लोकदर्शन 👉 Ad. Suraj Ledange
*_स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही पुरोगामी महाराष्ट्राला पुन्हा एकदा नंदी पाणी पित असल्याच्या अफवेचे डोहाळे लागले असून असाचं २१ सप्टेंबर १९९५ हा दिवस एका अफवेला जन्म देत उजाळला होता.गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत गणपती दूध (नाही) पिल्याची अफवा झपाट्याने संपूर्ण देशभरात पसरली होती, काही वेळातचं देशभरात दुधाची टंचाई देखील निर्माण झाली होती. लोक दुधाचे भांडे घेवून गणपतीच्या मंदिरासमोर रांगा लावत होते. त्यातचं २७ वर्षांपूर्वीच्या अफवेची आठवण नुकतीचं ५ मार्च २०२२ या दिवशी विदर्भ, खान्देशासह संपूर्ण महाराष्ट्रात झाली._*
*_खान्देशातील जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात देखील महादेवाच्या मंदिरात नंदी पाणी पित असल्याच्या अफवेमुळे जळगावसह धुळे,नंदुरबार जिल्ह्यातील काही परिसरात लोकांची गर्दी उसळल्याची बातमी प्रसारमाध्यमांवर झळकली व त्याच धर्तीवर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा तालुक्यातील चार्ली या गावातील हनुमान मंदिरात नंदी पाणी पितो अशी अफवा चांद्यापासून तर बांद्यापर्यंत वाऱ्यासारखी पसरली._*
*_महाराष्ट्राच्या संत परंपरेला तत्वज्ञानाचा आधार आहे,गेली ९०० वर्ष हा संप्रदाय टिकविण्याचे काम खेड्यापाड्यातील वारकऱ्यांनी केले आहे. संत तुकाराम महाराज , महात्मा फुले, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांसह अनेक समाजसुधारकांनी बुद्धिप्रामाण्यवादाचा वारसा समाजाला देवून सामाजिक दांभिकता, अंधश्रद्धा आणि अनिष्ट प्रथांविरोधात प्रहार करत समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविला, महाराष्ट्राला तिमिरातुनी तेजाकडे नेऊ पाहणारा माणूस फक्त वैज्ञानिक दृष्टीकोन व विवेकासाठी हुतात्मा झाल्याचं ज्वलंत चित्र डॉ. दाभोळकर यांच्या रूपाने महाराष्ट्राने बघितलेलं आहे._*
*_२१ वे शतक हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे शतक म्हणून ओळखले जाते,वैज्ञानिक दृष्टिमुळे समाजातील अंधश्रद्धेसारख्या विघातक प्रथांवर निर्बंध झाले आहेत व समाजाला वैज्ञानिक विचारांची एक नवी दिशा प्राप्त झाली आहे.आजपर्यंत निसर्गाधित असलेला मानव निसर्गाचे बंध तोडून अवकाशात झेपावत आहे, आज प्रत्येक देशात विज्ञान हिच जात ,विज्ञान हाचं धर्म व विज्ञान हिच संस्कृती बनलेली असून वैज्ञानिक दुष्टीकोणाचा अवलंब करून सत्याच्या खोलाशी आणि वास्तवाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करावा अशा अफवांकडे दैविक चमत्कार म्हणून न पाहता नैसर्गिक व वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून जर समाजाने बघितले तर नक्कीचं समाजात विवेकवाद जन्म घेईल आणि अज्ञानपणा सोडून महाराष्ट्राचं पाऊलं हे सकारात्मक विज्ञानवादी असेल._*
—————————————————–
*नंदी पाणी पितो हा कुठलाही दैवी चमत्कार नाही गेल्या कित्येक शतकापासून जुन्या दगडाच्या मूर्ती जिर्ण झालेल्या आहे, त्यावर पाणी टाकल्यानंतर ते शोषले जाते, काही मंदिरामध्ये सिमेंटच्या मूर्ती आढळतात.पाण्याचा पृष्ठीय ताण व गुरुत्वाकर्षनामुळे पाणी शोषले जाते. वरील सर्व कार्यकारण भाव हा वैज्ञानिक असून त्यामुळे नंदीची मूर्ती पाणी पिते, ही निव्वळ अंधश्रद्धा आहे.यात प्रस्थापित व्यवस्थेचं षडयंत्र असून कोणीही अशा अफवांवर विश्वास ठेवून बळी न पडता संशोधनात्मक अभ्यास करून सत्याच्या खोलाशी आणि वास्तवाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करावा.*
*_अॅड. सुरज लेडांगे._*
*_(कायदेविषयक सल्लागार, महा.अ.नि.स. जिल्हा कार्यकारिणी, चंद्रपुर.)_*