*नाना पोईनकर खून प्रकरणात संभा बावणेला जन्मठेप*

 

*⭕फरार आरोपीला २२ वर्षांनंतर पोलिसांनी अटक केल्याने झाली शिक्षा*

लोकदर्शन 👉*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा* : पैशाच्या वादाने गंभीर स्वरुप धारण केल्यावर शेगांव येथे दाखल केलेल्या तक्रारीचा राग अनावर झाल्याने आरोपी संभा बावणे याने तक्रारकर्त्या मुलाचे वडील नाना चिंधू पोईनकर ( वय ६० वर्षे) यांच्याशी दि.२ जुलै १९९६ रोजी तालुक्यातील मौजा चारगाव (खुर्द) परिसराजवळील ईरइ नदीजवळ हुज्जत घालून त्यांच्यावर कुऱ्हाडीने प्रहार करीत जागेवरच खून केला होता. सदर प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. के. भेंडे यांनी आरोपी संभा विठू उर्फ बंडू विठ्ठल बावणे ( वय ४८ वर्षे ) रा. अर्जूनी ह.मू. मौजा रूई खैरी ( नागपूर) याला खुनाच्या आरोपाखाली जन्मठेप व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
याबाबत अधिक वृत्त असे की, तालुक्यातील शेगांव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अर्जूनी गावी राहणारा नाना चिंधू पोईनकर ( वय ६० वर्षे ) हा चिवडा विकून आपला उदरनिर्वाह करीत होता. त्याचा मुलगा तुकाराम व पुतण्या रामचंद्र पोईनकर यांचे सोबत पानठेल्यावर पैशाच्या कारणावरून संभा बावणे याच्याशी वाद झाला होता. त्यावेळी माझे पानठेल्यावर भांडण करु नका, असे आरोपीला म्हटले असता आरोपीने तुकाराम याला पानठेल्याबाहेर ओढून मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली तसेच तुकारामांच्या घरी जाऊन त्याच्या आईसही शिविगाळ केली. त्यामुळे तुकाराम याने रामचंद्र याला घेऊन शेगांव पोलीस स्टेशन गाठले व आरोपीच्या विरोधात तक्रार दिली होती. याच दिवशी मंगळवारी चारगाव खुर्द येथे बाजारात चिवडा विक्रीचा धंदा करून नाना पोईनकर सायंकाळी ७.२० वाजताच्या सुमारास बाजार घेऊन आपल्या मित्रासह चारगाव (खुर्द) वरून अर्जूनी या गावाकडे परत येत होता. पावसाळ्याचे दिवस होते. पाऊसही पडत होता. नाना समोर व मित्र मारोती जुंबाडे मागे चालत असताना मौजा चारगाव खुर्द शिवारातील ईरई ( चारगाव) नदी वाटेवर आंब्याच्या झाडाजवळ दबा धरून बसलेल्या आरोपी संभा बावणे याने नाना पोईनकर याला हाक मारली. त्याचे कडून अपेक्षित उत्तर न मिळाल्याने पुन्हा हाक मारली. नाना पोईनकर थांबल्यानंतर आरोपीने त्याला ,’ तुझा मुलगा तुकाराम कुठे आहे?”, अशी विचारणा करीत वाद घातला व शिविगाळ केली. शब्दाने शब्द वाढत गेल्यावर राग अनावर झाल्याने आरोपी संभा बावणे याने काही कळायच्या आत नानाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने जबरदस्त प्रहार केला. त्यामुळे नाना रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळला व घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. नानाच्या मागूनच येणाऱ्या त्याच्या मित्राने हा घटनाक्रम बघितला. संभाचा रूद्र अवतार बघून त्याने पळ काढला व गावातील पोलीस पाटील यांना घटनेविषयीची हकीकत सांगितली. मित्र मारोती केशव जुंबाडे (वय ४५ वर्षे) याच्या फिर्यादीवरून शेगांव पोलीस ठाण्यात संभा विठू बावणे याच्या विरोधात अपराध क्रमांक ५३/१९९६ भा. द. वि.३०२ ,२०१अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास अधिकारी म्हणून एपीआय कृष्णा तिवारी, पीएसआय इ.एस. मेंढे यांनी उपलब्ध पुराव्यांच्या आधारे दोषारोपपत्र तयार करून न्यायालयात सादर केले. आरोपीचा शोध सुरू होता.
घटनेनंतर आरोपी गजाआड होण्याच्या भितीने फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा कसून शोध घेऊनही तो सापडला नाही. शोध सुरू असताना मौजा रुई खैरी (नागपूर ) येथे आरोपी कुटुंबासह राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सपोनि के. आर. तिवारी यांनी पोलीस स्टाफ सह तेथे जाऊन गोपनीय माहिती आधारे १३/२/ २०१९ रोजी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. संभा विठू बावणे हा आपली ओळख लपवून मागील २२ वर्षांपासून बंडू विठ्ठल बावणे या नावाने वावरत होता.
सरकारी वकील मिलिंद देशपांडे यांनी ५ साक्षीदार तपासले. सबळ पुराव्यानिशी आरोपीविरुद्ध आरोप सिद्ध झाल्याने या केसचा अंतिम निकाल आज लागला. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. के. भेंडे यांनी आरोपी संभा विठू बावणे उर्फ बंडू विठ्ठल बावणे याला भा. द. वि.३०२, कलमाखाली जन्मठेप व ३ हजार रुपये दंड व कलम २०१ भादंवी अन्वये ३ वर्ष सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अधिवक्ता मिलिंद देशपांडे यांनी खंबीरपणे बाजू मांडली. कोर्ट पैरवी म्हणून पी सी. संतोष निषाद यांनी कामकाज पाहिले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *