अर्जुना, गांडीव नीट हातात घे
धर्म, वंश, जात, लिंग यांच्या भेदांवर
आधारलेली ही भिंत पाडून टाक
भिंतीच्या नेमक्या केंद्रबिंदूचा वेध घे, मी सांगतो
‘तिला’ स्वतंत्र होऊन घराबाहेर पडू दे
तिची कार्यक्षमता वाढू दे
राष्ट्राचीही उत्पादनक्षमता वाढेल
उगाच घाबरा होऊ नकोस,चार दिवस
गोंधळेल जरा. मग सारे ठीक होईल
अविवाहिता असेल तर बाहेरच जुळतील सूर
आंतरजातीय – आंतरधर्मीय- आंतरराज्यीय-
आंतरराष्ट्रीय विवाह करेल, स्वतःच्या
पायांवर ठामपणे उभी राहील
आत्मविश्वास वाढेल, तिला पाठबळ दे.
कुलाचा क्षय होऊ दे, त्यामुळेच
सनातन धर्माचा नाश होईल, अधर्म पसरू दे
असा गर्भगळीत होऊ नकोस
अधर्मामुळे स्त्रिया भ्रष्ट होतात हा भ्रम मनातून
काढून टाक, प्रचंड वर्णसंकर होऊ दे
संकरामुळे अहंभावी कुळे नरकात जातील
जाऊ दे, जातीचे धर्म बुडू दे
जातींना नवनवे व्यवसाय मिळू दे
या नव्या अर्थव्यवस्थेचे मनःपूर्वक स्वागत कर
त्यामुळे नरकात रहावे लागेल
असे उगीच समजू नकोस
तुला म्हणून सांगतो, हा नरक सुंदर आहे
किंबहुना हाच स्वर्ग आहे
हे नवे विश्वात्मक सामाजिक अभिसरण
नीट समजून घे, यातच जातीचे
तुटतील आधार, मग विश्वकुटुंबाचा
घटक हो, पुढची गीता तूच सांग स्वतः
आर्थिक, सामाजिक समतेची
बंधुतेची अन् न्यायाचीही…