लोकदर्शन👉 *राजेंद्र मर्दाने*
*वरोरा* : समाज कायद्याने बदलत नाही तर आचार – विचाराने बदलतो, असे मौलिक प्रतिपादन महारोगी सेवा समितीचे सचिव व ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांनी येथे केले. आनंदवनातील भारत जोडो सभागृहात प्रा. गौतम गायकवाड लिखित ‘ जन्माला येतील गांधी ‘ व ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरी साहित्य (आकलन आणि अवलोकन) ‘ या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
याप्रसंगी लातूरचे माजी प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, अंबाजोगाईच्या परिवर्तन साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रा. गौतम गायकवाड, डॉ. दिलीप सावंत, प्रा.बी.एस.बनसोड, प्रकाश घादगीने, महारोगी सेवा समिती, आनंदवनाचे विश्वस्त सुधाकर कडू, सदाशिवराव ताजने, माधव कविश्वर प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. आमटे म्हणाले की, बाबा आमटे यांनी म. गांधींपासून प्रेरणा घेत शहरातील नागरिकांचे मलमूत्र साफ करणाऱ्या सफाई कामगारांमध्ये परमेश्वर अनुभवून त्या समाजाच्या उत्कर्षासाठी संघटना बनवली होती. त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन गांधीजींनी त्यांना ‘ भंगीयोंका बादशहा’ असे संबोधले होते. बाबा आमटे द्वारा निर्मित महारोगी सेवा समिती ही एकमेव संस्था जागाच्या नकाशावर आहे. संमितीने११ लाख कुष्ठरोग्यांशी डील केली आहे. आजही अनेक कायदे कुष्ठरुग्णांच्या विकासासाठी अडचणींचे ठरत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
डॉ. सोमनाथ रोडे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर गांधीवादी मार्गापासून तथागत बुद्धांपर्यंत पोहोचले, तर म. गांधी बुद्धांच्या अहिंसा मार्गापासून वर्णव्यवस्था विरोधी डॉ. आंबेडकरांजवळ पोहचले. सध्याच्या परिस्थितीत म. गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्या असहमतीपेक्षा त्यांची सहमती नजरेस आणणे हे देश, समाजासाठी गरजेचे आहे. वस्तुतः आज आपला देशात जे निरनिराळेत प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी या दोन्ही महापुरुषांना सोबत घेऊन जाणे, ही काळाची गरज आहे. ते म्हणाले की, भारतीय इतिहासात हिंदूंचा विवेक जागवण्याचे काम म. गांधी यांनी केले तर वंचित, उपेक्षित, अस्पृश्य, बहिष्कृत, मागासवर्गीय व शोषित यांना आत्मभान मिळवून देण्याचे महान ऐतिहासिक कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. फुले, शाहू, आंबेडकर व अण्णाभाऊंच्या विचार छायेत वावरणाऱ्या एक भावनाशील, परिवर्तनवादी, निर्भीड व संघर्षशील कार्यकर्ता हीच प्रा. गौतम गायकवाड यांची खरी ओळख आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
आपल्या मनोगतात प्रा. गायकवाड म्हणाले की, म. गांधी व डॉ. आंबेडकर या दोन महनायकांचे स्वभाव अगदी भिन्न होते. त्यांच्या विचार पद्धतीत पुष्कळ फरक होता. त्यांच्यात वारंवार संघर्ष झाला. असे असूनही त्यांचे कार्य राष्ट्र उभारणीसाठी परिणामतः परस्परपूरक ठरले. श्रद्धेय बाबा आमटे यांच्या आनंदवनात पुस्तकांच्या प्रकाशन सोहळा होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी दिलीप सावंत व प्रकाश घादगीते यांचेही समयोजित भाषणे झालीत.
सुरुवातीला प्रमुख मान्यवरांचा उपस्थितीत डॉ. विकास आमटे यांच्या हस्ते प्रा. गौतम गायकवाड यांच्या दोन्ही पुस्तकांचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. तत्पूर्वी कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांचा शाल तथा आनंदवन प्रयोगवन पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रवीण मुधोळकर, राजेंद्र मर्दाने, डॉ.यशवंत घुमे, आनंदवनचे कार्यकर्ते, राजेश ताजने, जगदीश दिवटे, ऋषिकेश मोरे, विजय भसारकर, रमेश बोपचे, बक्षी, विजय पिल्लेवान, दिशा राखळे, संभाजी कडेकर, इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन आनंदवनाचे कार्यकर्ते दीपक शिव यांनी केले.
कार्यक्रमात आनंदवनाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.