By : Shankar Tadas
लोकदर्शन👉
मुंबई – जात, धर्म , प्रांत, भाषेच्या नावाखाली भाजपकडून लोकांचे विभाजन केले जात असल्याची टीका करतानाच युवक काँग्रेस भाजपच्या या विघातक प्रवृत्तीविरूद्ध, मोदी सरकारविरुद्ध लढाई उभी करेल आणि यात तरुणाईने अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी केले आहे. जात, धर्मांधवादी नरेंद्र मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
दादर येथील टिळक काँग्रेस भवन मुख्यालयात युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची औपचारिक सूत्रे स्वीकारल्यानंतर कामगार कल्याण मंडळाच्या मैदानावर शनिवारी रात्री आयोजित भव्य पदग्रहण सोहळ्यात कुणाल राऊत बोलत होते. या मेळाव्यात प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत,राष्ट्रीय सरचिटणीस शक्तीसिंह गोहिल, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप,अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास, अ.भा. काँग्रेसचे सहचिटणीस व युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अल्लावरू,मावळते युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष झिशान सिद्दीकी, आदी नेते उपस्थित होते.
कुणाल राऊत यांच्यासह प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, शरण पाटील, अनिकेत म्हात्रे, सोनललक्ष्मी घाग, सरचिटणीस दीपाली ससाणे यांचेही पदग्रहण पार पडले.
देशाचे सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी महात्मा गांधी, इंदिरा गांधी यांनी बलिदान दिले. स्वातंत्र्य संग्राम सैनिक, वरिष्ठ कॉग्रेस नेत्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून महाराष्ट्र युवक काँग्रेस नक्कीच चांगले काम करील, असा विश्वास व्यक्त करीत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील यांनी कुणाल राऊत यांना शुभेच्छा दिल्या.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीमहाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर राष्ट्रपुरुषांनी दिलेला वारसा जपून जातीधर्माच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करण्याचे सध्या सुरू असलेले राजकारण संपविणे, हेच आमचे मुख्य लक्ष्य राहणार असल्याचा ठाम निर्धार कुणाल राऊत यांनी पदग्रहण सोहळ्यात बोलताना व्यक्त केला.
“देशात महागाई, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य यासारखे गंभीर प्रश्न निर्माण झाले असताना केंद्रातील भाजपा सरकार जाती, धर्माच्या नावाखाली समाजात दुही माजविण्याचा प्रयत्न करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणाऱ्या नेत्यांकडूनच मशिदीवरील भोंगे, हनुमान चालिसा पठण यासारखे मुद्दे काढून जातीधर्मात द्वेष पसरविण्याचे काम केले जात आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
“पेट्रोल आज १२० रूपयांनी तर गॅस सिलेंडर हजार रूपयांच्यावर पोहोचली आहे. याविरूद्ध रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करणार आहोत. या आंदोलनात तुम्ही सहभागी होणार का?,” असा प्रश्न राऊत यांनी विचारताच उपस्थित तरूणाईने होकाराची प्रचंड गर्जना केली.
*माझे गाव,माझी शाखा!*
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या माध्यमातून राज्यातील सुमारे ४५ हजार गावांमध्ये ” माझं गांव, माझी शाखा” अभियान राबविण्याची घोषणा कुणाल राऊत यांनी यावेळी केली. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी “मदतीचा हात, २४ तास” ही हेल्पलाईन सुरू केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
*गांधी घराण्याचा त्याग कोणीही विसरू शकत नाही – बी. व्ही. श्रीनिवास*
युपीएच्या अध्यक्षपदी असताना काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि त्यानंतर राहुल गांधी यांनी देखील पंतप्रधानपद चालून येऊन सुद्धा नाकारले होते. हा इतका मोठा त्याग गांधी घराण्याशिवाय दुसरे कोणीही करू शकत नाही, असे अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास यांनी म्हटले. माझ्यामागे कुठलाही राजकीय वारसा नसताना एका गरीब घरातील मुलगा असूनही राहुल गांधी यांनी मला युवक काँग्रेसचे अध्यक्षपद दिल्याचे त्यांनी सांगितले. भाषण देण्यापेक्षा काम करण्यात माझा जास्त विश्वास आहे,असे त्यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.
*जोमाने काम करा – कृष्णा अल्लावरू*
कोरोना काळात रुग्णांना ऑक्सिजन मिळण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून धडपडीने काम करणारा अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांच्या रूपाने अखिल भारतीय युवक काँग्रेसला लाभला आहे. त्यांचा आदर्श घेऊन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जोमाने काम करण्याची गरज असल्याचे आवाहन अखिल भारतीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावरू यांनी केले.