*लोकदर्शन 👉महादेव माळी, हिंगणगांव, ता. कवठेमहांकाळ*
*मो.नं.9923624545.*
काल राज ठाकरे यांची सभा झाली. एकूण सतरा मिनिटे फक्त शरद पवार यांच्या नावाभोवती सभा फिरत होती. आजही पवार या नावाची जादू काय आहे?हे राज ठाकरे यांच्या मुखातून बाहेर पडले. खरे म्हणजे राज ठाकरे यांनी महागाई, भ्रष्टाचार, आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारी घसरण इ.प्रश्नांवर भाष्य करायला हवे होते पण तसे काही घडले नाही.
शाहू, फुले, आंबेडकर यांच्या नावाचा इतका तिरस्कार का?हे अद्यापही समजले नाही. मी कालच्या एका लेखामध्ये शरद पवार यांना समजून घ्यायचे असेल तर एकदा टिकाकारांनी बारामतीला, पुण्यातील हिंजवडी परीसराला भेट द्यायला हवी. शरद पवार यांनी छत्रपती शिवराय यांचे क्रुतिशील राजकारण काय आहे?हे एकदा समजून घ्यायला हवे. शरद पवार यांच्या एकूण राजकीय जीवनात जे पुरोगामी निर्णय घेतले त्यांचा अभ्यास करायला हवा.
राज ठाकरे यांची भाषा आक्रमक आहे, ते उत्तम वक्ते आहेत, प्रभावी नेतृत्व आहे परंतु मला भिती वाटते की ते स्वतःच्या च वक्तव्यांनी अडचणीत येतात की काय अशीच परिस्थिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्था ते संरक्षण खात्यात महिलांना संधी देण्याचा क्रांतिकारक निर्णय त्यांनी घेतला. सहकार, शिक्षण, क्रीडा, संगीत, लेखन इ.क्षेत्रातील त्यांचा वावर आणि अभ्यास अतुलनीय आहे.
शरद पवार जातीयवादी असते तर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विविध जातीधर्माचे नेते दिसले नसते. गेल्या पंच्याहत्तर वर्षात भोंग्यांचा त्रास समाजाला झाला नाही मग आताच हा विषय येतो कसा?पहाटेची मशीदीवरील बांग आणि देवळांमधील आरतीचा मंजुळ आवाज हे खरं म्हणजे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे आणि या वैभवाचा तिटकारा वाटावा यासारखे दुर्दैव नाही. त्यासाठी महाराष्ट्र समजून घेण्याची गरज आहे.
एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली की महाराष्ट्रात राजकारण करायचे असेल तर शरद पवार यांना लक्ष्य करावे लागते हे सुर्यप्रकाशाईतके स्वच्छ आहे. गरज आहे ती ही की महाराष्ट्राची काळजी आहे असा आव आणून धार्मिक भावना भडकावून महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम कुणीही करु नये!यात हित कुणाचेच नाही!
सभेला गर्दी होणे म्हणजे आपल्या मताला लोकमान्यता आहे असे समजणे चुकीचे आहे. असे अनेक वार शरद पवार यांनी पचवलेले आहेत आणि राज ठाकरे यांच्या भाषेत सांगायचे झाले तर शरद पवार हे तेल लावलेले पैलवान आहेत, ते सहजासहजी कुणाच्या हाताला लागत नाहीत. इतिहास हे सांगतो की शरद पवार यांची बदनामी ज्यांनी ज्यांनी केले त्यांचे काय झाले?हा इतिहास तपासला तरी सहज लक्षात येते!वैशिष्ट्य हे आहे की शरद पवार यांची बदनामी सुरू असते तेव्हा शरद पवार हे पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतात कारण ते थेट जनतेमध्ये जातात आणि आपली भूमिका मांडतात!
मला वाटते राज ठाकरे यांच्या सभेने त्यांना परत उर्जा मिळाली आहे, ते पुन्हा जनतेमध्ये जातील आणि आपली भूमिका मांडतील!शरद पवार म्हणजे झंझावात काय असतो?हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो आणि फक्त बोलण्यावर भर न देता त्यांनी स्वतः ला कामातून सिद्ध केले आहे, तीच पुण्याई त्यांना तारुन नेल्याशिवाय रहाणार नाही!
*महादेव माळी, हिंगणगांव, ता. कवठेमहांकाळ*
मो.नं.9923624545