लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
राज्यात वृक्षाच्छादन वाढावे व त्या माध्यमातुन नैसर्गिक संकटांवर उपाययोजना व्हावी तसेच पर्यावरणाचा समतोल साधला जावा या उद्देशाने राज्याचे माजी अर्थ व वनमंत्री तसेच विधीमंडळ लोकलेखा समितीचे विद्यमान अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्री म्हणून हरीत महाराष्ट्र ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात २ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प त्यांनी जाहीर केला. या संकल्पाच्या पुर्तीसाठी राज्यभरातील सेवाभावी संस्था पुढे सरसावल्या. अश्याच सजग स्वयंसेवी संस्थांमधील एक संस्था म्हणजे वर्धा येथील जनहीत मंच ही संस्था. वृक्षलागवड मोहीमे संदर्भात आ. मुनगंटीवार यांनी केलेल्या ईश्वरीय कार्याबद्दल जनहीत मंचने त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी २ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प जाहीर केल्यानंतर जनहित मंचचे पदाधिकारी जिल्हाधिका-यांना भेटले. वृक्ष लागवडीसाठी काही जागांची मागणी केली. वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाची मदत सुध्दा जनहीत मंचने घेतली. रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्याचा अनुभव गाठीशी असणा-या जनहीत मंचने शासनाच्या वृक्ष लागवड मोहीमेत हिरीरीने सहभाग घेतला. आयटीआय टेकडी मुक्तांगण या परिसरात जनहीत मंचने ७ हजार झाडांची लागवड केली. त्यात काही औषधी वनस्पतींचाही समावेश आहे. आज हे वृक्ष बहरले असून डौलाने टेकडी परिसरात उभे आहेत. आ. सुधीर मुनगंटीवार यांना त्यावेळी जनहीत मंचच्या पदाधिका-यांनी टेकडीवर जाण्यासाठी रस्ता व विद्युतीकरणाची मागणी केली होती. ती मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्राधान्याने पूर्ण केली. याशिवाय आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ज्या आराखडयावर परिश्रमपूर्वक काम केले त्या सेवाग्राम विकास आराखडयासंदर्भात देखील जनहीत मंचने काही सुचना केल्या व त्यासंदर्भात प्रशासनाला सहकार्य देखील केले.
दिनांक २२ एप्रिल २०२२ रोजी आ. सुधीर मुनगंटीवार वर्धा येथे भाजपाच्या बैठकीच्या निमीत्ताने तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाहणी दौ-यानिमीत्त वर्धा येथे आले असता स्थानिक विश्रामगृहात जनहीत मंचचे पदाधिकारी डॉ. राजेश आसमवार, सुभाष पाटणकर, सतिश बावसे आदींनी आ. मुनगंटीवार यांची भेट घेतली व मानचिन्ह देवून त्यांचा सत्कार केला. हरीत महाराष्ट्र ही संकल्पना राबवत राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीची विक्रमी मोहीम आपण यशस्वीपणे राबविली. ही केवळ मोहीम न राहता लोकचळवळ झाली. या वृक्ष लागवड मोहीमेत आम्ही जनहीत मंचच्या माध्यमातुन खारीचा वाटा देवू शकलो याचा आम्हाला अभिमान आहे, असे जनहीत मंचचे पदाधिकारी यावेळी म्हणाले. मुक्तांगण टेकडी परिसरात रस्ता व विद्युतीकरणाची मागणी देखील आपण प्राधान्याने पुर्ण केली. यासाठी देखील आम्ही आपले मनःपूर्वक आभारी असल्याची भावना जनहीत मंचने यावेळी व्यक्त केली. अतिशय भावपूर्ण व हृदय वातावरणात हा सत्कार संपन्न झाला. यावेळी प्रामुख्याने वर्धाचे खा. रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर यांची उपस्थिती होती. कर्तृत्वाच्या पाऊलखुणा जिथे असतात त्याठिकाणी वंदन करण्यासाठी आपसुकच हात जोडले जातात याचा प्रत्यय यादरम्यान आला.