही सोडणार नाहीत. अर्थात् त्यांची भाजपा सोबत युती होईल की नाही, हेही अजून नक्की नाही.
राज ठाकरे यांनी पहिल्याच प्रयत्नात १३ आमदार स्वतःच्या भरवश्यावर निवडून आणले होते. झेंड्याचा रंग ठरवताना त्यांनी सर्वसमावेशक भूमिका घेतली होती. पण प्रत्यक्षात मात्र त्यांना सरंजामी चक्रव्यूहातून बाहेर पडता आले नाही. महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची त्यांची तथाकथित ब्ल्यू प्रिंट देखील ठोस असे काही देऊ शकली नाही. मात्र त्यांच्याकडे चांगली वकृत्व कला आहे. (भाषणात मौलिक असे काहीही नसते, हा भाग वेगळा..) पैसा आहे. मुंबईतून मोठा पैसा ते उभाही करू शकतात. कट्टर चाहते आहेत. युवा टीम आहे. सोबतच ठाकरे घराण्याचा आणि बाळासाहेबांचा वारसा देखील आहे. मात्र राजकीय आकलन, डावपेच आणि भविष्यातील नियोजन या बाबतीत त्यांचा मोठा घोळ होतो, हे वारंवार निदर्शनास आले आहे. ठाकरे घराण्याच्या परंपरेप्रमाणे ते कुणाचेही ऐकत नसावेत किंवा त्यांच्याकडे तसे सल्लागार देखील असण्याची शक्यता वाटत नाही. सध्याची त्यांची वाटचाल ही मजबूरी किंवा नाईलाजामधून झालेली दिसते आहे.
खरं तर राज ठाकरे यांच्यासाठी तशी मोठी संधी होती. अजूनही आहे. भाजपच्या नादी लागून आत्महत्या करण्यापेक्षा त्यांनी हिम्मत दाखवायला हवी होती. मोदी – शहांनी त्यांना फार फार तर जेलमध्ये टाकले असते, प्रॉपर्टी जप्त केली असती, पण राज ठाकरे झुकले नसते, तर महाराष्ट्राला एक तडफदार नेता मिळाला असता. महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा राहिला असता. आंध्र प्रदेशातील जगनमोहन रेड्डी यांचे उदाहरण तर अगदी ताजे आहे. बाप जेल मध्ये असूनही बिहारमध्ये तेजस्वी यादव कसे मर्दपणे भाजपचा सामना करतात, हेही सारा देश बघतो आहे. त्याचे फळ देखील त्यांना मिळाले आहे.
औरंगाबाद येथील राज ठाकरे यांच्या भाषणाबद्दल न बोललेलं बरं. त्यावर उगाच वेळ घालवण्यात अर्थ नाही ! भाजपचे लोक त्यांना कुठल्या कोपऱ्यात नेऊन गेम करतील, याचा भरवसा नाही.
पण अजून वेळी गेलेली नाही. राज ठाकरेंनी परत शांतपणे विचार करावा. चिंतन करावे. चांगल्या लोकांचा सल्ला घ्यावा आणि ब्लॅकहोलच्या तोंडातून परत यावे, असे वाटते ! असो.
आणखी एखादा नवा नेता महाराष्ट्राला मिळाला तर आपण त्याचेही स्वागत करू या !
तूर्तास एवढंच
–
ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष, लोकजागर
संपर्क 9822278988
•••
• ’लोकजागर’ मिशन समजून घेण्यासाठी ‘समतावादी हिंदू धर्म आणि नवा भारत’ हे पुस्तक वाचा. इतरांना भेट द्या.
• पुस्तकांसाठी संपर्क – 9503144234 (पता आणि पैसे भरल्याचा स्क्रीन शॉट व्हॉट्स ॲप करण्यासाठी)
• फोन पे साठी – 9822278988
• किंमत – २८० + ३० पोस्टेज = ३१० मध्ये घरपोच
•••
टीप – माझा सोशल मिडीयावरील कोणताही लेख/कविता/साहित्य सामाजिक हेतूनं (व्यावसायिक उपयोग वगळून) अर्थातच.. माझ्या नावाने.. सोशल मीडिया किंवा अन्यत्र प्रकाशित करण्यासाठी, शेअर करण्यासाठी खुली परवानगी आहे. वेगळ्या परवानगीची गरज नाही.
•••
संपर्क –
लोकजागर अभियान
• 8446000461 • 8275570835 • 8605166191• 9422154759 • 9773436385 • 8806385704 • 9960014116