लोकदर्शन 👉 मोहन भारती
*⭕हत्या,अपघात की सामूहिक अत्याचार….?*
⭕*पोलिसांचा तपास सुरू*
तुकुम तलाव येथे राहणाऱ्या एका 20 वर्षीय युवतीच्या संशयस्पद मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.त्या युवतीवर अत्याचार झाल्याचा आरोप तिच्या सोबतच्या मित्र मैत्रिणींनी केल्याने हे प्रकरण काय वळण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान पोलिसांनी 3 टीम तयार करून तपासाची चक्रे वेगाने फिरविले आहेत.त्या युवतीची हत्या,अपघात की सामूहिक अत्याचाराने मृत्यू…?हे सखोल तपासा नंतरच कळणार आहे.
मृतक युवतीच्या एका मैत्रिणीच्या म्हणण्यानुसार दामिनी(काल्पनिक नाव)बुधवारी 16 मार्चला दुपारच्या सुमारास अभिषेक भटारकर नामक मित्राला भेटावयास गेली.दोघांचे बरेच दिवसापासून प्रेम प्रकरण सुरू होते.अचानक अभिषेकने दामीनीला पुढची भेट(16 मार्च)शेवटची असेल,नंतर आपला कायमचा ‘ब्रेकअप’ होईल असेही सांगितले.या वक्तव्यामुळे दामिनी 3 दिवसापासून प्रचंड दबावात होती.यातच ती अभिषेकला भेटायला गेली.नेहमी प्रमाणे ते दोघे पाठणपुरा गेटच्या बाहेर असलेल्या निर्जनस्थळी भेटले.किमान 4 वाजता अभिषेकने दामिनीच्या मैत्रिणीला अपघात झाल्याची सूचना दिली.आणि स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले.दुसरीकडे दामिनीच्या काही मित्रांनी दामिनीच्या पाहिले खाजगी रुग्णालयात नेले.दामिनीची अवस्था बघून तिला शासकीय रुग्णालयात स्थानांतरित करण्यात आले,परंतु तो पर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती.या घटनेने स्तब्ध झालेल्या दामिनीच्या मित्रांनी पोलिसांशी बराच वाद घातला.दामिनीचा शवविच्छेदन अहवाल आल्याशिवाय काही ठोस भूमिका घेता येणार नाही म्हणून पोलिसांनी स्पष्ट केल्यावर रात्री किमान दीडच्या सुमारास जमावाने काढता पाय घेतला.
*दामिनीच्या मित्रांना आढळले आक्षेपार्ह साहित्य*
पडोळी पोलिसांनी अभिषेकला ताब्यात घेतल्यावर,त्याने अपघात झाल्याचे सांगितले.बोलेरो गाडीने धडक दिली असे त्याचे म्हणणे आहे.पोलसांनी व दामिनीच्या मित्रांनी अभिषेक सोबत घटनास्थळाचा वेध घेतला असता प्रारंभी त्याने मूळ घटनास्थळ सांगितलेच नाही.किमान 3 तासाच्या भटकंती नंतर त्याने पोलिसांना देवाडा रोडवरील क्षितिज 9 या खुल्या प्लॉटच्या ले आऊट वर नेले.ही जागा सद्यातरी मानव रहित आहे.जागेची चाचपणी केली असता तेथे दामिनीच्या रक्ताचे अवशेष,तिला ओढत नेल्याचे त्या मित्रांना जाणवले.हेच नाही तर तेथे इतर आक्षेपार्ह वस्तू होत्या असे,दामिनीच्या मित्रांचे म्हणणे आहे.याच जागेवर दामिनिवर सामूहिक अत्याचार झाला,असा आरोप आता ते मित्र परिवार करीत आहेत.
*डॉक्टरांची त्रीसदस्यीय समिती करणार शवविच्छेदन*
अभिषेक अपघात सांगत असला तरी,दामिनीच्या गुप्तांगातून प्रचंड रक्तस्त्राव झाला हे जीन्स वरील खुणावरून स्पष्ट दिसत होते.यामूळे संतप्त जमावाने शवविच्छेदन योग्य व्हावे ही मागणी केली.या मागणीला दुजोरा देत माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी दामिनीच्या कुटुंबियांची भेट घेत त्रीसदस्यीय समितीद्वारे शवविच्छेदन करण्याच्या सूचना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला केल्या.
*एलसीबी कडे तपास द्या…भाजपा*
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता लोकलेखा समिती अध्यक्ष आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात महानगर भाजपाच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट घेत,या प्रकरणाची एलसीबी मार्फत चौकशी करा अशी मागणी केली आहे.कोणत्याही स्थितीत सत्य समोर आले पाहिजे गुन्हेगार सुटता कामा नये.असे भाजपा(श) जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी केली आहे .यावेळी भाजपा म्हामंत्री सुभाष कासनगोट्टूवार,ब्रिजभूषण पाझारे,रवींद्र गुरनुले,विशाल निंबाळकर यांची उपस्थिती होती.
*हा सामूहिक अत्याचाराचाच प्रकार.*
हा अपघात असल्याचे पोलीस सांगत असले तरी,यावर आमचा विश्वास नाही.सामूहिक अत्याचाराचे हे प्रकरण दिसते.पोलिसांनी या प्रकरणी अत्याचाराचा गुन्हा दाखल करावा,अशी मागणी शिवसेनाचे नगरसेवक सुरेश पचारे यांनी केली आहे.