लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे दानशूर समाजसेवक कै. नागोबा पाटील वाढई यांच्या पुतळा व स्मारकाचे उद्घाटन मोठय़ा थाटामाटात पार पडले. या प्रसंगी कळमना येथील ज्येष्ठ नागरिक, समाजसेवक, गुरूदेव सेवा भजन मंडळी, माजी सरपंच व पोलीस पाटील, ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी, गरीबीतून शिक्षण पूर्ण करून यशस्वी होणाऱ्या होतकरू युवकांचा सत्कार आयोजकांकडून करण्यात आला.
या प्रसंगी उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त राजगड चे आदर्श सरपंच चंदू पाटील मारकवार म्हणाले की, दानशूर समाजसेवक कैलासवासी नागोबा पाटील वाढई यांच्या पुतळा व स्मारक उभारण्याचं कार्य या गावचे सरपंच आमचे मित्र नंदकिशोर वाढई यांनी अविस्मरणीय कार्य केले आहे. आपल्या पंजोबाच्या सेवाकार्याचा असा गौरव त्यांच्या पुढच्या पिढीकडून होत असल्याने ही बाब महाराष्ट्र आणि देशाच्या इतिहासात दखल घेण्यासारखीच आहे. स्वर्गीय नागोबा पाटील वाढई यांचे हे पुतळा व स्मारक सर्वांसाठी प्रेरणा ठरेल असे मत व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष कळमनाचे सरपंच तथा अखिल भारतीय सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांनी सांगितले की, माझे पंजोबा कै. नागोबा पाटील वाढई हे मोठे दानशूर व सेवाभावी व्यक्ती होते. त्यांनी पन्नास वर्षे अगोदर जी समाजसेवा समाजातील दीनदलित शोषित पीडित वर्गासाठी केली ते कार्य अविरत चालू राहण्याकरता त्यांच्या पुतळ्यांची व स्मारकाची स्थापना मौजा कळमना येथे करण्यात आली असून त्यांचा पणतू म्हणून त्यांच्या पासून प्रेरणा घेऊन आपण समाज व समाजातील अखेरच्या घटकांना न्याय देण्याकरिता काम करीत राहणार आहोत अशी भूमिका व्यक्त केली.
या प्रसंगी कार्यक्रमाचे सहउद्घाटक ज्येष्ठ नागरिक शिवराम पाटील पानपट्टे, विशेष अतिथी ग्रामगीताचार्य मारुती सातपुते, भोई समाजाचे नेते व ज्येष्ठ समाजसेवक कृष्णाजी भोयर, प्रमुख पाहुणे उपसरपंच कौशल्या मनोहर कावळे, ग्रा प सदस्य दिपक झाडे, साईनाथ पिंपळशेंडे, रंजना दिवाकर पिंगे, सुनिता ऋषी उमाटे, प्रियंका गेडाम, माजी सरपंच नानाजी पाटील सुमटकर, बापूजी पाटील वाढई, सुधाकर पिंपळशेंडे, ज्येष्ठ नागरिक पुरुषोत्तम पाटील काळे, महादेव पाटील मेश्राम, महादेव पाटील पिंगे, नानाजी पाटील सपाट, विठोबा पाटील ताजने, तंटामुक्तीचे अध्यक्ष महादेवराव ताजने, माजी पोलीस पाटील भावजी पाटील वाढई, कळमनाचे पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, निंबाळाचे पोलीस पाटील गोपाल पाल यासह वाढई परिवार, सर्व नातेवाईक, मित्रमंडळी आणि समस्त गावकरी उपस्थित होते.