लोकदर्शन 👉 सतीश बिडकर
⭕*माणिकगड प्रदूषणविरोधी बॅनर्सची सर्वत्र चर्चा*
⭕*सिमेंट कंपनी अधिकारी व लोकप्रतिनिधीवर नागरिकांचा रोख=*
गडचांदूर :
नुकतेच महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात माणिकगड सिमेंट कंपनीच्या प्रदूषणाचा मुद्दा सभागृहात चर्चेला न आल्याने नागरिकांत मोठा रोष निर्माण झाला. आमदार चषक कार्यक्रमात माणिकगड कंपनीचे अधिकारी यांना आमंत्रित केल्याने गडचांदूरकर चांगलेच चिडले. प्रदूषण कृती समितीने गावातील मुख्य चौकांत ठिकठिकाणी बॅनर्स लावले तर नागरिकांनी हजारोच्या संख्येने व्हॉट्स ॲपला उत्स्फूर्तपणे स्टेटस ठेवत माणिकगड सिमेंट कंपनीच्या प्रदुषणाचा निषेध नोंदविला. आज दिवसभर प्रदूषणाच्या मुद्द्यावर ठिकठिकाणी चर्चा ऐकायला मिळाली.
माणिकगड सिमेंट कंपनीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. या अनुषंगाने नागरिकांनी क्षेत्रातील विद्यमान आमदार यांची मागील महिन्यात भेट घेतली. त्यावेळी हा प्रश्न गंभीर असल्याने यावर येणाऱ्या अधिवेशनात तारांकित प्रश्न अथवा लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न मांडण्याचे आश्वासन आमदार महोदयांनी दिले होते. नुकतेच विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात माणिकगड सिमेंट कंपनी प्रदुषणाचा प्रश्न चर्चेला न आल्याने लोकप्रतिनिधी यांना आश्वासनाचा विसर पडल्याच्या आशयाची बातमी बिडकर यांनी लावली, त्यांनतर अनेक पत्रकारांनी विविध पोर्टलला या आशयाच्या बातम्या लावल्या आणि गडचांदुर परिसरात या बातमीची जोरदार चर्चा झाली.
आमदार चषक कार्यक्रमात माणिकगड सिमेंट कंपनीचे अधिकारी येणार असल्याने नागरिकांनी संधी हेरली. गडचांदूर प्रदूषण कृती समितीने गावात सर्वत्र बॅनर्स लावले. प्रदूषित गडचांदूर नगरीत स्वागत करत अनोखे बॅनर्स लावले. गडचांदूर येथील माणिकगड प्रदूषण कधी थांबणार ? प्रदूषणाने निर्माण झालेला आरोग्याचा प्रश्न कधी मिटणार ? कंपनी प्रशासनाने ESP व डस्ट कंट्रोलर सिस्टीम कार्यान्वित करावी या आशयाचे बॅनर्स पाहून पहानठेला, दुकान, चषक स्थळ आदी ठिकाणी नागरिकांत प्रदूषण मुद्द्यावर चांगलीच चर्चा बघायला मिळाली.
सर्वपक्षीय राजकीय मंडळी, शिक्षक, पत्रकार, वकील, महिला आदींनी उत्स्फूर्तपणे व्हॉट्स ॲप स्टेटस ठेवले व प्रदूषण नियंत्रण कृती समितीच्या माध्यमातून बॅनर्स लागले त्यामुळे गावातील प्रदूषणाचा मुद्दा प्राथमिकतेने घ्यावे लागेल ही बाब लोकप्रतिनिधी यांना लक्षात येत आहे. येणाऱ्या काळात हा सनदशीर मार्गाने लढा आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहे.