लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕आमदार सुभाष धोटे यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी.
राजुरा :– महाराष्ट्रातीलन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांच्या ठिकाणी नर्सेसना मदतनीस म्हणून काम करणाऱ्या अंशकालीन स्त्री परिचरांची (PTLA) अवस्था निव्वळ वेठबिगारासारखी आहे. पूर्णवेळ काम करीत असूनही त्यांना अर्धवेळ किंवा अंशकालीन म्हटले जाते हा त्यांच्या वरील अन्याय म्हणावा लागेल. तसेच त्यांना मिळणारे मासिक एकत्रित वेतन फक्त ३००० असून यातूनच त्यांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवास करावा लागतो. मात्र प्रवासभत्ता मिळत नाही. गणवेश दिला जात नाही आणि रजा- सुट्यांचा लाभही मिळत नाही. खरं म्हणजे स्त्री परिचरांच्या एकूण कामाचे स्वरूप बघता त्यांना जिल्हा परिषदेच्या सेवेत त्यांच्या पात्रते प्रमाणे वर्ग ३ व वर्ग ४ च्या पदावर सामावून घेणे न्यायोचित आहे. कारण या महिलांनी अत्यल्प वेतनावर दीर्घकाळ आरोग्य सेवा बजावलेली आहे. कोरोना महामारीच्या कालावधीत या स्त्री परिचरांनी जोखीम पत्करून आरोग्य सेवा केली आहे. म्हणून त्यांना अन्य घटकाप्रमाणे प्रथम लॉकडाऊनच्या काळापासून रूपये १०००/- प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा.
तसेच सदरील स्त्री परिचरांना जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व वर्ग ४ पदावर सामावून घ्यावे. मात्र, तूर्त त्यांना मासिक एकत्रित वेतन रूपये १८००० रुपये द्यावे आणि तातडीने मा. आरोग्य संचालकांच्या शिफारसी नुसार रू.१०००० एकत्रित वेतन देण्यात यावे अशी मागणी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.
या प्रसंगी सुरेश खाडे, किरण पांचाळ, सविता जाधव, भारती रायपूरे, वर्षा उराडे आदिंची उपस्थिती होती.