चंद्रपूरकर नागरिकांच्‍या शुभेच्‍छा व प्रेमाच्‍या ऋणात कायम राहणार – आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर


*⭕नागरिकांना दिलेला शब्‍द पूर्ण करू शकलो याचा मनापासून आनंद.*

*बाबुपेठ परिसरात १६.८४ कोटी रू. किंमतीच्‍या रस्‍त्‍याचे भूमीपूजन उत्‍साहात संपन्‍न.*

बाबुपेठ परिसरात एका दुःखद घटनेसंदर्भात त्‍या परिवाराला भेट देण्‍यासाठी आलो असता रस्‍त्‍याची अवस्‍था बघितली. यावेळी परिसरातील नागरिकांनी रस्‍त्‍यांचे बांधकाम करण्‍याची मागणी केली. जरी मी या विभागाचा आमदार नसलो तरीही या शहराचे माझ्यावर ऋण आहे. तिन टर्म मी या विभागाचे प्रतिनिधीत्‍व केले आहे. या शहरातील नागरिकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. मी नागरिकांना रस्‍ते बांधकामाबाबत शब्‍द दिला आणि तो शब्‍द मी पूर्ण करू शकलो याचा मला मनापासून आनंद आहे. १६.८४ कोटी रू. किंमतीच्‍या या परिसरातील रस्‍त्‍यांच्‍या बांधकामांचे भूमीपूजन आज करताना मला मनापासून आनंद होत आहे. या रस्‍त्‍यांचे बांधकाम तातडीने सुरू करण्‍यात येणार आहे. रस्‍त्‍यांचा दर्जा उत्‍तम व्‍हावा यासाठी आपणही लक्ष द्यावे, विकास प्रक्रिया अशीच निरंतर सुरू राहावी यासाठी भारतीय जनता पार्टी सदैव वचनबध्‍द असल्‍याचे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

दिनांक २१ एप्रिल २०२२ रोजी चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरातील १६.८४ कोटी रू. किंमतीच्‍या रस्‍त्‍यांचे भूमीपूजन संपन्‍न झाले. यावेळी आयोजित सभेत आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, स्‍थायी समिती सभापती संदीप आवारी, मनपा गटनेत्‍या सौ. जयश्री जुमडे, सभागृह नेते देवानंद वाढई, भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते प्रमोद कडू, चंद्रशेखर गन्‍नुरवार, बंडूभाऊ पदलमवार, भाजपा महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महासचिव ब्रिजभूषण पाझारे, नगरसेवक संजय कंचर्लावार, प्रदिप किरमे, ज्‍योती गेडाम, श्‍याम कनकम, सौ. कल्‍पना बगुलकर, मंडळ अध्‍यक्ष संदीप आगलावे, सचिन कोतपल्‍लीवार, दिवाकर पुद्टवार आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, १९९५ मध्‍ये मी या विभागाचा आमदार झालो तो तुमच्‍या प्रेमाच्‍या आणि शुभेच्‍छांच्‍या बळावरच. विविध पदांना न्‍याय देण्‍याची संधी सुध्‍दा तुमच्‍यामुळेच प्राप्‍त झाली. वं. राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नांव नागपूर विद्यापीठाला देण्‍यासाठी केलेला संघर्ष यशस्‍वी ठरल्‍यानंतर गुरूकुंज मोझरी येथे गुरूदेव ज्‍या गादीवर बसायचे त्‍याठिकाणी सन्‍मानाने मला बसविण्‍यात आले हा सर्वोच्‍च आनंदाचा क्षण मला तुमच्‍यामुळेच प्राप्‍त झाला. अर्थमंत्री असताना निधी उपलब्‍ध करणे सौपे होते. पण आता मी १६.८४ कोटी रू. निधीचा पाठपुरावा करून कामाचे टेंडर तातडीने काढले. बांधकाम विभागाच्‍या सचिवांनी ७ दिवसात टेंडर काढण्‍याची ही दहा वर्षातील पहिलीच घटना असावी. चंद्रपूर शहरात विकासात दिर्घ मालिका मी तयार करू शकलो याचा मला मनापासून आनंद आहे. चंद्रपुरातील प्रियदर्शिनी नाटयगृहाचे अत्‍याधुनिकीकरण, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालयाचे बांधकाम, टाटा ट्रस्‍टच्‍या सहकार्याने कॅन्‍सर हॉस्‍पीटलचे बांधकाम, सैनिकी शाळा, बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र, बाबुपेठ प्रभागात शांतीधाम विकसित करणे, दाताळा परिसरात केबल स्‍टेड पुलाचे बांधकाम, पत्रकार भवन, बाबुराव शेडमाके स्‍टेडियमच्‍या बांधकामासाठी निधी मंजूर, ज्‍युबिली हायस्‍कुलच्‍या नुतनीकरणासाठी निधी मंजूर, श्री महाकाली मंदिर परिसराच्‍या विकासासाठी ६० कोटी रू. निधी मंजूर, जिल्‍हा स्‍टेडियमचा पुर्नविकास, छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सौंदर्यीकरण, बाबा आमटे अभ्‍यासिका, डॉ. ए.पी.जे. अब्‍दुल कलाम निसर्ग उद्यान, बाबुपेठ परिसरातील भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी स्‍टेडियमचे बांधकाम, देशातील अत्‍याधुनिक वनअकादमी, पोलिस वसाहतीचे बांधकाम, पोलिसांसाठी जीमचे बांधकाम, नियोजन भवनाचे बांधकाम, कोषागार कार्यालयाचे बांधकाम, चंद्रपूर शहरातील मोकळया जागांचा विकास करत त्‍याठिकाणी बालोद्यानाची निर्मीती, अमृत पाणी पुरवठा योजना, शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालयातील मुलींच्‍या वसतीगृहासाठी ७ कोटी ८९ लक्ष ६० हजार रू. अशी विकासाची दिर्घमालिका आम्‍ही या शहरात उभी केली आहे. केंद्रीय सांस्‍कृतीक कार्यमंत्री किशन रेड्डी यांची भेट घेवून श्री अंचलेश्‍वर मंदीराचा विकास प्रसाद योजनेच्‍या माध्‍यमातुन करण्‍यासाठी आमही प्रयत्‍नशील आहोत. भारतीय जनता पार्टीने या शहराच्‍या विकासासाठी आजवर परिश्रम घेतले. कोव्‍हीड काळातील संकटादरम्‍यानही मदतीसाठी भारतीय जनता पार्टी तत्‍पर होती. आम्‍ही आजवर विकासाचे राजकारण केले व त्‍या माध्‍यमातुन समाजाची सेवा केली व भविष्‍यातही करू असे प्रतिपादन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

यावेळी नागरिकांची व भाजपा कार्यकर्त्‍यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती. कार्यक्रम संपल्‍यानंतर मोठया प्रमाणावर नागरिक आ. मुनगंटीवार यांना भेटून रस्‍त्‍यांची मागणी पूर्ण केल्‍याबद्दल आभार व्‍यक्‍त करत होते. नागरिकांमध्‍ये प्रचंड उत्‍साह होता. यावेळी मान्‍यवरांचे जंगी स्‍वागत करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक मंडळ अध्‍यक्ष संदीप आगलावे यांनी केले तर संचालन ऐश्‍वर्या भालेराव यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *