लोकदर्शन : मोहन भारती
दिनांक : 21-Mar-22
पुणे : बंगालच्या उपसागरामध्ये नव्या चक्रीवादळाचे संकेत आहेत. सध्या तेथे कमी दाबाचे तीव्र क्षेत्र आहे. महाराष्ट्रात काही भागात पावसाळी वातावरण निर्माण झाले असले, तरी या चक्रीवादळाचा राज्यावर फारसा परिणाम होणार नाही. रविवारी विदर्भ, मराठवाडय़ात उन्हाचा तडाखा कायम होता. मात्र, पुढील दोन दिवसांत सर्वत्र दिवसाच्या कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
बंगालच्या उपसागरात आणि अंदमानच्या समुद्रात दोन दिवसांपासून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचे रूपांतर २१ मार्चला चक्रीवादळात होणार आहे. दोन दिवस चक्रीवादळाची स्थिती कायम राहणार असून, ते अंदमान, निकोबारच्या दिशेने जाणार आहे. महाराष्ट्रातही दोन दिवसांपासून पावसाळी वातावरण तयार झाले आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊसही झाला. अनेक भागात अंशत: ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. मात्र, चक्रीवादळाचा मोठा परिणाम राज्यावर होणार नाही.
विदर्भात अनेक ठिकाणी अद्यापही कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. मराठवाडय़ात परभणी, नांदेडमध्येही ४० अंश कमाल तापमान असल्याने या भागात उन्हाचा चटका कायम आहे. मुंबई परिसरासह कोकणात सध्या कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या जवळ आला आहे. मध्य महाराष्ट्रात सोलापूर, जळगाव भागात कमाल तापमान ४० अंशापुढे आहे. उर्वरित भागात तापमान सरासरीजवळ आहे.