लोकदर्शन👉
*ओलांडला ८ हजार मेगावॅट औष्णिक वीजनिर्मितीचा टप्पा
(२८ एप्रिल २०२२, नागपूर) : मागील दोन दिवसांपासून महानिर्मितीने विक्रमी कामगिरी साध्य केली असताना आज रोजी आपल्या कामगिरीत सातत्य राखत आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. आज महानिर्मितीने सकाळच्या शिखर मागणीच्या सत्रात आपल्या औष्णिक वीज केंद्रांमधून एकूण ८,०१८ मेगावॅट इतकी औष्णिक वीज निर्मिती साध्य केली.
राज्यातील विजेच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर नुकतेच मा. मुख्यमंत्री तसेच मा. ऊर्जा मंत्री, मा.ऊर्जा राज्यमंत्री यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार महानिर्मितीने मिशन ८,००० मेगावॅट हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तत्परतेने हे लक्ष्य साध्य केले आहे.
२६ एप्रिल रोजी चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने सलग वीजनिर्मितीचा उच्चांक नोंदविल्यानंतर काल २७ एप्रिल रोजी महानिर्मितीने सर्वच्या सर्व २७ औष्णिक संचांमधून वीजनिर्मिती करून गेल्या ६० वर्षांतील विक्रम नोंदविला. या पार्श्वभूमीवर आज महानिर्मितीच्या औष्णिक संचांमधून एकूण ८,००० मेगावॅटचा टप्पा ओलांडताना एकप्रकारे उत्कृष्ट कामगिरीची हॅटट्रिक नोंदविली आहे.
महानिर्मितीच्या या विक्रमी कामगिरीबद्दल मा. ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे तसेच संचालक (संचलन) चंद्रकांत थोटवे, संचालक(खनिकर्म) पुरुषोत्तम जाधव यांचे व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.