लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
⭕आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला धरले धारेवर
⭕कृषिमंत्री दादा भुसेंनी घेतली गंभीर दखल
मुंबई : मूल येथील कृषी महाविद्यालय अन्यत्र पळविण्याचा घाट सरकार घालत आहे. महाविकास आघाडी सरकारने असे केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा घणाघाती ईशारा महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिला.
कोणतीही सरकारी नस्ती आठवडाभरापेक्षा जास्तवेळ प्रलंबित ठेवता येत नाही. प्रत्येक नस्ती व फाईलवर ४५ दिवसात निर्णय घ्यावा लागतो. असा कायदा असतानाही मूलच्या कृषी महाविद्यालयाची नस्ती व फाईल पाच महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी रोखण्यात आल्याकडे त्यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांचे लक्ष वेधले. महाविद्यालयाची नस्ती अडविणाऱ्यांवर काय कारवाई करणार, असा जाबही त्यांनी विचारला.
‘जय जवान, जय किसान’ असा नारा देश देतो. परंतु अजगरालाही आत्महत्या करायला लावले अशा सुस्त प्रशासनातील अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या नावाने होऊ घातलेल्या महाविद्यालयाचे काम रखडविल्याने ‘जय जवान, जय किसान, पण अधिकारी झाले सैतान, त्यांनीच अडविले कृषी महाविद्यालयाचे काम’, असे म्हणण्याची वेळ आल्याचा संताप आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. विदर्भातील शेतकरी जीवाचा आटापिटा करून अन्न पिकवतो. त्याच शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानयुक्त कृषी शिक्षण घेण्यापासून रोखणाऱ्यांच्या देवही माफ करणार नाही. अशांच्या ताटातील अन्न त्या बळीराजाच्या श्रापाने गायब झाले तर आश्चर्य वाटु नये, अशी कळकळही त्यांनी व्यक्त केली.
कृषी विभागाला आपण सातत्याने स्मरणपत्र देत आहोत, फोन करीत आहोत, परंतु काहींची बुद्धी थोडी कमी ‘जीबी’ची असते, असा टोलाही त्यांनी लगावला. महाविद्यालयाच्या कामात का विलंब होतोय हे स्पष्ट असून सरकारला हे ज्ञानकेंद्र दुसरीकडे पळवायचे असल्याचा आरोपही आ. मुनगंटीवार यांनी केला.
कृषिमंत्री भुसे यांनी यावर उत्तर देताना मूलमधील कृषी महाविद्यालय अन्यत्र हलविण्यात येणार नाही असा शब्द दिला. महाविद्यालयाचे काम रखडविणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. कामकाज लवकरात लवकर पूर्ण व्हावे, याची काळजी घेण्यात येईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.