*लोकदर्शन 👉*राजेंद्र मर्दाने*
*वरोरा* : ज्याप्रमाणे आई आपल्या मुलांना प्राणपणाने जपत सुसंस्कारित करून घडविते त्याचप्रमाणे सरपंचांनी गावाच्या शाश्वत विकासासाठी ग्रामस्थांच्या आईची भूमिका वठवावी, असे मार्मिक प्रतिपादन औरंगाबाद जिल्ह्याच्या पाटोडा येथील राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी येथे केले. स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल, रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट व अखिल भारतीय सरपंच परीषद, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ” ग्रामविकासासाठी गावाचा सहभाग ” या विषयावर मोहबाळा रोडवरील बावणे मंगल कार्यालयात त्यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी तेे बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्याचे माजी विधानसभा उपाध्यक्ष ज्येष्ठ वकील मोरेश्वर टेमुर्डे होते.
व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक ना.गो. थुटे, धनोजे कुणबी समाजाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अधिवक्ता पुरूषोत्तम सातपुते, जिल्हा परिषद चंद्रपूरचे माजी अर्थ व नियोजन तथा बांधकाम सभापती प्रकाशबाबू मुथा, कृषी उत्पन्न बाजार समिती, मुंबईचे माजी सभापती डॉ. विजय देवतळे, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक रमेश राजूरकर, जिल्ह्याचे शिवसेना विस्तारक नित्यानंद त्रिपाठी, महिला सल्लागार सदस्य योगिता लांडगे, स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल, रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा चंद्रपूरच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष रवींद्र शिंदे उपस्थित होते.
पेरे पाटील पुढे म्हणाले की, शुद्ध पाण्याचा वापर, फळझाडे लागवड, ग्रामस्वच्छता, मुलांचे शिक्षण आणि वृद्धांचा सांभाळ ही ग्रामविकासाची पंचसूत्री असून ती ग्रामस्थांनी अवलंबावी. सर्वच बाबींसाठी सरकारवर निर्भर राहणे तसेच त्रयस्थ व्यक्तीकडून गावाचा विकास होईल, अशी आशा धरणे चुकीचे असून ग्रामस्थांनी स्वबळावर प्रामाणिक प्रयत्न केल्यास गावाचा नक्की विकास होतो. आपल्या गावाच्या विकासासाठी आमदार, खासदारांच्या भरोश्यावर राहू नका. महाराष्ट्रात ७ हजार आमदार, देशात ७ हजार खासदार झालेत पण सात गावेसुद्धा ते आदर्श करू न शकल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. देशाला महासत्ता बनवायचे असेल तर माणसाला त्याच्या पायावर उभे करावे लागेल तेव्हा गाव सुधारेल. निवडणूक जिंकण्यासाठी जे डोकं वापरतात तेच डोकं गावाच्या विकासासाठी वापरले तर गावात निश्चितच बदल होईल,अशी आशा त्यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षण नव्हतं, पैसा नव्हता तरी माणूस १०० वर्षे जगत होता आता सर्व सुखसोयी उपलब्ध असतानाही ६० वर्षात मरतो. याला कारणीभूत आजची जीवनशैली आहे. आरोग्य सुदृढ निरोगी राहण्यासाठी गावात शुद्ध पेयजलाची, ग्रामस्वच्छतेची नितांत आवश्यकता आहे. गावाच्या भल्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारा सरपंच, ग्रामसेवक हवा. पेरे पाटील म्हणाले की, त्याच्या गावात ग्राम पंचायतीला ग्रामस्थांकडून न चुकता वर्षांचा ४० लाख रूपये कर जमा होतो. विशेष म्हणजे एकही गावकरी ग्रामपंचायतीचा कर थकवीत नाही. गावातील निराधारही प्रामाणिकपणे वेळेच्या आत कराचा भरणा करतो आणि याच पैशातून गावातील लोकांच्या मुलभूत गरजा पूर्ण करून गावकऱ्यांसाठी निःशुल्क दळण, वायफाय सुविधा, साधे, ठंड, गरम पाणी, सोबतच आरओचे पाणी, घरपोच कचरा संकलन, गावातील महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन, गावातील वयोवृध्दांसाठी मसाज मशीन, दिवाळीत प्रत्येक घरी २५ किलो साखर इत्यादी सोयी – सुविधा पुरविण्यात येतात. तरीही ५ लाख रूपये ग्राम पंचायतीकडे शिल्लक राहतात. हे सरकारी मदतीशिवाय झालेले कार्य आहे, सरकारी पैशाचा उपयोग गावात इतर सोयी सुविधा, योजना कार्यान्वित करण्यासाठी केला जातो. गाव विकासाची ईच्छाशक्ती असेल तर गावातील सरपंच, ग्रामसेवक गावाचे नंदनवन करु शकतो, असेही ते म्हणाले. भास्करराव पेरे पाटील यांनी रवींद्र शिंदे यांच्या भरीव सामाजिक कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.
अध्यक्षीय भाषणात अधिवक्ता टेमुर्डे म्हणाले की, भास्करराव पेरे पाटील यांनी ग्राम विकासाची जी पंचसूत्री सांगितली त्याची दखल देशपातळीवर घेऊन त्यांना दोनदा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मात्र येथील जनप्रतिनिधी निवडून आल्यानंतर गावाचा, क्षेत्राचा विकास साधण्याऐवजी स्वत:चा विकास साधत असल्याची कोपरखळी त्यांनी मारली. पेरे पाटील यांचीे पंचसूत्री आपल्या गावात कशी राबविता येईल, आपले गाव ‘ सुजलाम सुफलाम’ कसे करता येईल याचा सरपंच, ग्रामसेवकांतर्फे विचार होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शिंदे यांनी सुरू केलेले मदतकार्य स्पृहणीय असून त्यांनी गरीब, गरजूंना पुढेही अशीच मदत करावी, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी डॉ. विजय देवतळे, रमेश राजूरकर, प्रकाशबाबू मुथा, रवींद्र शिंदे, नित्यानंद त्रिपाठी, साहित्यिक ना.गो.थुटे, योगीता लांडगे, अधिवक्ता पुरुषोत्तम सातपुते यांची समयोचित भाषणे झालीत.
प्रास्ताविकात दत्ता बोरेकर यांनी मागील दोन वर्षांपासून भद्रावती – वरोरा तालुक्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, विशेषतः कोरोना काळात स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल, रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शिंदे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती दिली.
कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, सामाजिक कार्यकर्ते अधिवक्ता शरद कारेकार, नंदकिशोर वाढई, उमेश काकडे, ज्ञानेश्वर डुकरे, जयंत टेमुर्डे, हर्षल शिंदे, करण देवतळे, सतीश गिरसावळे, गोपाल बोंडे, सेवानिवृत्त सैनिक दिलीप लेडांगे, ग्रामसेवक संघटनेचे प्रकाश खरवडे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमात प्रमुख मान्यवर, व विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
सुरुवातीला प्रमुख मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज व क्रांतीकारक शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले व दीप प्रज्वलन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन अशोक टिपले यांनी केले.
कार्यक्रमात प्रमुख मान्यवर व विविध पक्षाचे पदाधिकारी- कार्यकर्तेे, प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, ग्रामसेवक, शेतकरी, महिला पुरुष हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सर्वश्री खेमराज कुरेकार, अधिवक्ता देवा पाचभाई, प्रदीप महाकुलकर, प्रशांत कोपुला, भास्कर ताजने, बंडू पाटील नन्नावरे, रत्नाकर चटप, मनिषा रोडे, मंगेश भोयर, अश्लेषा भोयर, हर्षल शिंदे आदींनी परिश्रम घेतले.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.