स्वातंत्र्य लढ्यातील हजारो उपेक्षित क्रांतिकारकांचा प्रेरणादायी इतिहास नवीन पिढीसमोर आणणे आवश्यक* *कॉम्रेड मारुती शिरतोडे

लोकदर्शन 👉राहुल खरात


भारताचा स्वातंत्र्यलढा हा जगातील एक प्रदिर्घकाळ चाललेला रोमहर्षक स्वातंत्र्यलढा असून या स्वातंत्र्यलढ्यात झोकून दिलेल्या हजारो उपेक्षित क्रांती विरांच्या कार्याचा प्रेरणादायी इतिहास नवीन पिढीसमोर आणणे आवश्यक आहे असे आग्रही मत इतिहास अभ्यासक कॉम्रेड मारुती शिरतोडे यांनी आज रामानंदनगर तालुका पलूस येथे केले व्यक्त केले. क्रांती अग्रणी डॉ.जी डी बापू लाड जन्मशताब्दी वर्ष व भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष यानिमित्त आयोजित आचार्य शांताराम बापू गरुड प्रबोधन व्याख्यान मालेतील तिसरे पुष्प गुंफताना ते प्रमुख वक्ते म्हणूंन बोलत होते. अध्यक्षस्थानी पुरोगामी विचारवंत भाई व्ही.वाय.(आबा)पाटील होते.” भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील उपेक्षित क्रांतिकारकांचे योगदान” या विषयावर बोलताना कॉम्रेड मारुती शिरतोडे म्हणाले की आपल्या देशाचा स्वातंत्र्यलढा हा चार टप्प्यात लढला गेला असून या लढ्यात झालेले साडेतीन लाख हुतात्मे तर हजारो लाखोनी भोगलेला कारावास,भूमिगत राहून देशासाठी काम करत, महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. परंतु या सर्वांचेच कार्य इतिहासाच्या पाना पानात आलेले नसून उपेक्षित क्रांतिकारकांच्य कार्या चा इतिहास नवीन पिढी समोर आणणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक, संगोळी रायान्ना, कित्तूरची राणी चन्नम्मा, राजगुरू, सुखदेव ,जतींद्रनाथ दास,क्रांतीवीर वीर सिंदूर लक्ष्मण ते चलेजाव चळवळीच्या लढ्यात मोठी कामगिरी केलेले सांगली जिल्ह्यातील सांगलीच्या जेलफोड आंदोलनातील क्रांतिकारकांचे कार्य,बिळाशी जंगल सत्याग्रहातील क्रांतिकारकांचे कार्य ,1857च्या उठावातील हुतात्मा झालेला कुंडलचा नाना रामोशी ते महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीतील तात्याबा रोडे,धोंडीबा कुंभार, सावित्रीबाई रोडे रामोशी अशा उपेक्षित क्रांतिकारकांच्या जीवावर उदार होऊन केलेल्या कार्याचा परिचय त्यांनी आपल्या ओघवती भाषणात करून दिला. सांगली जिल्ह्यातील चलेजाव चळवळीतील 3 सप्टें.1942 च्या तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चा,10 सप्टे.1942 चा इस्लामपूर मोर्चातील क्रांतिवीरांचा धाडशी सहभाग व जत तालुक्यातील वीर सिंदूर लक्ष्मण चा स्वातंत्र्यलढ्यातील रोमहर्षक सहभाग सांगून सध्या सिंधूरला होणाऱ्या त्यांच्या स्मारक,पुतळ्यास आमदार अरुण लाड करीत असलेली भरीव मदत त्यांनी सांगितली.उपेक्षित क्रांतिकारकांचे कार्य हे खूप मोलाचे कार्य असून जरी ते इतिहासाच्या पानावर आले नसले तरी नवीन पिढीला ते निश्चितपणे दिशादर्शक आणि प्रेरणादायी ठरेल अशा स्वरूपाचे भरीव कार्य आहे यावर त्यांनी भर दिला. या व्याख्यानमालेचे स्वागत प्रास्ताविक प्रा.आदम पठाण सर यांनी केले तर आभार प्रा. रवींद्र येवले यांनी मानले. प्रारंभी थोर स्वातंत्र्य सेनानी समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक आचार्य शांताराम बापू गरुड यांच्या प्रतिमेस प्रमुख वक्ते कॉम्रेड मारुती शिरतोडे ,पी.के.माने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या व्याख्यानमालेस दीपक घाडगे,हिम्मतराव मलमे,बाळासाहेब खेडकर,पद्माकर मिठारी,संतोष खेडकर,अनिल सोळवंडे,प्राचार्य तानाजीराव चव्हाण, प्रा.उत्तमराव सदामते,संपतराव गायकवाड,,संभाजी सदामते,विशाल नावडकर,उत्तम सुतार,महेश जाधव, पाटील,विष्णू रोकडे,अरविंद साठे,विजय कोडग,ए.बी.सागरे,पिरजादे,शौकत पठाण,मुकूंद खारगे,शिवाजीराव इंगळे,जनार्दन पाटील,आशिफ नदाफ,अन्सार शिकलगार, टि.जी.अनुगडे सह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *