लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथील कोविड कंत्राटी अधिपरिचारीका व अधिपरिचारक यांना एन.एच.एम. किंवा तत्सम पदभरतीमध्ये प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
या मागणीसंदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी श्री अजय गुल्हाने यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी जिल्हाधिका-यांशी झालेल्या चर्चेत आ. मुनगंटीवार म्हणाले , कोविड काळात कंत्राटी अधिपरिचारीका व अधिपरिचारक यांनी दिनांक २८.८.२०२० पासून आजपर्यंत आपली सेवा शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय चंद्रपूर येथे दिलेली आहे. दिनांक २३.३.२०२२ रोजी प्रसिध्द झालेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मीक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद चंद्रपूरच्या यादीमध्ये ते पात्र झाले आहेत. त्यामुळे एनएचएम (राष्ट्रीय आरोग्य अभियान) मध्ये होऊ घातलेल्या पदभरतीमध्ये किंवा तत्सम पदभरतीमध्ये त्यांना सर्वप्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे.कोविड काळात आपले जीव धोक्यात घालून त्यांनी जी सेवा दिली आहे ती अतिशय महत्वाची आहे. या अधिपरिचरिका व अधिपरिचारक खऱ्या अर्थाने कोरोना योद्धे आहेत. त्यामुळे त्यांना या पदभरती मध्ये प्राधान्य मिळणे अत्यंत आवश्यक आहे असेही आ. मुनगंटीवार म्हणाले. या संदर्भात आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे यांच्याशी आपण प्रत्यक्ष भेटून चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.
या संदर्भात सकारात्मक प्रस्ताव त्वरित शासनाला सादर करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी श्री अजय गुल्हाने यांनी यावेळी दिले.
मनपा सदस्य सुभाष कासनगोट्टूवार यांच्या नेतृत्वात कार्यरत एन.यु.एच.एम. कर्मचारी बालाजी जाधव, लोमेश गंपलवार, निता शेडमाके, ऐश्वर्या सोनटक्के, रिना धुर्वे, अश्विनी कुमरे, मिथुन लोहकरे, अनिता बद्देलवार, स्मिता उराडे, अनिता जाधव, भाविका राऊत, प्रियंका लभाने, प्रिती ताटे, संगीता पेंदाम, सोनाली भाकरे, पल्लवी डांगरे, प्रियंका लभाने, प्रिती ताटे, शकुंतला नैताम, सोमन ऐवले, प्रियंका वानखेडे यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.