लोकदर्शन संकलन – 👉संध्या सुर्यवंशी. पुणे.
9028261973.
साभार – – डॉ. रमेश जाधव.
11 मार्च 2022.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या संदर्भात महाराजांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य यासंबंधी अगदी समकालीन आणि त्यांना सांगाती असणारा कविंद्र परमानंदापासून आजपर्यंत इतिहासकार, बखरकार, नाटककार, विचारवंत इत्यादींनी खूप लिहून ठेवले आहे. शिवचरित्र हे वरील सर्वांसाठी सदैव अक्षय असा अमृताचा कुंभ ठरला आहे. शिवाजी महाराजांनी जे लोककल्याणकारी हिंदवी स्वराज्य निर्माण केले ते काही आभाळातून पडले नाही किंवा ज्या शिवरायांनी ते उभे केले तेही आभाळातून एकाकी पडले नाहीत, हा इतिहासकार वि. का. राजवाडे यांचा अमूल्य विचार सदैव लक्षात ठेवावा लागेल.
शिवछत्रपतींच्या जडणघडणीबाबत अगदी पिता शहाजी महाराज, आई जिजाबाई किंवा नेताजी पालकर, कान्होजी जेधे यांच्यासारख्या ज्येष्ठ सांगातींचा कसा सिंहाचा वाटा होता, हे अलीकडे अनेक अभ्यासक साक्षेपाने मांडीत आहेत. प्रस्तुत लेखात शिवछत्रपतींच्या लोककल्याणकारी हिंदवी स्वराज्याची अधिष्ठाने कोणती होती हेच सविस्तरपणे स्पष्ट करावयाचे आहे. अधिष्ठान याचा सर्वसाधारण अर्थ स्थापन करणे असा आहे. त्याचप्रमाणे अधिष्ठान म्हणजे बैठक किंवा विचारधारा असाही अर्थ केला जातो. त्याच अर्थाने आपण शिवछत्रपतींच्या लोककल्याणकारी राज्याचे अधिष्ठान कोणते होते, ते या ठिकाणी लक्षात घेणार आहोत.
सामान्य माणूस नेहमीच शिवछत्रतींच्या जीवनातील त्यांनी रोहिडेश्वरी घेतलेली स्वराज्याची शपथ, दगाबाज अफजलखानाचा वध, बाजीप्रभू देशपांडे यांचे बलिदान, शाहिस्ताखानाची बोटे छाटणे, मिर्झाराजे जयसिंगांशी केलेला तह, आग्य्राहून सुटका, नरवीर तानाजी मालुसरे यांचे बलिदान, राज्याभिषेक, दक्षिण स्वारी यासारख्या घटनांमध्ये रमून जातो. परंतु, शिवचरित्रातील या नाट्यमय घटना स्वराज्यनिर्मितीची साधने असतात. ते साध्य नव्हे! म्हणूनच आपण शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याची साध्ये म्हणजेच अधिष्ठाने कोणती होती, ते पाहणार आहोत. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेला निश्चित अशा प्रकारचे अधिष्ठान होते. त्याशिवाय ते पवित्र कार्य आकाराला येऊ शकले नसते. त्यांच्या या अधिष्ठानाचा मागोवा शिवकालीन पत्रव्यवहार आणि आज्ञापत्रातून घ्यावा लागतो.
मराठीतील पहिले समग्र शिवचरित्रकार म्हणून कृष्णाजी अर्जुन केळूसकर यांना सन्मान द्यावा लागतो. 1907 मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हा ग्रंथ प्रसिद्ध केला. या ग्रंथात शिवछत्रपतींचे हिंदवी स्वराज्य हे महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते, हा विचार सविस्तरपणे मांडला. तोच विचार नरहर कुरूंदकरांनीही मान्य केला. लोकप्रिय सिद्धहस्त कादंबरीकार रणजित देसाई यांच्या ‘श्रीमान योगी’ या प्रसिद्ध कांदबरीच्या प्रस्तावनेत कुरूंदकर लिहितात,‘शिवाजी महाराजांनाही आपण खास महाराष्ट्राचे आहोत याची जाणीव दिसत नाही. उलट महाराष्ट्र ताब्यात घेण्याऐवजी तो कर्नाटकात म्हणजे आजच्या तामिळ प्रदेशात गेला; पण तिथेही आपण परकीय भूमीत आलो आहोत, असे शिवाजीला कधी वाटलेले दिसत नाही.’
स्वसमूह श्रेष्ठतावादातून काही कर्तारसिंग थत्ते यासारखे विकृत विचारवंत शिवरायांचे राज्य हे ‘टीचभर’ असल्याचे जे सांगतात, ते कसे चुकीचे आहे, हे आता लक्षात येईल. शिवछत्रपतींचे राज्य हे कसे लंकेपर्यंत जाऊन भिडले होते, याचे पुरावे आता नीरज साळुंखे यांच्यासारखे अभ्यासक सादर करीत आहेत. म्हणून शिवरायांच्या लोककल्याणकारी हिंदवी स्वराज्याची व्यापकता हे त्याचे पहिले अधिष्ठान मान्य करावे लागेल.
‘राज्यकर्ता’ या नात्याने शिवछत्रपतींनी हिंदुस्थानातील हिंदू-मुस्लीम संघर्षाने केलेले सखोल चिंतन आणि हा संघर्ष नष्ट कसा करता येईल, या द़ृष्टिकोनातून त्यांनी उचललेली पावले. उदा. सैन्यात सर्व धर्मीयांना प्रवेश, मंदिरे, मशिदी, चर्च यांचे पावित्र्य जोपासणे इत्यादी. म्हणूनच यासंदर्भात त्र्यं. शं. शेजवलकर यांच्यासारखे वास्तववादी इतिहासकार ‘शिवाजी म्हणजे पाचशे वर्षांच्या हिंदू-मुसलमान लढ्याचा अन्वयार्थ समजलेला एकमेव कर्ता पुरुष, मुसलमानी संस्कृतीतील सर्व उत्तम अंगे आत्मसात केलेला एक पराक्रमी वीर, हिंदुत्वाचा नितांत अभिमान असलेला एक धर्मनिष्ठ माणूस,’ असे वर्णन करतात. हे हिंदवी स्वराज्याचे दुसरे अधिष्ठान होते.
शिवछत्रपतींना आपण हिंदू असल्याचा जरूर अभिमान होता; परंतु त्यांच्या ठिकाणी असणारा हा अभिमान सहिष्णू हिंदू धर्माचा होता. त्यामुळेच त्यांच्या ठिकाणी सर्वधर्मसमभाव प्रकर्षाने दिसून येतो. किंबहुना शिवरायांची सर्वधर्मसमप्रवृत्ती हे त्यांच्या हिंदवी स्वराज्याचे सर्वांत महत्त्वाचे असे तिसरे तात्विक अधिष्ठान होते, हे त्यांच्या जीवनकार्याचा मागोवा घेत असताना सहज लक्षात येते. त्यामुळेच ते युद्धाच्या धामधुमीत पायदळी पडलेली कुराणाची प्रत आदरपूर्वक परत करतात.
अफजलखान स्वतःला ‘दीनदार बुत्शिकन’ (मूर्तिभंजक) असे मोठ्या गर्वाने म्हणवून घेत असे. त्याने हिंदू देव-देवतांची विटंबना केल्याचे पुरावे मिळतात. याउलट शिवछत्रपती मात्र मशिदी-दर्गे यांना हात लावीत नाहीत. त्यामुळेच कृष्णाजी अनंत सभासद हा समकालीन बखरकार लिहितो, ‘मुलखात देव-देवस्थाने जागजाग होती. त्यास दिवाबत्ती नैवेद्य, अभिषेक स्थान पाहून यथायोग्य पाठविले. मुसलमानांचे पीर मशिदी त्यांचे दिवाबत्ती नैवेद्य (शिवरायांनी) स्थान पाहून पाठविले.’
शिवछत्रपतींच्या स्वराज्याचे आणखी एक महत्त्वाचे असे चौथे अधिष्ठान म्हणजे आयुष्यभर आपल्या विविध शत्रूंशी त्यांनी जो संघर्ष केला, तो धर्माधिष्ठीत असा कधीच नव्हता. त्याचे स्वरूप हिंदू विरुद्ध मुस्लीम असे केव्हाच नव्हते. त्या संघर्षाचे स्वरूप एतदेशीय विरुद्ध परकीय असे होते. शिवछत्रपती विरुद्ध औरंगजेब हा संघर्ष हिंदू विरुद्ध मुस्लीम असा असता, तर मिर्झाराजे जयसिंग शिवछत्रपतींना पकडून आणण्यासाठी आले नसते. बादशहा औरंगजेबाच्या सैन्यात जसे हजारोंनी हिंदू होते, त्याचप्रमाणे शिवछत्रपतींच्या सैन्यात असंख्य मुस्लीम होते. शिवछत्रपतींच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान हा मुसलमान होता, तर मदारी म्हेतरसारखा निष्ठावान मुस्लीम तरुण जीवाची बाजी लावून आग्य्रामध्ये शिवछत्रपतींच्या बरोबर सावलीसारखा वावरत होता.
स्त्रियांच्या अबू्रची-शीलाची सुरक्षितता ठेवणे ही समाजाच्या संस्कृतीचे मोजमाप करणारी एक मोजपट्टी असते. शिवछत्रपतींनी हाती तलवारीसारखीच ही मोजपट्टी सदैव धारण केलेली दिसते. म्हणूनच ते कल्याणच्या सुभेदारांच्या सुनेचा यथोचित सन्मान करून तिला तिच्या सासरी पाठवितात, तर गावातील निराधार स्त्रीशी बदअमल करणार्या रांझेच्या पाटलाचे हातपाय तोडून त्याचा ‘चौरंग’ करण्याची अतिशय कठोर शिक्षा देतात. अर्थात, स्त्रियांच्या शीलाचे संरक्षण प्राणपणाने करणे हे हिंदवी स्वराज्याचे पाचवे तात्विक अधिष्ठान म्हणून विचारात घ्यावे लागेल. म्हणूनच खाफिखान हादेखील शत्रूपक्षातील इतिहासकार त्यांचा मनःपूर्वक गौरव करतो.
शिवछत्रपतींच्या समग्र जीवनकार्याचे ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर वादातून मूल्यमापन करणे योग्य ठरणार नाही, असे नरहर कुरूंदकर यांच्यासारख्या विचारवंतांना वाटते. दुसरीकडे शेजवलकर यांच्यासारख्या विचारवंताला शिवछत्रपती हे ‘गो-ब्राह्मण प्रतिपालक’ अशी बिरुदावली कधीच लावत नव्हते, असे वाटते. लोकमान्य टिळकांनी 1905 च्या पुण्यातील शिवाजी उत्सवामध्ये शिवाजी महाराजांच्या ‘गो-ब्राह्मण प्रतिपालक’ या राजवाडेनिर्मित कल्पनेची वासलात लावली होती, असे न. र. फाटक आपल्या ‘रामदार वाङ्मय आणि कार्य’ या प्रसिद्ध ग्रंथात निर्धारपूर्वक स्पष्ट करतात. शिवछत्रपती हे कोणत्या एका जातीचे किंवा एका विशिष्ट धर्माचे नेतृत्त्व करणारे ‘राजे’ नव्हते. त्यांनी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य हे केवळ अभिजनांचे किंवा बहुजनांचे राज्य नव्हते. ते सर्वजनवादी असे कल्याणकारी राज्य होते. तेच त्या राज्याचे मूलभूत असे सहावे तात्विक अधिष्ठान होते. म्हणूनच आजही शिवछत्रपतींचे कल्याणकारी राज्य हे चिंतनाचा विषय होऊन राहिलेले दिसते.
शिवकालात अस्तित्वात असणार्या वतनदारी पद्धतीबाबत सभासद बखर सांगते, ‘इदलशाही, निजामशाही, मोंगलाही देश काबीज केला. त्या देशात ‘मुलकाचे पाटील, कुलकर्णी यांचे हाती व देशमुखांचे हाती कुलूरयत याणी कमाविसी करावी आणि मोघम टक्का घ्यावा. हजार-दोन हजार जे गावी मिरासदारांनी घ्यावे ते गावी दोनशे तीनशे दिवाणात खंड मक्ता द्यावा. त्यामुळे मिरासदार पैकेदारी होऊन गावास हुडे, वाडे, कोट बांधून, प्यादे बंदुखी देऊन बळावले.’
सारा वसुलीच्या नावाखाली रयतेला गुलामीत ठेवू पाहणारी ही वतनदारी पद्धत पूर्ण आपल्या नियंत्रणाखाली ठेवण्याचा क्रांतिकारक निर्णय शिवछत्रपतींनी घेतला. मस्तवाल वतनदारांना त्यांनी मोलमजुरीचे स्वरूप दिले. इतकेच नव्हे, तर त्यांना स्वतंत्र वाडे-किल्ले, गढ्या बांधण्यास बंदी केली. शिवछत्रपतींनी वतनदारीची रयतेला गुलाम बनविणारी पद्धत नष्ट करून आपले स्वराज्य हे ‘रयतेचे राज्य’ आहे, याची ग्वाही दिली. राजा म्हणजे ‘उपभोगशून्य स्वामी’ असतो. हे राज्य त्याच्या खासगी मालकीचे नसते. ते केवळ रयतेचे आणि रयतेचेच असते. म्हणूनच ते दि. 5 सप्टेंबर 1676 रोजी सुभेदाराला लिहिलेल्या पत्रात सांगतात, ‘त्येणेप्रमाणे एक भाजीचा देठास तेही मनन दाखविता रास व दुरुस वर्तणे.’ हे सातवे तात्विक अधिष्ठान सदैव नजरेसमोर ठेवून शिवछत्रपतींनी स्वराज्याची धुरा वाहिली.
अशा या शिवछत्रपतींचे खाफीखानासारखा शत्रूपक्षातील इतिहासकार त्यांना अनेक दुष्ट विशेषणे लावून एकीकडे त्यांचे दानवीकरण करण्यात धन्यतः मानतो, तर दुसरीकडे स्वसमूह श्रेष्ठतावादाच्या प्रभावाखाली असणारे विचारवंत हिंदुस्थानाच्या इतिहासाच्या सहा सोनेरी पानांत विराजमान होण्याचा मान शिवछत्रपतींना न देता तो राघोबा पेशव्यांना देतात. ‘हिंदवी स्वराज्य’ हे विधिलिखित होते. ते त्यांच्याकडून परमेश्वराने करवून घेतले, असे सांगून शिवछत्रपतींचे दैवतीकरण करण्यात मश्गूल असतात. त्यामुळे शिवछत्रपतींना त्यांच्या हयातीत ‘ईश्वरी अवतार’ मानले जात होते, हे पुन्हा पुन्हा सांगण्यात ते हाडामासांचे ‘माणूस’ होते हे आपण विसरून जातो. त्यांनी आपल्या अंगी असणार्या प्रज्ञा आणि प्रतिभेच्या जोरावर सह्याद्रीइतके उंच उंच असे कर्तृत्व करून अलौकिक असे लोककल्याणकारी हिंदवी स्वराज्य उभे केले. त्याला वरील सप्तअधिष्ठानाचा आधार होता, हे सदैव लक्षात ठेवले पाहिजे.