संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
साभार – स्वप्निल श्रोत्री.
6 मार्च 2022.
ऑपरेशन शक्ती या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या अण्वस्त्र चाचणी ला ११ मे २०२० ला २३ वर्षे पूर्ण झाली. ह्या २३ वर्षात भारतात अनेक सत्तांतर सुद्धा झाली. मात्र भारताची घौडदौड आजही थांबलेली नाही.
“जगात जर पाप असेल तर दुर्बलता हे पाप आहे. दुर्बलतेचा त्याग करा, बलशाली व्हा कारण दुर्बलता हा मृत्यू आहे.” असे स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते.
आजच्या घडीला आपण जर आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विचार केला तर बलवान राष्ट्रे ही कायमच दुबळ्या राष्ट्रांवर आपली ह्या ना त्या प्रकारे हुकूमत गाजवण्याचा प्रयत्न करित असतात.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेने जपान वर अणुबॉंम्ब टाकून आपले लष्करी सामर्थ्य सिद्ध केले होते. त्यानंतर लागलीच सोव्हिएत रशियाने अण्वस्रांच्या चाचण्या केल्या. त्या पाठोपाठ चीनही तयारीला लागला.
त्यामुळे मोठ्या कष्टाने मिळालेल्या स्वातंत्र्याचे संरक्षण करायचे असेल तर आपल्याला आपले लष्करी सामर्थ्य सुद्धा वाढवले पाहिजे याची जाणीव भारताला झाली होती. त्यानुसार १९४८ ला भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली.
देशात अणुऊर्जेचा विकास करण्याच्या उद्देशाने या आयोगाची स्थापना केली गेली. त्यानंतर १९५४ मध्ये अणुऊर्जा विभागाची स्थापना झाली. त्याचे पहिले सेक्रेटरी होते डॉ. होमी जहांगीर भाभा.
सुरुवातीला भारताचा अणुऊर्जा कार्यक्रम एक सामान्य स्वरूपाचा होता परंतु त्याने आता एक विस्तृत स्वरूप धारण केले आहे. आजच्या घडीला भारतीय अणुऊर्जा विभागात ६३ वेगवेगळे विभाग आहेत.
वायव्येला असलेला पाकिस्तान, ईशान्येला असलेला चीन व सतत अंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताविरोधात गरळ ओकणारे अमेरिकेसारखे काही राष्ट्रे यांना भारताच्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन घडविणे गरजेचे होते.
त्यानुसार भारतीय वैज्ञानिक व लष्करी अधिकाऱ्यांच्या गुप्त हालचाली सुरू झाल्या.
अमेरिकेच्या सी. आय. ए च्या डोळ्यात धूळ फेकून ११ मे १९९८ ला राजस्थानातील थर वाळवंटात एकामागून एक असे प्रचंड स्फोट झाले आणि त्या स्फोटांच्या आवाजात भारतीय सामर्थ्याचे व कौशल्याचे दर्शन अवघ्या जगाने घेतले.
राष्ट्राबद्दल मनात असलेले तीव्र प्रेम व भारत सरकारची खंबीर साथ या बळावर वैज्ञानिकांनी ही किमया साधली.
निमित्त आहे ‘ऑपरेशन शक्ती’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पोखरण येथील भारताच्या दुसऱ्या अण्वस्त्र चाचणी च्या यशाचे..
अण्वस्त्र चाचण्यांचे प्रकार:-
अण्वस्त्र चाचण्यांचे प्रामुख्याने चार प्रकार आहेत.
१) वातावरणीय अण्वस्त्र चाचणी (अँटमोस्फेरिक न्यूक्लियर टेस्ट) : अण्वस्त्रांचा वातावरणामध्ये स्फोट घडवून आणणे म्हणजे वातावरणीय चाचणी होय. सर्वसाधारणपणे अण्वस्त्रांच्या चाचण्यासाठी हीच पद्धत वापरली जाते.
२) भूमिगत अण्वस्त्र चाचणी ( अंडरग्राउंड न्यूक्लियर टेस्ट) : पृथ्वीचा भूपृष्ठाखाली घेण्यात येणाऱ्या चाचण्या म्हणजे भूमिगत चाचण्या होय. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका व सोव्हिएत रशिया यांनी अशा प्रकारच्या चाचण्या घेतल्या होत्या.
३) पाण्याखालील अण्वस्त्र चाचणी (अंडरवॉटर न्यूक्लिअर टेस्ट) : पाण्याच्या तळाखाली अण्वस्त्रांचा स्फोट घडवून अशा प्रकारची चाचणी घेतली जाते. नाविक तळाच्या व नौसेनेच्या संभाव्य शक्तीचे मूल्यमापन करण्यासाठी अशा प्रकारच्या चाचण्या घेतल्या जातात.
४) वातावरणाच्या बाहेर अण्वस्त्र चाचणी (एक्सोअँटमोस्फेरिक न्यूक्लिअर टेस्ट) : वातावरणाच्या वर करण्यात येणाऱ्या अण्वस्रा चाचण्यांना वातावरणाच्या बाहेरील अण्वस्त्र चाचण्या म्हणतात. यामध्ये रॉकेटचा वापर करण्यात येतो.
स्वातंत्र्यानंतर भारताने आतापर्यंत दोन वेळा अण्वस्त्र चाचण्या करून अण्वस्त्रधारी राष्ट्रांमध्ये स्थान मिळवले आहे. आजच्या घडीला जगात उत्तर कोरिया सह ९ अण्वस्त्रधारी देश असून भारत हा त्यातील एक आहे.
पोखरण १ (१९७४) :भारताची पहिली अण्वस्त्र चाचणी:-
७ सप्टेंबर १९७२ ला भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ‘भाभा अँटोमिक रिसर्च सेंटर’ ला भेट दिली. तेव्हाच त्यांनी तेथील शास्त्रज्ञांना आण्विक उपकरणाची निर्मिती करून अण्विक चाचणीसाठी तयारी करण्याच्या तोंडी सूचना दिल्या होत्या.
पंतप्रधानांच्या सूचनेनुसार नंतर शास्त्रज्ञाने एक टीम तयार करून भाभा अँटोमिक रिसर्च सेंटरचे तत्कालीन संचालक राजा रामण्णा, पी. के अय्यंगार, राजगोपाल चिदंबरम्, प्रणव रेबतीरंजर दस्तिदार, पी. आर रॉय, जितेंद्रनाथ सोनी, डॉ. अनिल काकोडकर, डी. आर. डा. ओ चे तत्कालीन संचालक बी. डी नाग चौधरी व वामन दत्तात्रय पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली तयारी सुरू केली.
चाचणीसाठी लागणाऱ्या जागेची निश्चिती झाल्यानंतर अण्विक उपकरणांचा गाभा ट्रॉम्बे पासून पोखरण येथे चिदंबरम् व पी. आर रॉय यांच्या निरीक्षणाखाली हलवण्यात आला. तसेच प्लुटोनियम गाभा लष्कराच्या निगराणीखाली ९०० किलोमीटरचा प्रवास करून विशेष संरक्षणासहीत नेण्यात आले.
आण्विक उपकरणांची जोडणी १३ मे १९७४ ला करण्यात आली आणि त्या गटांमध्ये सोनी, काकोडकर, आय्यंगार व इतर काही शास्त्रज्ञांचा समावेश होता.
१८ मे १९७४ ला राजस्थान च्या पोखरण येथील थर वाळवंटात भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ८ वाजू५ मिनिटांनी भारताने यशस्वीपणे अण्वस्त्रांचे स्फोट घडवून आणले. भारत एक अण्वस्त्रधारी राष्ट्र बनले.
या चाचणीला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे तत्कालीन प्रधान सचिव डी. पी धर यांनी ‘स्माईलिंग बुद्धा‘ हे नाव दिले कारण या चाचणीच्या दिवशी बुद्ध पौर्णिमेचा दिवस होता.
अण्वस्त्रांच्या यशस्वी चाचणीमुळे वैज्ञानिक देशाचे हीरो बनले. १९७५ ला भारत सरकारने पद्म पुरस्कारांनी त्यांचा गौरव केला.
पोखरण २ (१९९८) : भारताची दुसरी अण्वस्त्र चाचणी
१० मार्च १९९८ ला झालेल्या लोकसभा निवडणुकांत दणदणीत विजय मिळवून भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेत आले. शपथविधीचा एक दिवस अगोदर म्हणजे १८ मार्च १९९८ ला तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी घोषित केले की
” देशाच्या सुरक्षेसंदर्भात कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यात येणार नाही. देशाच्या सुरक्षेच्या व सार्वभौमत्वासाठी आण्विक चाचण्यांसह सर्व पर्याय खुले असतील.”
६ एप्रिल १९९८ ला पाकिस्तानी घौरी नावाच्या १५०० किमी क्षमतेच्या व ७०० किलो वजनाच्या पेलोड अण्वस्त्रांची चाचणी केली. त्यामुळे अण्विक चाचणी घेण्यासंदर्भात अटलजींचा आत्मविश्वास अधिकच दृढ झाला.
त्यानुसार माजी राष्ट्रपती व आण्विक चाचणी प्रकल्पाचे प्रमुख डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम (तत्कालीन डी. आर. डी. ओ चे संचालक) यांच्या व भारतीय अणुऊर्जा आयोगाचे चेअरमन डॉ. राजगोपाल चिदंबरम् यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली अनिल काकोडकर, सतिंदर कुमार सिक्का, एम एस राजकुमार, डी डी सुद, के एस गुप्ता, जी गोविंदराज, के संथानम् आदी वैज्ञानिकांनी चाचणीची तयारी सुरू केली.
१ मे १९९८ ला पहाटे ३ वाजता अण्विक उपकरणे डी. आर. डी. ओ चे कर्नल उमंग कपूर यांच्या नेतृत्वाखाली भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर, मुंबई येथून जैसलमेर विमानतळावर आणण्यात आले. तेथून लष्कराच्या चार ट्रक द्वारा आण्विक उपकरणे पोखरण येथे आणण्यात आली.
ऑपरेशन शक्ती या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या चाचणीत ११ मे १९९८ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी ३ वाजून ४७ मिनिटांनी एकामागून एक अशा पाच यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या.
त्यातील पहिल्या चाचणीत साधारणपणे ४५ किलो टनाच्या औष्णिक व अण्विक उपकरणाचा उपयोग केला गेला ज्याला सर्वसाधारणपणे ‘हायड्रोजन बॉम्ब’ असे म्हणले जाते.
त्याच दिवशी म्हणजे ११ मे १९९८ रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी चाचणी संदर्भात जाहीर घोषणा केली आणि जगभरात विविध राष्ट्रांच्या प्रतिक्रिया उमटल्या.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया देताना भारताच्या अण्वस्त्र चाचण्यांमुळे दक्षिण आशियाच्या स्थिरतेवर आणि शांततेवर परिणाम झाल्याचे सांगितले.
तर अमेरिकेने निराशा व्यक्त करताना भारताच्या चाचणीमुळे जागतिक शांतता प्रयत्नांना सुरुंग लागल्याचे म्हणले. मात्र स्थानिक भारतीय वृत्तपत्रांनी घेतलेल्या जनमताच्या कौलात ९१% भारतीयांनी ह्याला पसंती दिली.
ऑपरेशन शक्ती या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या अण्वस्त्र चाचणी ला ११ मे २०१८ ला २१ वर्षे पूर्ण झाली. ह्या २१ वर्षात भारतात अनेक सत्तांतर सुद्धा झाली. मात्र भारताची घौडदौड आजही थांबलेली नाही.
फक्त लष्करीच नाही तर उद्योग, व्यवसाय, कृषी, विज्ञान, तंत्रज्ञान, अवकाश या सर्व क्षेत्रात भारत प्रगती करित आहे. आज भारताचा जीडीपी जवळपास १०.२५ अब्ज ट्रिलीयन डॉलर आहे जो जगातील तिसरा सर्वात मोठा आहे.
कारगिल युद्धाच्या वेळेस अमेरिकेने भारताला त्यांचा जी. पी. एस नेव्हिगेशन डेटा देण्यास नकार दिला होता त्यामुळे भारताने आज स्वतःचा नेव्हिगेशन बनवला आहे जो आज ‘नाविक’ या नावाने ओळखला जातो.
शेतीच्या बाबतीत बोलायचे झाले तर १९५० च्या दशकात अन्नधान्यासाठी इतरांवर अवलंबून असलेला भारत स्वतःचे पोट भरून धान्य निर्यात करित आहे.
लष्करी सामर्थ्याचा विचार केला तर १३ लाखांचे खडे सैन्य तर साडेसहा लाखांचे राखीव सैन्य भारतीय थलसेनेकडे आहे.
त्याशिवाय बीएसएफ, सशस्त्र सीमा बल, अासाम रायफल्स, इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस यांची फौज वेगळीच, हे जगातील तिसरे सर्वात मोठे तर पाकिस्तानी सैन्याच्या अडीचपट जास्त असलेले सैन्य आहे.
भारतीय नौसेनेकडे असलेली आयएनएस विराट, आयएनएस विक्रमादित्य यांसारखी अण्वस्त्र हल्यांची क्षमता असलेली जहाजे तर आयएनएस अरिहंत आणि आयएनएस चक्र यांसारख्या अण्वस्त्रधारी पाणबुड्या भारतीय नैसेनेला जगातील चौथी सर्वात शक्तिशाली नौसेना बनवितात.
जगातील सर्वात उंचीवर हवाईतळ बनविणारे भारतीय हवाई दल हे सुद्धा अण्वस्त्र हल्यांची क्षमता राखून जगातील चौथे सर्वात मोठे हवाई दल आहे.
भारताचे हे सामर्थ्य फक्त भारताचेच नाही तर भारताच्या मित्रराष्ट्रांच्या स्वातंत्र्याचे व सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यास तर शत्रूराष्ट्रांच्या उरात धडकी भरविण्यास पुरेसे आहे.
संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
6 मार्च 2022.