लोकदर्शन 👉 राहुल खरात
भारतातील महापुरुषांना इथल्या जातिव्यवस्थेत अजूनही अडकलेल्या करंटे लोकांनी आप आपल्या जातीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न केल्याने समाजात जातजाणिवा अधिक घट्ट बनत चालल्या आहेत अन हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे.संविधानातील मूल्यांना भाषणात वापरायचे पण प्रत्यक्ष आचरण करताना जातीला धर्माला अधिक महत्व द्यायचे हा राजकारण्यांचा धंदा आहे. महापुरुषांचे कार्य खूप मोठे असून त्यांची तुलना तर अजिबात करू नका.जातीत बंदिस्त करू नका. आतापर्यंत हा मानवाने केलेला करंटेपणा सोडून द्या असे आवाहन 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पलूस येथे व्यक्त केले.पुरोगामी चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्या कॉम्रेड कमल मदने त्यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित साहित्यिक गप्पा या विशेष कार्यक्रमात ते बेधडकपणे आपले मत मांडत होते. डॉक्टर अमोल पवार सांस्कृतिक हॉल मध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ विचारवंत भाई व्ही.वाय आबा पाटील,भाई संपतराव पवार, डॉ.अमोल पवार, डॉ. साधना पवार, कॉम्रेड मारुती शिरतोडे, ॲड. दिपक लाड यांची विशेष उपस्थिती होती.प्रारंभी श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते कॉम्रेड कमल मदने यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.भाई संपतराव पवार यांच्या हस्ते श्रीपाल सबनीस यांचा तर डॉ. साधना पवार यांच्या हस्ते सौ. सबनीस यांचा सत्कार करण्यात आला.डॉक्टर अमोल पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केल्यानंतर झालेल्या साहित्यिक गप्पा यामध्ये बेधडकपणे आपली मते मांडताना सबनीस म्हणाले की डावे अथवा उजवे हे आता स्वच्छ राहिले नसून त्यांच्याजवळ ज्या मूल्यात्मक चांगल्या गोष्टी आहेत तेवढ्याच आपण स्वीकारायला हव्यात. डाव्या चळवळीत, पुरोगामी चळवळीत होणाऱ्या कार्यशाळा आता बंद होत चालल्या असून सुधीर बेडेकरांची मागोवा आता कुठे आहे? एकेकाळी जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आक्रमकपणे रस्त्यावरची लढाई करणारे डावे सध्या जनाधार कमी होत चाललेले पक्ष म्हणून ओळखू लागले आहेत. राजकारणात डावपेचांनी जाती-धर्माचा नको तेवढा वापर राजकीय लोकांनी केल्यामुळे समाजाचे वाटोळे होत चालले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनिय कार्यावर बोलताना ते म्हणाले की राजमाता जिजाऊ सारखी स्वराज्याची आई शिवाजींच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती ही जगातील सर्वात मोठी गोष्ट आहे हे कधीच आपण विसरता कामा नये. परंतु शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक गोष्टीवर विकृत पद्धतीने इतिहासात काही गोष्टी घुसडणार्या विद्वान इतिहास संशोधकांच्या पुराव्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उभे करून लोकांनी प्रत्येक गोष्ट विवेकावर तपासून पाहायला हवी अशीही अपेक्षा व्यक्त केली. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणताना त्यांच्या विचारांची, कार्याची पद्धतच आपण तपासून पाहत नाही असे सांगून या तिघांच्या सर्वच गोष्टीत साम्य नसून बऱ्याच गोष्टीत विसंगती आहे हे सांगितले.आपण अशा महापुरुषांचा वापर संवादासाठी करताना प्रत्येक महापुरुषांची संवादासाठीची साम्यस्थळे शोधुन बोलायला हवे सरसकट विधाने करत बसू नये अशी अपेक्षा व्यक्त केली.महात्मा फुले,आंबेडकर महात्मा गांधी, मार्क्स, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, विठ्ठल रामजी शिंदे,आगरकर ,शाहू,अशा महामानवांचे विचार व कार्य यांचा तौलनिक अभ्यास नव्या पिढीने करावा अन विवेकावर आधारित सत्य सर्वांना सांगायला हवे. साहित्यिकांच्या भूमिकेवर बोलताना श्रीपाल सबनीस यांनी साहित्यिकांची भूमिका ही अतिशय नेभळट असून साहित्यीकांनी केवळ एखादी कविता, गीता कथा लिहून समाधान मानण्यापेक्षा समाजपरिवर्तनासाठीची भूमिका घेऊन लिहायला हवे यावर जोर दिला. पानसरे दाभोळकर यांचे काम जाती धर्माच्या पलीकडे जाऊन विवेकावर आधारित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी होते हे आपण विसरता कामा नये याची आठवण त्यांनी करून दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉम्रेड मारुती शिरतोडे यांनी केले तर आभार पत्रकार दीपक पवार यांनी मानले. यावेळी झालेल्या चर्चेत अडवोकेट दीपक लाड, सुनील गुरव ,दीपक पवार ,विलास साठे ,विशाल शिरतोडे ,हिम्मतराव मलमे, देव कुमार दुपटे,चव्हाण सर, रवी राजमाने, शिंदे सर, बाळासो खेडकर, प्रा. संपतराव पार्लेकर अशा अनेकांनी भाग घेतला.