लोकदर्शन 👉संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
साभार – रंजना पाटील.
कोल्हापूर.
5 मार्च 2022.
आजच्या विज्ञान युगातही दैववाद, कर्मकांड, भाकडकथा सांगून समाजाला निष्क्रिय, आळशी बनवले जात आहे. मानस शास्त्राविषयी इतकी सारी संशोधने उपलब्ध असूनही भोंदू जोतिषांकडे जाणाऱ्या लोकांची संख्या वाढताना दिसतेय. मानसिक आजाराला लोक भूतबाधा समजून बसतात. आणि यामध्ये स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे.
असंख्य लहान मुलं दुधावाचून तडफडत असली तरी दगडी मूर्त्यांवरती लाखो लिटर दुध वाया जातेय. पवित्र – अपवित्रतेच्या फसव्या कल्पनांना महत्व दिले जातेय. स्त्रियांचा चकचकीतपणा, झगमगितपणा भरून उरलाय सगळीकडे. यालाच आपण विकास, प्रगती समजून बसलोय. पण महिलाच लवकर अंधश्रद्धा स्वीकारतात. सकाळी सकाळी पेपर मधील राशिभविष्य वाचून दिनक्रम ठरवणाऱ्या महिलांची संख्या कमी नाहीय. सधन घरातील स्त्रिया स्वामी, बापू, गुरूंच्या बळी ठरतात. तर गावातील महिला मांत्रिकांच्या.
देव – धर्म, इश्वर, पूजा – पाठ ,उपास – तापास,पुनर्जन्म असल्या थोतांडामध्ये महिला जास्त गुंतून गेलेत. धार्मिकतेच्या नावाखाली स्त्रियांचे शारीरिक, आर्थिक शोषण होत चाललंय. देवळांची संख्या इतकी वाढलीय तर आठवड्याला एक देवदर्शन केले तरी आयुष्य सहज निघून जाईल. पुरोहितांची पोटं भरण्यासाठी नवनवीन होम हवन जन्माला घातले जातात. हे सगळं पाहिलं की प्रबोधन हा शब्दच निरर्थक वाटायला लागतो.
एकीकडे विज्ञानवादी विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोजकीच लोकं जीवाचं रान करतायत. तर दुसरीकडे पाप – पुण्याच्या भीतीने आमच्या महिला भटांना दानधर्म करतायत. अस्तित्वात नसणाऱ्या चमत्कारावर, पाखंडी लोकांवर, शुभ अशुभावर, शकुन अपशकुनावर प्रचंड विश्वास ठेवतायत. हीच कमजोरी भोंदू लोकांचे पैसे मिळवण्याचे साधन आहे.
पृथ्वीपासून 3 लाख 84 हजार किलोमीटर असणारा चंद्र पाहिल्याशिवाय संकष्टी सोडत नाहीत. कुंभमेळ्याचं तीर्थ (53% सांडपाणी, मूत्र आणि 47% पाणी) देव्हाऱ्यात पूजल्याशिवाय त्यांना शांतता मिळत नाही. सोळा सोमवार, पांढरे बुधवार, शुक्रवारचे वैभवलक्ष्मी व्रत, अनवाणी नवरात्री व्रत, केल्याशिवाय यांना चैन पडत नाही. कर्ज काढून सत्यनारायण घालताना मुलाच्या शाळेची फी भरली नाहीय हेही विसरून जातात. गाडगे बाबा तुकडोजी महाराज, महात्मा फुले तुकाराम महाराज यांनी अंधश्रद्धेला कडाडून विरोध केला. तंत्रज्ञानानेही आत्मा नावाच्या कल्पनेला कधीच शह दिलाय
पेशवाई बुडल्यावर स्वतःच्या दक्षिणेची सोय करण्यासाठी भटांनी पोथ्या निर्माण करून अज्ञानी, गोरगरीब लोकांना लुबाडण्याचा धंदा उभारलाय.
आर्थिक असहाय्यतेणे ग्रासलेले लोक देव आपल्या मदतीला येईल या कल्पनाविश्वात रमतात.
खरच वैचारिक आधुनिकतेचा समाजाला स्पर्श झालाय का असा प्रश्न पडतो…?
जग फार पुढे गेलंय असं म्हटलं जातंय पण महिलांसाठी केलेली कुंपण सगळीकडे दिसतात. धर्माच्या नावाखाली महिलांचे शोषण होताना दिसतंय. जुन्या मूल्यांची, रितीरिवाजांची पडझड होतेय पण नव्या विचारांची महिलांना धास्ती वाटतेय. यासाठी स्त्री वर्गामध्ये जागृती निर्माण करणे गरजेचे आहे. पुरोगामी विचारांचा झेंडा मिरवणाऱ्यांनी आधी समाज प्रबोधनासाठी धाडशी पाऊल उचलले पाहिजे.
प्रसार माध्यमांचा वापर करून अंधश्रद्धेचा भडिमार केला जातोय. वास्तुशास्त्राचे फॅड सध्या जोर धरू लागलेय. भरमसाठ फी घेऊन जोरात धंदा चाललाय.
एकीकडे विज्ञानवादी, पुरोगामीत्वाच्या गप्पा मारतात आणि दुसरीकडे देवीला कोंबडा कापून नवस फेडतात. अर्थातच जोतिशी हिंदुत्ववादी संघटना नकळतपणे त्यांच्या पाठीशी असतात. आणि यामुळेच समाज व्यवस्था खिळखिळी होत चाललीय.
अंधश्रद्धेच्या गर्तेत खितपत राहण्यापेक्षा विज्ञानवादी दृष्टीकोन स्वीकारला पाहिजे.
पुरावा असेल तरच विश्वास ठेवू अशी भूमिका घेतली पाहिजे.
क्रांतिकारी संत तुकाराम महाराज म्हणतात
नका दंतकथा येथे सांगो कोणी,
कोरडे ते मानी बोल कोण
अनुभव येथे पाहिजे साचार,
न चलती चार आम्हापुढे
मुखे सांगे ब्रम्हज्ञान,
जण लोकांची कापीतो मान,
कथा करितो देवाची,
अंतरी आशा बहु लोभाची,
तुका म्हणे तोची वेडा,
त्याचे हाणुनी थोबाड फोडा…
तर्क अनुमान, प्रचिती याचा कस लावून सत्य स्वीकारले पाहिजे. जोपर्यंत वैज्ञानिक दृष्टी येत नाही तोपर्यंत माणूस परंपरावादी राहतो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही किल्यावर सत्यनारायण, होम पूजा घातल्याची नोंद नाही, तरीही चारशे वर्षांनंतर गडकिल्ले आजही सुरक्षित आहेत मोहिमेवर जाताना मुहूर्त पाहिल्याचाही उल्लेख नाही.
२० डिसेंबर २०१३ रोजी जादूटोणा विरोधी कायदा विधिमंडळात संमत झालाय. पण हे आमच्या किती लोकांना माहितीय. आजही योग्य प्रकारचं शिक्षण, विज्ञानाची प्रगती, चौकसपणा, वाचनाचा अभाव, यापासून ग्रामीण भागातील महिला वंचीतच राहिलेत. सत्य शोधण्याचं कुतूहल त्यांच्यात दिसत नाही. यासाठी कायद्याचा प्रचार, जनजागृती, आणि अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. वैज्ञानिक माणूस विवेकी असतो, तो कोणतीही जबाबदारी स्वीकारायला तयार असतो. देवावर विसंबून रहात नाही.
संविधानाच्या कलम 51 अ नुसार वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे.
हा विज्ञानवादी विचार महाराष्ट्रातील शेवटच्या माणसांपर्यंत पोहीचला पाहिजे तरच अंधश्रद्धा, कर्मकांडे कमी होतील.
संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
5 मार्च 2022.