*लोकदर्शन बार्शी ;👉 *शब्दांकन व संकल्पना.*
*अनिल देशपांडे बार्शी*
*९४२३३३२२३३.*
सोमवारी संपूर्ण देशामध्ये जंत नाशक विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे…
पोटात जंत झाले की केवळ भूक मंदावणे,
वजन कमी होण्यासारख्या तक्रारी भेडसावत नाहीत,
तर त्यामुळे फुफ्फुसाचेही आजारही होऊ शकतात. त्यामुळे जंत होऊ नयेत यासाठी तातडीने उपचार करायला हवेत….
पूर्वी लहान मुलांच्या पोटात जंत होऊ नयेत, यासाठी घरगुती औषधे दिली जात. आता प्रभावी औषधे निघाली असली तरीही पुरेशी माहिती नसल्याने ती मुलांना दिली जात नाहीत. जंक फूडचा शरीरावर होणारा मारा, खालावलेली रोगप्रतिकारशक्ती, पालेभाज्या, फळांवर मारलेली काट यामुळे लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींमध्येही जंत होण्याचे प्रमाण वाढले आहे. स्वच्छतेच्या सवयी चांगल्या नसतील तर हातावाटे जंतू सर्वप्रथम शरीरात शिरकाव करतात. ज्यांना अनवाणी चालण्याची सवय असते, त्यांच्या पायाच्या भेगांमधून शरीरामध्ये जंतू जाण्याची शक्यता जास्त असते असे डॉक्टर सांगत.
मोठ्या आकाराचे जंत पोटाच्या आतड्यांमध्ये राहून तिथे एका विशिष्ट प्रकारचा गोळा तयार करतात. पोटात दुखणे, मळमळणे यांसारखा त्रास त्यामुळे होऊ शकतो. काही प्रकारचे जंत उलट्या बाजूने शरीरात फुफ्फुसांत जातात. तिथे राहिल्याने श्वसनमार्गाचे विविध प्रकारचे त्रास वाढवतात, लहान मुलांना सहा महिन्यांतून एकदा जंतांचे औषध द्यायला हवे, असा आग्रह अनेक बालरोगतज्ञांनी व्यक्त केला.
जंत-कृमींचे प्रकार जंतांचे मुख्य दोन प्रकार आहेत. त्यातील मुख्यत: पचनसंस्थेत वाढणाऱ्या जंतांनाच जंत म्हटले जाते. यकृत, स्नायू अशा इतर ठिकाणी वाढणारे जंत आपण सहसा विचारात घेत नाही. पचनसंस्थेच्या जंतांचे चार-पाच प्रकार आपल्या देशात आढळतात. या सर्व जंतांची अंडी सर्वसाधारणतः विष्ठेतून सगळीकडे पसरतात. या अंड्यांतून सूक्ष्म कृमी बाहेर पडून तोंडावाटे अथवा त्वचेवाटे परत शरीरात प्रवेश करतात आणि नवीन माणसाला जंतांची बाधा होते. यांतले काही जंत त्यांच्या जीवनचक्रात रक्तावाटे फुप्फुसात येतात. त्यामुळे काही श्वसनाचे विकार होतात, खोकला येतो.
आयुर्वेदात जंत-कृमींचा विचार करण्यात आलेला आहे. बाह्यकृमी व अभ्यंतर कृमी असे मुख्य दोन प्रकार करण्यात आले आहेत. बाह्य कृमींमध्ये उवा-लिखा यांसारख्या कृमींचा समावेश करण्यात आला आहे. तर अभ्यंतर कृमी, शरीराच्या आतील कृमींमध्ये आतड्यात, पचनसंस्थेत, रक्तामध्ये, रक्तांच्या शिरांमध्ये, मलामध्ये उत्पन्न होणाऱ्या कृमींचा समावेश करण्यात आला आहे. या अभ्यंतर कृमींचा आकार, त्यांचे असण्याचे स्थान याच्या आधारे उपप्रकार करण्यात आले आहेत.
यातील रक्तज कृमी आकाराने खूप बारीक, गोल असतात. सूक्ष्म स्वरूपी असे हे कृमी रक्तामध्ये उत्पन्न होत असतात. जखमेमध्ये यांचा संपर्क झाल्यास वेदना, सुजणे, दाह, खाजणे, पू होणे, जखम चिघळणे अशा तक्रारी आढळतात. चिघळलेल्या जखमांमध्ये हे कृमी कालांतराने त्वचा, मांस, स्नायू यांचाही नाश करू शकतात. या रक्तज कृमींचा आपण येथे विचार केलेला नाही. कफज कृमीमध्ये पचनसंस्थेच्या पहिल्या भागातील कृमी आणि आतड्यातील व मलातील कृमी यांचा समावेश होतो. कफज कृमींच्या आकारात विविधता असते. पांढऱ्या रंगाचे, स्नायूप्रमाणे चपटे, गोल, गांडुळाप्रमाणे लांब, बारीक ठिपक्याप्रमाणे, धाग्यांप्रमाणे दिसणारे, लहान अथवा मोठे लांबडे अशा विविध प्रकारातील हे कृमी पचन संस्थेच्या सुरुवातीच्या भागात असतात. ते अति वाढल्यास तोंडाकडे अथवा खालच्या बाजूला पसरतात, मळमळणे, तोंडाला पाणी सुटणे, पचन न होणे, चव कमी होणे, उलटी होणे, बारीक ताप येणे, पोट फुगणे, काही वेळा शिंका-सर्दी या तक्रारी असतात. लहान मुलांत पोट मोठे दिसणे, पातळ जुलाब होणे, कधी कधी उलटी होणे, अंग खाजणे, चेहऱ्यावर पांढरे डाग दिसणे, गुदद्वाराची जागा खाजणे, खाणे नको वाटणे, तर काही जणांत सारखी खा-खा होणे, तब्येत न सुधारणे या तक्रारी आढळतात. आतड्यातील व मलातील कृमी हे प्रामुख्याने शिळे, नासलेले, बिघडलेले अन्न खाणे, माती खाणे, अशुद्ध पाणी पिणे या कारणांनी उत्पन्न होतात. आतड्यामध्ये राहणारे हे जंत थोडे मोठे, लांब असतात. यांचा रंग काळा, पिवळा, सफेद, निळा असतो. संडासला पातळ होणे किंवा अजिबात साफ न होणे, पोटात दुखत राहणे, भूक कमी लागणे, अंगाला खाज सुटणे, निरुत्साह, त्वचा निस्तेज रुक्ष होणे, रक्ताचे प्रमाण घटणे, गुदद्वाराच्या जागी खाज येणे या तक्रारी असतात. काही जणांचे वजन घटते. या कृमींकडे दुर्लक्ष केल्यास यातूनच ॲनिमिया, यकृताची वाढ होणे, पोटात पाणी होणे, अंगावर सूज येणे, काही वेळा हृदयविकार जडणे हे आजार उद्भवतात.जंत झाल्याचे कसे ओळखावे? मोठे जंत (गोल जंत), लहान जंत (कृमी) हे लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात असतात. अशी मुले अशक्त असतात. ही मुले लवकर दमतात. त्यांच्या शरीराची वाढ खुंटू शकते. मूल अशक्त असेल, पोट मोठे असेल, ते लवकर दमत असेल, त्याच्या शरीराची वाढ योग्य तऱ्हेने होत नसेल, तर जंत झाल्याचे ओळखावे. पोटात बारीक दुखत राहणे हे एक लक्षण आहे. पातळ भसरट जुलाब होणे, शौचास साफ न होणे. उलट्या होणे. कधी कधी मोठे जंत खूप झाल्याने आतड्यात ते एक प्रकारचा गोळा तयार करतात. असा गोळा पोटात फिरत असल्याची भावना होणे हे जंत झाल्याचे चिन्ह असते. आकडेकृमी आतड्यांतून रक्त शोषतात. त्यामुळे अनिमिया होतो. रक्तातील लोहाचे प्रमाण कमी झाल्याने चेहऱ्यावर पांढरे डाग दिसू लागतात. काही प्रकारच्या कृमींमुळे गुदद्वाराजवळ खाज सुटते. कारण बारीक कृमी अंडी घालायला गुदद्वाराशी येतात. फुफ्फुसाच्या आजाराची शक्यता पोटात जंत झाले की फुफ्फुसाचे आजारही होऊ शकतात, हे आता लक्षात आले आहे. हा त्रास छोट्यांबरोबर मोठ्यांनाही होऊ शकतो. काही प्रकारच्या कृमी आतड्यातून मलाद्वारे खाली न जाता, उलट्या बाजूने प्रवास करीत फुफ्फुसांत जातात. तिथे त्या राहिल्याने श्वसनमार्गाचे विविध प्रकारचे त्रास वाढवतात. अशा वेळी श्वसनाच्या आजारावर औषधोपचार करावे लागतातच, पण या कुटुंबातील सर्वांनीच सहा महिन्यांतून एकदा जंतांचे औषध घ्यायला हवे.काय कराल उपाययोजना? सर्व जंतांचे जीवनचक्र अस्वच्छतेवर अवलंबून असते. मानवी विष्ठेची योग्य विल्हेवाट लावली गेली तर जंतांची बाधा सहसा होत नाही. म्हणून जंतांच्या उच्चाटनासाठी मानवी विष्ठेची योग्य विल्हेवाट लागली पाहिजे.
*अल्बेंडेझॉल*
मुलांमधील कुपोषण, अनेमियाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी सरकारने अल्बेंडेझॉल हे औषध देण्याचे ठरवले आहे. आज,सोमवारी विशेश राष्ट्रीय जंतनाशक मोहिमे निमित्ताने देशातील एक ते १९ वयोगटातील मुलांना शाळा व अंगणवाड्यांमधून ही गोळी देण्यात येणार आहे. हे औषध सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी *सुरक्षित* असून, यामुळे *रोगप्रतिकारशक्ती व पचनशक्ती वाढण्यास मदत होते.*
*काळजी काय घ्याल*
*अल्बेंडोझॉल* ही कृमिनाशक गोळी घेण्याची पद्धत प्रत्येक वयोगटानुसार वेगळी आहे.
#आजारी बालकांना जंतनाशकाची गोळी देऊ नये,
#जंतनाशकाची गोळी लहान मुलांना तशीच गिळण्यासाठी सांगू नये व गोळी घरी खाण्यासाठी पालकांच्या हातात देऊ नये, जेणेकरून या मोहिमेंतर्गत बालकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ नयेत असे निर्देश आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत.
अल्बेंडोझॉल ही लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठी सुरक्षित जंतनाशकाची गोळी आहे. जंतनाशक औषधीमुळे होणारे दुष्परिणाम किरकोळ स्वरूपाचे आहेत त्यात सौम्य प्रमाणात चक्कर येणे, मळमळणे, उलटी होणे किंवा डोके दुखी, पोटदुखी व थकवा यांचा समावेश आहे. हे दुष्परिणाम जंत संसर्गामुळे व त्यावर होणाऱ्या औषधाच्या परिणामामुळे होतात. ते तात्पुरते असून शाळा व अंगणवाडी केंद्रावर सहजगत्या हाताळण्यासारखे आहेत. जंत नाशक गोळी मुलांना दिल्यानंतर अशी लक्षणे निदर्शनास आल्यास ताबडतोब १०४/१०८ या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे
कृमीदोष नष्ट होण्यास मदत होईल
वैयक्तिक व आजूबाजूच्या परिसरातील अस्वच्छतेमुळे तसेच दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे कृमीदोषांचा संसर्ग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कृमीदोष हे कुपोषण व रक्तशयाचे कारण असल्यामुळे कृमीदोष आढळणारी मुले ही नेहमी अशक्त व थकलेली असतात तसेच यामुळे बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ ही खुंटते, या तक्रारी दूर होतील,
उद्या न चुकता बालकांना अल्बेंडोझॉल ही ४०० मिलीग्रॅम ची बहुउपयोगी गोळी चगळुन किंवा फोडून खाण्यासाठी बालकांना शाळेत,अंगणवाडी,महाविद्यालयात पाठवा,या अल्बेंडोझॉल गोळीची किंमत बाहेर साधारण रु ९ च्या पुढे आहे,ही आपल्याला मोफत मिळतेय म्हणून ती बालकांना देण्याचे टाळू नका…
शब्दांकन व संकल्पना
अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३