लोकदर्शन 👉 मोहन भारती
चंद्रपूर | शहर महानगरपालिकेतील पंचवार्षिक कार्यकाळ २९ एप्रिल रोजी संपल्याने आज अखेरच्या दिवशी मावळत्या महापौर राखी कंचर्लावार यांनी फेसबुकवरून संवाद साधत नागरिकांचे आभार मानले.
संवाद साधताना मावळत्या महापौर राखी कंचर्लावार यांनी मागील ५ वर्षात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून चंद्रपूर शहरात केलेल्या विकासकामांची माहिती दिली. २०१७ मध्ये पंचवार्षिक निवडणूक झाल्यावर अंजली घोटेकर यांनी महापौर म्हणून विविध विकासकामे केली. सध्या मागील अडीच वर्षांपासून आपण महापौर म्हणून सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला.
एप्रिल २०१७ ते एप्रिल २०२२ या काळात मनपा निधी, नागरी दलित सुधार योजना, नगरोत्थान निधी, पायाभूत सुविधांचा विकास निधी व इतर निधी अंतर्गत विविध रस्ते विकासकामे यासाठी निधी देण्यात आला. या निधीतून कोनेरी स्टेडियम नूतनीकरण, बाबुपेठ येथील स्टेडियम बांधकाम, महाकाली मंदिर प्रभागात झरपट नदीचे सौंदर्यीकरण करण्यात आले. अमृत पाणीपुरवठा, आझाद बगीचा, कोरोना सेवा, लसीकरण मोहिम यासह केलेल्या विविध कामाची माहिती दिली. ही विकास कामे करताना अधिकारी, कर्मचारी, नागरिकांनी दिलेले सहकार्य, याबद्दल सर्वांचे आभार मानले.