लोकदर्शन 👉 राहुल खरात
आज दिनांक २६ मार्च,२०२२ रोजी जांभूळणी येथे कला व विज्ञान महाविद्यालय, आटपाडी, राष्ट्रीय सेवा योजना व ग्रामपंचायत, जांभुळणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिरास आटपाडीचे मुख्य न्यायाधीश, मा. पाटील साहेब व सहाय्यक न्यायाधीश, टेंगसे साहेब यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकाशी
‘ पोलीस व न्यायव्यवस्था समाजाच्या हितासाठी आहे की गैरहितासाठी आहे ?’ यासंदर्भात चर्चा करून चित्रपट व समाजमाध्यमे यांच्या माध्यमातून पोलीस आणि न्यायालयीन व्यवस्था यांच्या संदर्भात समाजात गैरसमज व भिती पसरवली जाते. खरेतर न्यायव्यवस्था आणि पोलीस यंत्रणा दोन्ही समाजाचे संरक्षण व हीत करणारे दोन महत्वाचे विभाग आहेत. त्यामुळे सामान्य माणसाच्या मनामध्ये त्यांच्याविषयी आपलेपणाची भावना निर्माण झाली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
यावेळी जांभुळणीच्या सरपंच, संगीताताई मासाळ व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, प्रा. नागेश चंदनशिवे, प्रा. भारती देशमुखे व बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष, शिवराम मासाळ या सर्वांनी दोन्ही न्यायाधीशांचे स्वागत केले. त्यानंतर न्यायाधीश, पाटील साहेब यांनी विद्यार्थिदशेत असताना, राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये केलेल्या श्रमदान व प्रबोधनात्मक कार्यक्रमास उजाळा दिला. तसेच त्यानी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांच्याकडून समाजहिताच्या दृष्टीने व राष्ट्रहिताच्या दृष्टीने विधायक कार्यक्रमाची अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी विद्यार्थ्यांशी वेगवेगळ्या विषयावर सुसंवाद साधून, सांगितले की कायदा किंवा पोलीस यंत्रणा या कधीच चुकीचे वागत नाहीत, तर त्यांना समाजातील लोकांच्याकडून चुकीचे वळण लावण्यात येत असते. या यंत्रणांचा सुयोग्य वापर करण्यासाठी सर्व जनतेने जागृत होऊन काम केले, तर आदर्श समाजव्यवस्था निर्माण होण्यास मदत होईल, असे ही मत त्यांनी व्यक्त केले. या चर्चासत्रामध्ये मा. शिवराम मासाळ, प्रा. नागेश चंदनशिवे, प्रा. भारती देशमुखे, प्रा. सचिन सरक, प्रा. बालाजी वाघमोडे, प्रा. डॉ. सुधाकर भोसले यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक व स्वयंसेविका यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर कार्यक्रमाचे आभार कार्यक्रम अधिकारी, प्रा. नागेश चंदनशिवे यांनी मानले.