लोकदर्शन संकलन – 👉सुरेखा नेसरीकर.
कोल्हापूर. 9028261973.
12 मार्च 2022.प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचं एक ध्येय असतं किंवा असायला पाहिजे. ध्येय ही अशी गोष्ट असते जी साध्य करण्यासाठी त्या व्यक्तीची प्रयत्नांची पराकाष्टा करण्याची तयारी असते. “एकदा ठरलं, म्हणजे ठरलं” असं म्हणणारे कित्येक लोक आपल्या परिचयात असतील. कोईम्बतुरचा ‘साईनिकेश रवीचंद्रन’ हा एक असाच तरुण आहे ज्याचं आर्मी जॉईन करण्याचं ध्येय होतं.
भारतात आर्मी मध्ये भरती होण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण, जमलं नाही. “लक्ष्य को हर हाल मे पाना है” हे ठरवलेला साईनिकेश रवीचंद्रन युक्रेनला गेला आणि तिथल्या आर्मीत भरती झाला आणि आज तो रशिया विरुद्ध युद्धात लढत आहे.
भारतातील झहीर खान सारखे क्रीकेटपटू जे आपल्या राज्यातून निवड न झाल्याने दुसऱ्या राज्यात जाऊन निवड चाचणी देतात आणि भारतीय क्रिकेट संघात सामील होतात हे आपण ऐकून आहोत. पण, साईनिकेश रवीचंद्रनची स्टोरी ही यापेक्षा फारच वेगळी आहे.
आर्मीत काम करता यावं म्हणून त्याने चक्क देश सोडला ही फार मोठी गोष्ट आहे. युक्रेनच्या सैन्यात चांगली कामगिरी बजावणाऱ्या साईनिकेश रवीचंद्रनची भारतीय आर्मीत का निवड झाली नाही ? त्याने कोणत्या पदवी शिक्षणानंतर हे प्रयत्न केले होते ? जाणून घेऊयात.
२०१८ मध्ये २१ वर्षीय साईनिकेश हा ‘एअरोस्पेस इंजिनियरिंग’चा कोर्स पूर्ण करण्यासाठी युक्रेनला गेला होता. खारकीव्ह येथील ‘नॅशनल एअरोस्पेस युनिव्हर्सिटी’ मध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता. त्याचा हा कोर्स जुलै २०२२ मध्ये पूर्ण होणार होता. पण, त्या दरम्यान हे युद्ध सुरू झालं आणि साईनिकेशचा युद्धामध्ये जॉर्जियन नॅशनल लीग पॅरामिलिटरी युनिट मध्ये समावेश करण्यात आला. साईनिकेश रवीचंद्रनच्या कामगिरीचं नुकतंच तामिळनाडू राज्य सरकारने कौतुक केलं आणि तेव्हा ही माहिती प्रकाशात आली.
टाईम्स ऑफ इंडियाच्या काही प्रतिनिधींनी साईनिकेश रवीचंद्रनच्या घरी भेट दिली आणि त्याच्या या करिअर बद्दल पालकांसोबत विचारपूस केली. साईनिकेश बद्दल बोलतांना त्याच्या पालकांनी सांगितलं की,
“१२ वी ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर साईनिकेशने दोन वेळेस भारतीय आर्मी मध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्याची उंची कमी असल्याने तो निवड चाचणी मध्ये उत्तीर्ण होऊ शकला नव्हता. तो खूप जिद्दी आहे. त्याने आपले प्रयत्न सोडले नाहीत. आर्मी मध्ये काम करता येण्यासाठी त्याने चेन्नई मध्ये स्थित असलेल्या यूएस कॉस्युलेट सोबत संपर्क साधला.
भारत आर्मी नाही तर अमेरिकन आर्मीत काम करू असा त्याचा विचार होता. पण, तेसुद्धा काही कारणांमुळे शक्य झालं नाही म्हणून त्याने सप्टेंबर २०१८ मध्ये खारकीव्ह येथील नॅशनल एअरोस्पेस विद्यापीठाची चौकशी केली. तिथे त्याला एअरोस्पेस शिक्षण आणि आर्मी मध्ये काम करण्याची संधी’ याची खात्री त्याला मिळाली आणि त्याने युक्रेन गाठलं.”
जुलै २०२१ मध्ये साईनिकेश रवीचंद्रन भारतात आला होता आणि एक महिना इथे राहिला होता. तो परत युक्रेन मध्ये गेला आणि त्यानंतर रशिया आणि युक्रेन यांच्यातील मतभेदास सुरुवात झाली. जानेवारी २०२२ मध्ये काही काळासाठी त्याचा आणि परिवाराचा संपर्क तुटला होता. तेव्हा साईनिकेश रवीचंद्रन यांनी भारतीय एम्बेसी सोबत संपर्क साधला तेव्हा त्यांना कळलं की, साईनिकेश हा आता युक्रेनच्या आर्मीचा एक सदस्य झाला आहे.
युक्रेन मधील सध्या सुरू असलेला नरसंहार लक्षात घेता साईनिकेश रवीचंद्रन याने भारतात परत यावं अशी त्यांच्या पालकांची इच्छा आहे. रशियाच्या दुष्कृत्यांमुळे युक्रेन मध्ये सध्या अन्न, पाणी, औषधी यांचा प्रचंड तुटवडा निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत दोन्हीपैकी कोणत्याही एका देशाचा जन्माने नागरिक नसलेला साईनिकेश हा आपल्या जीवाची पर्वा न करता लढत आहे हे सैनिक म्हणून ठीक आहे. पण, एक व्यक्ती म्हणून त्याचे निकटवर्तीय आता त्याने भारतात परतावं हेच मत व्यक्त करत आहेत.
रशिया आणि युक्रेन यांच्यात शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी आयोजित केलेली तिसरी बैठक नुकतीच पार पडली आहे. येत्या १५ मार्च पर्यंत परिस्थितीत सुधारणा होईल आणि दोन्ही देश परदेशातून आलेल्या लोकांना आपल्या मायदेशी परत जाता यावं यासाठी एक ‘कॉरीडोर’ तयार करण्याच्या विचारात आहेत. ही मागील बारा दिवसात घडलेली एकमेव सकारात्मक बाब म्हणता येईल.
साईनिकेश रवीचंद्रन आणि त्यांच्या परिवाराचं फेब्रुवारी २०२२ मध्ये शेवटचं बोलणं झालं होतं. तेव्हा त्याने “आपण ‘विडिओ गेम’ तयार करणाऱ्या कंपनीसोबत काम करत आहोत” असं सांगितलं होतं. पण, तामिळनाडू राज्य सरकारने साईनिकेश युक्रेन आर्मीत भरती झाल्याची बातमी जाहीर केली ही साईनिकेशच्या कुटुंबासाठी खूप धक्कादायक बातमी होती. दोन्ही देशातील वाद लवकरच संपुष्टात यावेत आणि साईनिकेशच्या कुटुंबाचा त्याच्यासोबत संपर्क व्हावा अशी इच्छा व्यक्त करूयात.
* सुरेखा नेसरीकर. कोल्हापूर. 9028261973.*
12 मार्च 2022.