लोकदर्शन वालूर / प्रतिनिधी। 👉महादेव गिरी।
महापुरुषांचा विचार हा परिस असून, त्यांचे विचार अंगीकारून अनुसरल्यास आपल्या जीवनाचे सोने होते. महापुरुषांनी जीवन उध्दाराचा मार्ग सांगितला आहे. असे प्रतिपादन कवी सुरेश हिवाळे यांनी केले. ते आंबेडकर नगर येथे क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात सोमवार ( दि. ११ ) रोजी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोक पाठक हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणुन
सरपंच संजय साडेगावकर , मारोती बोडखे, बालासाहेब हरकळ, शरद ठाकर यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना आपल्या भाषणात सुरेश हिवाळे म्हणाले की, ‘ महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षण हे समग्र सामाजिक परिवर्तनाचे शस्त्र आहे असे सांगितले. त्यामुळे सर्व अनर्थांचे मुळ असलेली अविद्या दूर सारून. आपण विद्या आत्मसात करून ज्ञानसंपन्न झाले पाहिजे. युवकांनी आजच्या सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावात सजग होऊन वाटचाल करण आवश्यक आहे.’ असेही सुरेश हिवाळे म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ऋषी वाघमारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी किरण धाबे, जयंती समितीचे अध्यक्ष रोहण वाटूरे, उपाध्यक्ष दिपक वाटूरे, कोषाध्यक्ष अभिषेक भालेराव, सचिव विकास वाटूरे यांनी परिश्रम घेतले.