लोकदर्शन 👉 राहूल खरात
●रविराजे उपाध्ये, रायपूर, छत्तीसगड,
छत्तीसगड ;
तिबेटी बौद्धांचे सुप्रसिद्ध नेते परमपूज्य १४ वे दलाई लामा यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न ‘ प्रदान करणे विषयी त्यांचे विद्यार्थी व मित्र यांचेकडून मतदान मोहीम सुरू करण्यात आली आहे. ज्ञान विज्ञान आणि करुणा यावर आधारित प्राचीन बौद्ध संस्कृतीच्या प्रचारासाठी अनन्यसाधारण योगदान देणारे दलाई लामा यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न ‘ प्रदान करण्यासाठी ३ मार्च २०२२ पासून ही अनोखी व सद्भावनापूर्ण मोहीम सुरु होत आहे. सदरची मोहीम ही चार महिन्याच्या कालावधीत म्हणजे दि. ३ मार्च २०२२ पासून ते दलाई लामा यांचा जन्म दिनांक ३ जुलै २०२२ पर्यंत राबविण्यात येत आहे. यासाठी www.bharatratnafordalailama.in वेबसाईट वर स्वतंत्र पेज खोलून मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मोबाईल द्वारे मिस्कॉल देण्यासाठी +917065506767 हा नंबर खुला करण्यात आलेला आहे, या नंबर वर मीस कॉल देवून कमीत कमी तीन रिंग जावू द्याव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे.
मोहिमेचा शुभारंभ करताना रेणुका सिंग व त्यांचे सहाध्यायी डॉक्टर दुधाणे, कु. दीप्ती चंद्रशेखर, एलरॉय फर्नांडिस, रवि वर्मा, रिमा हुसेन, राधा राधाकृष्णन, लोकेश जिंदाल
यांनी विनंती केली आहे की तिबेटचे अध्यात्मिक नेता १४ वे दलाई लामा तेन्झिन ग्यात्सो हे सन १९५९ पासून भारताचे रहिवासी असून त्यांचे ऐतिहासिक योगदान लक्षात घेवून त्यांना भारतरत्न प्रदान करण्याच्या मोहिमे मध्ये सर्वांनी सामील व्हावे.
दलाई लामा हे जगभरात करुणेचे बुद्ध आणि शांतताप्रिय नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक संघर्षाचा सामना मोठ्या शांततेने, संयमाने, अहिंसा आणि दयाळू अंतःकरणाने केलेला आहे. वैश्विक बंधुत्वासाठी त्यांचा चिरस्थायी प्रयास लक्षणीय आहे. कोविड-१९, हवामान बदलाचे आपत्तीजनक परिणाम या विषयी जनजागरण असो किंवा मानवतेला विभाजित करणाऱ्या फुटीरतावादी शक्तींच्या आव्हानाचे जवाबदारीने निराकरण करणे असो, त्यांच्या वैज्ञानिक मनाची भेदक दृष्टी दिसून येते.
आज अतिउपभोक्तावाद आणि सांस्कृतिक- राजकीय कलहामुळे निराश झालेल्या सर्व लोकांसाठी उपाय म्हणून ते प्रेम, करुणा, क्षमा आणि सहिष्णुतेवर आधारित ‘मध्यम मार्ग’ सुचवीत आहेत. दलाई लामा हे जागतिक स्तरावर मानवतावादी म्हणून वंदनीय आहेत. ते आता ८७ वर्षांचे आहेत. भारतातील लोकांद्वारे त्यांना सर्वोच्च सन्मानाने ओळख देण्याची वेळ आली आहे. एक राष्ट्र म्हणून भारताचा खरा मित्र आणि पुत्र या नात्याने कौतुकाचे प्रतीक म्हणून आपण त्यांना भारतरत्न सन्मान प्रदान करण्यात समर्थन देऊ शकतो. भारतासाठी आणि मानवतेसाठी त्यांची अतुलनीय आणि आजीवन सेवा लक्षात घेवून त्यांना 1989 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला तसेच विविध विद्यापीठे आणि देशांद्वारे 150 हून अधिक महत्त्वपूर्ण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.
त्यांनी बुद्ध शाक्यमुनी आणि आपल्या देशातील नालंदा विश्व विद्यालयाच्या मूळ शिकवणी आत्मसात केल्या आहेत. भगवान बुद्धांचा बौद्धिक आणि भावनिक वारसा त्यांच्या मार्गदर्शनाखाली बहरत आहे. त्यांचे अनेक सामाजिक व शैक्षणिक प्रकल्प, आंतर-धर्म संवाद, शास्त्रज्ञांसोबतचे ‘मन आणि भावनांवरील व्याख्यान’ सर्व विदित आहे. विशेषत: तिबेटी बौद्ध संस्कृती आणि पर्यावरण यांच्या जतनासाठी त्यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना उत्कृष्ट यश मिळाले आहे. त्यांचे करुणामय व्यक्तित्व भारतासाठी एक अलंकार आहे. तरी सुजाण वाचक +917065506767 या नंबर वर मीस्कॉल देवून आपले मतदान करतील , अशी अपेक्षा करण्यात हरकत नाही.