२४ एप्रिल* *हबल दुर्बिण चे प्रक्षेपण

*२४ एप्रिल*                                                     *लोकदर्शन 👉 *शब्दांकन व संकल्पना*
*अनिल देशपांडे बार्शी.*
*९४२३३३२२३३.*
प्रक्षेपण – २४ एप्रिल १९९०

हबल दुर्बीण ही अवकाशाचा वेध घेण्यासाठी नासा व युरोपियन अवकाश संस्था यांनी संयुक्तपणे सोडलेली दुर्बिण आहे. ही दुर्बिण १९९० साली सोडण्यात आली. ही अवकाशात सोडण्यात आलेली आत्तापर्यंतची सर्वात मोठी तसेच सर्वात प्रगत दुर्बिण आहे. या दुर्बिणीचे नाव अमेरिकेच्या एडविन हबल या खगोलशास्त्रज्ञाच्या नावावरून देण्यात आले. ही दुर्बिण नासाच्या मोठ्या वेधशाळांच्या प्रकल्पातील एक प्रकल्प आहे.

इटालीत जन्‍माला आलेल्‍या गॅलिलिओने चारशे वर्षांपूर्वी, १६१० साली दुर्बिणीचा शोध लावला. गॅलिलिओने दुर्बिणीच्‍या साह्याने चंद्रावरील डाग आणि गुरूचे चार उपग्रह शोधून काढले. दुर्बिणीच्‍या शोधापासून सुरू झालेला अवकाश संशोधनाचा हा प्रवास आजतागायत सुरू आहे. गॅलिलिओने लावलेला दुर्बिणीचा शोध संशोधनक्षेत्रात क्रांतिकारक ठरला. त्या दुर्बिणीचे सर्वात प्रगत रूप हबल दुर्बिणीच्‍या रूपाने आपणास दिसते.

अवकाशाचा वेध घेण्‍यासाठी ‘नासा’ व युरोपीयन अवकाश संस्‍था यांनी संयुक्‍त रीत्‍या तयार केलेली हबल दुर्बीण (Hubble Space Telescope – HST) २४ एप्रिल १९९० रोजी अवकाशात सोडण्‍यात आली. अवकाशात सोडण्‍यात आलेली ती सर्वात मोठी व प्रगत दुर्बीण. ‘हबल’ ने काढलेल्‍या छायाचित्रांमुळे जगभरातील खगोलप्रेमी भारावून जातात. दुर्बिणीने लागलेल्‍या अनेक शोधांवर पुस्‍तकेही लिहिण्‍यात आली आहेत.

पृथ्‍वी पासून ३८० मैल दूर अवकाशात स्थित असलेल्‍या हबल दुर्बिणीचे वस्‍तुमान ११,११० किलोग्रॅम आहे. तिचा व्‍यास २.४ मीटर असून एकूण क्षेत्रफळ ४.५ वर्ग मीटर एवढे आहे. पृथ्‍वीवरील परिमाणांनुसार ‘हबल’चा आकार फार मोठा नाही, मात्र तिचा अवकाशात काम करण्‍याचा आवाका फार मोठा आहे.

दुर्बीण पृथ्‍वीभोवती ७,८०० मीटर प्रती सेकंद वेगाने जवळपास वर्तुळाकार कक्षेत फिरते. ती दर ९६ मिनिटांनी पृथ्‍वीची प्रदक्षिणा पूर्ण करते. दुर्बीण दिवसाचे २४ तास आणि वर्षाचे ३६५ दिवस कार्यरत असते. ‘हबल’चे आरोग्‍य, सुरक्षा आणि कार्यक्षमता यांवर देखरेख करण्‍याचे आणि दुर्बीण नियंत्रित करण्‍यासाठी शेकडो शास्‍त्रज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञ नासा च्‍या ‘गोदार्द स्‍पेस फ्लाइट सेंटर’ आणि ‘स्‍पेस टेलिस्‍कोप सायन्‍स इन्स्टिट्यूट ’ (STScI) येथे अहोरात्र कार्यरत आहेत.

‘हबल’ दुर्बीण पृथ्‍वीच्‍या वातावरणाबाहेर, प्रकाश प्रदूषणापासून दूर अवकाशात बसवण्‍यात आल्‍याने ती कोणत्‍याही दृश्‍यात्‍मक अडथळ्याशिवाय अवकाशाचे निर्भेळ रूप पाहू शकते. दुर्बिणीमुळे मानवाच्‍या अवकाश निरीक्षण क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

धूळ आणि हेलियमच्या ढगात ताऱ्याचा जन्म होताना ‘हबल’ने टिपलेले हे प्रसिद्ध छायाचित्र. आकाशगंगे मध्‍ये आजवर ज्‍या सर्वांत मोठ्या तार्‍याचा जन्‍म पाहण्‍यात आला, त्‍या खगोलीय घटनेचा ‘हबल’ कडून जो फोटो काढण्‍यात आला, त्‍या फोटोचा एक लहानसा भाग म्‍हणजे शेजारी दिसत असलेला फोटो. त्यावरून ‘हबल’च्‍या कामाच्‍या व्‍याप्‍तीचा अंदाज यावा. हबल दुर्बिणीने घेतलेले वेध पाहण्‍याकरता येथे क्लिक करा.

‘हबल’ दुर्बिणीला २४ एप्रिल २०११ रोजी वीस वर्षे पूर्ण झाली. रॉकेट इंजिनीयरिंगचे प्रणेते हर्मन ओबर्थ , रॉबर्ट गोदार्द आणि कॉन्स्टंटाइन सिओलकोव्हस्की या शास्त्रज्ञांपैकी हर्मन ओबर्थ यांनी १९२३ साली ‘The Rocket into Planetary Space’ हा प्रबंध लिहून पृथ्वीच्या कक्षेत एक दुर्बीण रॉकेटच्या साहाय्याने फिरती ठेवता येईल, अशी कल्पना मांडली.

अमेरिकेच्‍या एडविन हबल (१८८९-१९५३) या खगोलशास्त्रज्ञाच्‍या नावावरून दुर्बिणीचे नामकरण करण्‍यात आले. एडवीन हबल यांनी १९२४ साली अवकाश निरीक्षण करण्‍याच्‍या हेतूने त्‍या काळची सर्वात मोठी शंभर इंचाची हूकर दुर्बीण वापरली होती. ‘हबल’चे यशस्‍वी प्रक्षेपण २४ एप्रिल १९९० रोजी डिस्कव्‍हरी या स्‍पेस शटलच्‍या साह्याने करण्‍यात आले.

‘हबल’चे अवकाशातील स्‍थान पृथ्‍वीपासून फार जवळ असल्‍याने आकाश निरभ्र असल्‍यास तिच्‍या गडद रंगामुळे ती साध्‍या डोळ्यांनीही दिसू शकते. (‘हबल’ कोणत्‍या वेळी पाहता येईल हे जाणण्‍यासाठी येथे क्लिक करा. तेथे select from map वर क्लिक करून आपला देश-शहर निवडा. मग satellites मध्‍ये HST वर क्लिक करा. तेथे हबल कोणत्‍या वेळी पाहता येईल याचा तक्‍ता दिसेल).

‘हबल’ने आपल्‍या वीस वर्षांच्‍या कार्यकाळात पाच लाखांहून अधिक छायाचित्रे पृथ्‍वीकडे पाठवली आहेत. या छायाचित्रांच्‍या माध्‍यमातून ‘हबल’ने ब्रम्‍हांडाच्‍या माहितीचा प्रचंड साठा मानवाला खुला करून दिला आहे
संकलन व संकल्पना
अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३
साभार
नेट

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *