ब्यान्नव वर्षापूर्वीचा ८ एप्रिल स्वातंत्र्याच्या जवळ नेणारा ऐतिहासिक दिवस!*………प्रतिक पाटोळे

लोकदर्शन 👉 राहुल खरात

 

तीस कोटी भारतीयांचा आवाज निर्दयी इंग्रज साम्राज्यवादी काळजा पर्यंत पोहचवण्यासाठी, बहिऱ्यांना ऐकवण्यासाठी क्रांतिकारकांनी मोठा धमाका केला तेही कसलीही जिवितहानी न होऊ देता, आत्मसमर्पण केलं, हसत फासावर गेले.

8 एप्रिल 1929 रोजी सध्याच्या संसद भवनात, तत्कालीन असेंम्बली मध्ये अभेद्य सुरक्षा भेदून बटुकेश्वर दत्त व भगतसिंग यांनी बॉम्ब फेकला. *क्रांतिकारकारक मानवतेवर प्रचंड प्रेम करायचे, त्यांच्याकडे जात-धर्म-पंथ, प्रांत, वर्ण, वैचारिक अशा प्रकारचा कसलाच भेद नव्हता.* मानवजातीची सेवा करणे हेच अंतिम उद्दिष्टे होते. माणसा कडून माणसाचे होणारे शोषण थांबवण्यासाठी आत्मसमर्पण केले. क्रांतीचा लढा उभारला.

ते शत्रूच्या जीवाचे ही मोल जाणून होते. म्हणूनच बॉम्ब फेकताना कोणालाही इजा होऊ नये याची विशेष काळजी घेतली. मनुष्य हत्या हा त्यांचा उद्देश नव्हता. *असेंम्बलीत फेकलेल्या बॉम्ब मुळे फक्त एका रिकाम्या बाकड्याची मोडतोड झाली, आणि साधारण पाच-सहा माणसांना थोडेसे खरचटले. मुळात तो बॉम्ब कमी तीव्रतेचा बनवलेला.* क्रांतीकारकांनी मनात जरी आणले असते तरी कित्येक रानटी इंग्रजांचे शरीर बॉम्बच्या धमाक्याने छिन्नविच्छिन्न केले असते. पवित्र असेंम्बली मध्ये इंग्रजांच्या विषारी रक्ताचा सडा अन् हाडामांसाचा खच्च पाडला असता. लाखो भारतीय कामगारांच्या हक्कांना गिळकृत करणाऱ्या सर जॉन सायमनच्या ही शरीराचे तुकडे केले असते. पण नाही क्रांतिकारक हिंसक किंवा माथेफेरु नव्हते. ते प्रचंड नम्र व अभ्यासू होते. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे मोठा अर्थ दडलेला असायचा. क्रांतीकारकांच्या कूटनीतीमुळे जगातील भव्य, निर्दयी इंग्रज साम्राज्याला ही क्रांतिकारकांच्या पुढे गुडघे टेकावे लागले.

असेंम्बली मध्ये बॉम्ब फेकला. धुराचे लोट लागले, पळा-पळ सुरू झाली. सगळे जिवाच्या आकांताने सैर-वैर धावत होते. भगतसिंगांनी जवळची पिस्तुल टेबलवर ठेवली. बंदुकीच्या फैऱ्यांनी बेईमानी इंग्रजांची मस्तक उडवावी, पळून जावं अशा विचारांचा स्पर्श देखील त्यांना झाला नाही. मनुष्य हत्या करायची नव्हती. बटुकेश्वर दत्त, भगतसिंग दोघेही स्थब्दपणे उभे राहिले. बंदूकधारी पोलिसांनी त्यांना घेरले. ‘इन्कलाब जिंदाबाद, साम्राज्यवाद मुर्दाबाद’ अशा पहाडी घोषणांनी परिसर दणाणून गेला. संपूर्ण जगभरात चर्चा झाली. क्रांतिकारकांचे म्हणणे जगाला समजले. इंग्रजांची नाचक्की झाली. भारतीय पेटून उठले. प्रत्येकाच्या मनात क्रांतीची आग पेटली. याआधी संपूर्ण भारतीयांच्या मनात क्रांतीची आग पेटवणे कोणालाच शक्य झाले नव्हते. ही किमया भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी घडवली. क्रांतिकारकांच्या तत्वनिष्ठ कृतीमुळे भारतीयांमध्ये देशभक्ती उफाळून आली. गुलामगिरीत जगणारे, आणि मेलेले भारतीय ही जिवंत झाले. 8 एप्रिल हा दिवस ऐतिहासिक व भारतीय स्वातंत्र्याजवळ पोहचवणारा ठरला.

*8 एप्रिल 1929 ला फेकलेला बॉम्ब हा जगाला प्रेरणा देणारा ठरला. मानवतेसाठी क्रांतिकारक काय करू शकतात हे दर्शवणारा ठरला. त्यामुळे आजच्या (8 एप्रिल) दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.*

सद्या धर्मांधतेचे वारे वाहत आहे. द्वेषाचे विष वातावरणात निपजते आहे. वैचारिकता, जात-धर्म-पंथ, प्रांत यामध्ये कट्टरतेचं प्रमाण वाढलंय. माणसा-माणसांमध्ये जाती – जातींमध्ये प्रचंड व्देष निर्माण केला जातोय. हे क्रांतीकारकांच्या विचारांना तिलांजली देणारे आहे. असेंम्बली मध्ये बॉम्ब फेकल्यानंतर 6 जून 1929 रोजी सेशन जज्ज न्या. लिओनीआ मिडल्टन यांच्या कोर्टात भगतसिंगाने व बटुकेश्वर दत्त यांनी ऐतिहासिक निवेदन दिले. ते निवेदन समजून घेण्याची व समस्त देशवासियांना अंगीकृत करण्याची गरज आहे. त्या निवेदनामध्ये क्रांतिकारकांचे विचार, मानवतेवरील प्रेम स्पष्ट होते. त्यातील काही भाग पुढीलप्रमाणे,

*”मानवतेबद्दल आम्हाला हार्दिक सद्भावना आणि निस्सीम प्रेम वाटत असल्यामुळे निरर्थक रक्तपातापासून तिला वाचवण्यासाठीच, केवळ इशारा देण्याकरिता आम्ही या उपायाचा आधार घेतला.*

*या घटनेमध्ये मामुली जखमी झालेल्या व्यक्तींबद्दल किंवा असेंब्लीमधील कुणाही दुसऱ्या व्यक्तीबद्दल आमच्या मनात थोडीही वैयक्तिक द्वेषभावना नाही हे सांगण्याची जरुरी नाही. याउलट, आम्ही पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की मानवी जीवनाला आम्ही अत्यंत पवित्र मानतो. दुसऱ्या कुणा व्यक्तीला इजा करण्याऐवजी मानवजातीची सेवा करता करता आम्ही स्वतः हसत हसत प्राणार्पण करू. मनुष्यहत्या हेच ज्यांचे काम असते त्या साम्राज्यशाहीच्या भाडोत्री सैनिकांसारखे आम्ही नव्हेत. आम्ही मानवी जीवनाची कदर करतो आणि त्याचे रक्षण करण्याचा सतत आटोकट प्रयत्न करतो. असे असूनही आम्ही हे मान्य करतो, की आम्ही जाणूनबुजून असेंम्बलीत बॉम्ब फेकले.”*

-प्रतिक दिपक पाटोळे.
विद्यार्थी-तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालय वारनानगर.
मो.नं.7559198475

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *