लोकदर्शन 👉 मोहन भारती
बालविकास प्रकल्प कार्यालयाद्वारा पंचायतराज संस्थेतील महिला प्रतिनिधींच्या प्रशिक्षणाचे आयोजन.
राजुरा (ता.प्र) :– बाल विकास प्रकल्प कार्यालय राजुरा द्वारा आयोजित पंचायत राज संस्थेतील महिला प्रतिनिधी चे तालुकास्तरीय प्रशिक्षण व मेळावा कार्यक्रमाचे आयोजन श्री छत्रपती शिवाजी संकुल राजुरा येथे करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक आमदार सुभाष धोटे यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की, महिला सक्षमीकरणासाठी स्वतः महिलांनी समोर येणे काळाची गरज आहे. अनेक वर्षाच्या संघर्षांनंतर आज प्रत्येक क्षेत्रात महिला आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील महिलांना प्रगती साधता यावी, नेतृत्व सिध्द करता यावे यासाठीच पंचायतराज व्यवस्था उभी करण्यासाठी पुढाकार घेतला होता. आज या संस्थांमधून महिलांनी मोठय़ा प्रमाणावर संधीचे सोने केले असून अनेक महिलांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे ही अभिमानाची बाब आहे असे मत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की महिलांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि अन्य समाजसुधारकांच्या विचारातून प्रेरणा घेऊन आनखी प्रगती केली पाहिजे.
या प्रसंगी संवर्ग विकास अधिकारी श्री किरण कुमार धनवडे, माजी जि प सदस्या मेघाताई नलगे, माजी सभापती कुंदाबाई जेनेकर, निर्मलाताई कुळमेथे, तालुका शहराध्यक्ष तथा माजी नगरसेविका संध्याताई चांदेकर, माजी उपसभापती मंगेश गुरनुले, सौ वैशाली सटाले तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश नगराळे, विस्तार अधिकारी रत्नपारखी यासह राजुरा तालुक्यातील महिला सरपंच, उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.