लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– सध्या राज्यात महावितरणने काही अपरिहार्य कारणांमुळे भारनियमन सुरू केले आहे. राज्यातील अनेक भागात, विशेषतः ग्रामीण भागात रात्री उशिरापर्यंत भारनियमन सुरू करण्यात आले आहे. त्यात राजुरा विधानसभा क्षेत्रातील अनेक गावात हे भारनियमन सुरू आहे. मात्र या भारनियमनाला विशेषतः रात्रीच्या भारनियमनाला स्थानिक नागरिकांकडून तिव्र विरोध आहे. शिवाय राजुरा विधानसभा क्षेत्र हे नक्षलप्रभावित, अतिदुर्गम, जंगलव्याप्त भाग आहे. येथे अनेक भागात वाघाची व हिस्त्र पशुंची दहशत आहे. त्यामुळे आम्ही राज्यचे ऊर्जामंत्री, तसेच महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून राजुरा विधानसभा क्षेत्रातील तसेच अशा सर्व भागातील रात्रीचे भारनियमन रद्द करण्यात यावे अशी मागणी केली आहे. या भागात भारनियमन करायचेच असल्यास ते दिवसा करण्यात यावे अशी सूचना सुध्दा केली आहे. यावर मा. ऊर्जामंत्री नितीन राऊत तसेच महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्रातील रात्रीचे भारनियमन रद्द न केल्यास आपण स्थानिक जनतेच्या हितासाठी महावितरणच्या विरोधात जन आंदोलन उभारून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरू अशी तीव्र नाराजी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी माध्यम समूहाच्या प्रतिनिधींशी सध्या सुरू असलेल्या भारनियमन समस्येवर बोलताना आपले मत व्यक्त केले तसेच सध्या सुरू असलेल्या भारनियमनाचा निषेध केला. तसेच या प्रसंगी त्यांनी गोंडपिपरी तालुक्यातील तोहगांव, पाचगाव या भागात वाघाच्या दहशतीला आवर घालून बंदोबस्त करावा आणि गोरगरीब जनता, शेतकरी, शेतमजूर यांचे व त्यांच्या जनावरांचे रक्षण करावे अशा सुचना वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्याचेही स्पष्ट केले.