महिला सक्षमीकरणाच्या नावानं चांगभलं!

 

लोकदर्शन संकलन – 👉साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
साभार – निलेश झालटे.
8 मार्च 2022.

 

खाली देत असलेल्या घटना आपल्या होय आपल्या पुरोगामी (?) समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळं वाचताना लक्षपूर्वक वाचावं. कारण आज (8 मार्च) महिला दिन आहे आणि नेहमीप्रमाणे आपण एकदिवसीय सेलिब्रेशन करत महिलांप्रति अपार स्नेहभाव प्रकट करणार आहोत. त्याआधी आपल्याला कळत असलेली किंवा नसलेली भीषणता लक्षात यावी म्हणून हा अट्टहास…

स्थळ, साकीनाका, 32 वर्षीय महिलेवर टेम्पोत बलात्कार करण्यात आला व तिला अमानुषपणे मारहाण केली, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला

स्थळ जालना, वेळ दुपारची, एकांत मिळावा म्हणून भेटायला आलेल्या प्रेमीयुगलाला सो कॉल्ड संस्कृतीरक्षकांकडून मारहाण, मुलीचा विनयभंग करत व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल.

स्थळ औरंगाबाद, विवाहितेला घरात घुसून जाळले.

स्थळ वसई, 22 वर्षीय गतिमंद तरुणीवर बलात्कार

स्थळ वर्धा हिंगणघाट प्राध्यापक असलेल्या तरुणीला भर रस्त्यात पेट्रोल टाकून पेटवले.

अशा किती घटना आणि किती स्थळं. आपण दर दिवसाला वाचतो, पाहतो. मेंदूला झिणझिण्या आल्या तर एखादी पोस्ट डकवतो किंवा निषेधासाठी एखादवेळी रस्त्यावरही उतरतो. मात्र घटना काही केलं तरी थांबत नाहीत.

हिंगणघाटच्या मुलीला भरदिवसा जाळलं, ती इतकी बेकार जळाली की तिचे दात सुद्धा जळून गेले होते. बरं ती जगली असती तर तिला या समाजात आयुष्यभर जळत राहावं लागलं असतं हा भाग वेगळा. नुकतंच आरोपीला शिक्षाही झाली. घटना घडली त्यावेळी अख्खी दुनिया त्या पीडितेसाठी हळहळ व्यक्त करत असताना त्या नराधमाला मात्र पश्चाताप नव्हता. त्यामुळंच म्हटलं की ती जगली असती तर आयुष्यभर मरत जगली असती. यापेक्षा त्रासातून सुटली हे एकाअर्थाने बरंच झालं.

आज 21 व्या शतकात म्हणजे सो कॉल्ड महासत्ता बनण्याच्या दिशेने देश चाललाय, अशा गप्पा मारल्या जात आहेत. महिला सक्षमीकरण नावाच्या बोगस बोंबा देखील मोक्कार सुरू आहेत. त्याला आम्ही महिला नेतृत्व सक्षम होत चालल्याची उदाहरणं देऊन बळ देतोय. जसं की देशाची मोडकी तोडकी अर्थव्यवस्था महिला असलेल्या मंत्री चालवत आहे, माजी राष्ट्रपती महिला होत्या वगैरे वगैरे मोठाली उदाहरणं सांगत राहतो. मग आम्हाला वाटत राहतं की वाह देशातली प्रत्येक स्त्री किती स्ट्रॉंग झालीय. अशी उदाहरणं देताना रोज बलात्कार, महिलांचा छळ, मुलींची छेडछाड अशा बातम्या देखील आम्ही पॅररली वाचतो. ही खरी या देशातली स्त्री.

आणि आपल्या अवतीभवतीच्या स्त्रीची ही स्थिती पाहिल्यावर आपण अत्यंत बोगस समाजात राहतोय याची अतोनात जाणीव होते. पोरीचा बाप झाल्याने आता ही भीषणता अजूनच तीव्र झालीय.

सामाजिक कार्यकर्ते अॅड. महेश भोसले यांनी लिहिलेल्या काही ओळी प्रचंड विचार करायला भाग पाडतात.

त्या अशा…

“ती गर्भात असतानाच तपासली जाते,

एखादीच ती अनेक यातनातुन जन्म घेते,

मग ती जीवंतपणी बनते गुलाम पुरुष नावाच्या प्राण्याची,

पण ती थांबली नाहीये ती लढलीय आणि लढतेय देखील,

विनाकारण होणाऱ्या स्पर्शासोबत, ती लढतेय छाताडावर टपलेल्या वासनांध नजरेसोबत,

हल्ली ती फक्त गर्भातच नाही मारली जात

तर ती रोज मारली जातेय परंपरेने,

तीच्यावर कुठला एक नराधम नाही करत बलात्कार,

त्या नराधमाने केलेल्या बलात्काराची पायरी करुन

चढतात तिच्यावर हजारो राजकीय इमले.”

या ओळी ‘ती’च्या वास्तविकतेवर आणि आजच्या व्यवस्थेवर नेमकं बोट ठेवतात. महिला सबलीकरण, स्त्री-मुक्तीच्या बाता करणाऱ्या या जगात अजूनही दोन आणि पाच महिन्याच्या निरागस चिमुरडीवर बलात्कार केला जातो, ही सकल समाजासाठीच अत्यंत शरमेची गोष्ट आहे. खरतर आपल्या समाजात कुठलीही बलात्काराची घटना घडल्यानंतर त्याला धर्म, जाती, समुदायनिहाय पाहण्याची घाणेरडी मानसिकता प्रचंड प्रमाणात फोफावली आहे. दिल्लीत बसमध्ये निर्भयासोबत झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर अख्खा भारत देश रस्त्यावर उतरला. त्यावेळी लोकांच्या मनातील आग पाहून असं वाटत होतं की, आता देशात बलात्कार होणारच नाहीत. मात्र बलात्कारी तर तिच्या निषेधाच्या मोर्चात देखील असावेत असंच वाटायला लागलंय. कारण मुलींच्या छेडछाडीच्या घटना आणि बलात्काराचे प्रमाण थांबण्याचे नावच घेत नाहीये. सगळीकडेच वासनांध नजरा आणि पाशवी किडे आपले लक्ष्य शोधत आणि ते लक्ष्य इमाने-इतबारे पूर्ण करताना दिसून येत आहेत. महाराष्ट्रातच बोलायचं झालं तर आज सुरुवातीला सांगितलं तसं प्रत्येक जिल्ह्यातून अशी एक भयावह घटना बाहेर येतेय. कित्येक घटना दाबल्याही गेल्या असतील, जात असतील.

अगदी विकृत पद्धतीने बलात्कार केला जातो आणि सहजच तिला मारून देखील टाकले जाते. पुरुषी अहंगंडातून हिंगणघाटसारख्या घटनेत तिला भररस्त्यात पेटवून दिलं जातं. मग मिडीयात बातमी येते, सोशल मिडीयावर भडास निघते. काही मोर्चे निघतात, आंदोलने होतात. या प्रत्येक स्तरावर एक वेगळा बलात्कार तिच्यासोबत होत राहतो. अनेकदा तिच्या बलात्काराचे राजकारण देखील होते. अर्थातच यासाठी प्रशासनव्यवस्था किंवा सुरक्षा व्यवस्था काय करत आहे? हा प्रश्न उभा राहतोच. मात्र बलात्कार किंवा छेडछाड प्रकरणात ओळखीच्या नराधमांकडूनच जास्त प्रमाणात अशा प्रकाराला अंजाम दिला जात असल्याने घटना रोखण्यात ही व्यवस्था काही करू शकत नाही. मग यावर उपाय काय होऊ शकतो? या गंभीर प्रश्नावर कुटुंबामध्ये चर्चा होणे अपेक्षित आहे. अवघ्या पाच महिने किंवा पाचवी, सहावीच्या वर्गापर्यंतच्या चिमुरड्या ज्यांना स्पर्शदेखील समजत नाही. अगदी निरागस विश्वात जगणाऱ्या चिमुरड्यासुद्धा काही घटनांमध्ये बळी पडत आहेत, ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे.

बलात्कारासारखी घटना घडल्यावर सुद्धा मुलगी कोणत्या जातीची आहे? हे सर्च करणारा दुसरा बलात्कारी वर्ग सुद्धा इथे उपलब्ध आहे. अशांना खरतर माणूस म्हणवून घेण्याचा काहीही अधिकार नाही. या सगळ्या गोष्टींना भोगणारा स्त्री हा आजच्या घडीला सर्वात उपेक्षित घटक आहे. स्त्री-सबलीकरणाच्या नावावर सरकार किंवा सामाजिक कार्यकर्ते भलेही बड्या-बड्या बाता मारत असतील मात्र याच्याने बुडाखालचा अंधार कायम आहे. यासाठी आता स्त्रीने स्वता किमान स्वतापुरते सक्षम होणे आवश्यक आहे. परंपरा आणि सामाजिक व्यवस्थेचं लोढणे आपल्या गळ्यात बांधून घेऊन देखील पुरुषी मानसिकतेच्या दलदलीत पहिल्यापासूनच स्वकर्तृत्वाचे कमळ तिने फुलविले आहे.

निश्चितच स्त्री आज कुठेच कमजोर नाही, हे स्पष्ट आहे, आणि हे माहिती असतानाही केवळ ज्ञान देऊन किंवा नुसते दिखाऊ महिला सबलीकरणाचे कार्यक्रम राबवून काही अर्थ नाही. वासनांध पुरुषी नजरा रोखणे कठीण आहे, म्हणूनच प्रत्यक्ष वैयक्तिकरीत्या महिलेने मजबूत होणे हाच सशक्त परिणाम आहे. अन्यथा ‘ती’चा शारीरिक आणि सामाजिक बलात्कार होतंच राहील. आपल्याच लुटलेल्या अब्रूच राजकारण तिला बघत बसावे लागेल आणि ‘तो’ पूर्वापार पद्धतीने जमेल तसं बलात्कार करत राहील. बयो, दे हे ओझं झटकून आणि व्यवस्थेवरच उलट बलात्कार करण्याची क्षमता ठेवणे सध्या निकडीचे बनलेय.

बाकी आम्ही केवळ निषेध करण्यापुरते धनी आहोत. एखादी घटना घडल्यावर आम्ही केवळ निषेध करतो. आरोपीला फाशी द्या म्हणत राहतो. हे आमचं म्हणणं पुढच्या अशाच एखाद्या घटनेपर्यंत कायम असतं. आम्ही संवेदनाहीन असलेल्या समाजात राहतो. अनेकदा आम्ही गप्प राहतो, काही वेळा गप्प केलं जातं.

‘चूप रहना आसान नहीं है. चूप रहने से आप पत्थर बन जाते हैं. कुछ लोग आपसे टकरकर मर जाते हैं, कुछ लोगो को आप मार देते हैं’, असं एक वाक्य वाचनात आलेलं. हे वाक्य बऱ्याच अंगांनी विचार करायला भाग पाडणारं होतं. मी मात्र या वाक्याला सध्याच्या समकालीन अमानवीय गोष्टींच्या संदर्भात चिडीचूप असलेल्या व्यक्तींवर लादून पाहिले. तर तिथं हे वाक्य परफेक्ट बसले. अनेक घटना आपल्या अवतीभवती घडत असतात. व्हाट्सअप आणि फेसबुकसारख्या सोशल माध्यमातून काही घटनांचे फोटो आणि व्हिडियो पाहिल्यानंतर आपण हादरून जातो. अरे हे काय चाललंय? कधी थांबणार हे? असे प्रश्न लिमिटेड असलेल्या ग्रुपमध्ये करून दुसऱ्या दिवशी आपल्या दिनचर्येला लागतो. आपल्यातील माणूस मरत चालला असल्याचे हे लक्षण आहे.

स्त्री सक्षमीकरण करणं म्हणजे यात आपल्याला नेमकं काय करायचंय हेच आम्हाला कळत नाही, कळलेलं नाही किंवा जे करायचं आहे त्या गोष्टी पुरुषसत्ताक व्यवस्थेत आम्ही मुद्दामून करत नाहीत. जर यावर नेमकं औषध शोधलं नाही तर हिंगणघाटसारख्या घटनांची आग कुठल्याही क्षणी आपल्या जवळ येऊन भडकू शकेल.

संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
8 मार्च 2022.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *