लोकदर्शन सेलू/प्रतिनिधी👉 महादेव गिरी
भविष्यात कधीच सेलू शहराच्या शांततेला गालबोट लागू देणार नाही व त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन शिवसेनेचे माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी अध्यक्षीय समारोपात केले.
सेलू शहर व परिसरात असलेले शांततामय वातावरण व भाईचारा टिकून राहावा या उद्देशाने माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या अध्यक्षतेखाली सर्वधर्मीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी (दि.25) साई नाट्यगृहात आयोजित या सभेसाठी जि.प.सदस्य अशोकराव काकडे, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर,विनोद बोराडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक अंभोरे, मौलाना तजमुल, पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड, सिताराम मंत्री,सतीश दिग्रसकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना लहाने पुढे म्हणाले की, सध्या सर्वत्र समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यासाठी अशा समाजकंटकांना ठेेचून काढण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत. प्रत्येक महापुरुषांची जयंती साजरी करतांना कार्यकर्त्यांनी त्यांचे आदर्श विचार आत्मसात करावेत. प्रबोधनाचे विचार सर्वजण ऐकतात परंतु ते आत्मसात करीत नाहीत अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
नुकत्याच घडलेल्या झेंडा प्रकरणात पोलीस प्रशासनाने देखील गुन्हेगारांना कठोर शासन करावे व सखोल चौकशी करून निष्पाप लोकांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन केले. सर्वांनी माणुसकी हाच एकमेव धर्म पाळून दुसर्या धर्माची विटंबना होणार नाही यासाठी सर्व धर्मियांनी प्रयत्न करावेत असे आवाहन अशोकराव काकडे यांनी मनोगतात व्यक्त केले .खरे पाहता ही बैठक प्रशासनाने ठेवणे गरजेचे होते मात्र हरिभाऊ लहाने यांनी या बैठकीचे आयोजन केले हे अभिनंदनीय आहे .तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊन शहरातील वातावरण खराब होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन पवन आलडक र. मौलाना तजमुल विनोद बोराडे, अशोक अंभोरे, रहीम पठाण, पोलीस निरीक्षक गाडेवाड , सिताराम मंत्री यांनी देखील मनोगतातून शहराची शांतता अबाधित ठेवण्यासाठी सर्व धर्मियांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. या बैठकीचे सूत्रसंचालन श्रीनिवास झंवर यांनी केले. यावेळी शहरातील मंदिराचे पुजारी, विश्वस्त, मौलाना यांच्यासह सर्वधर्मीय नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.