गडचांदूर (अशोककुमार भगत)
राज्यात शिवसेना – कांग्रेस – राष्ट्रवादी अशी आघाडी असताना गडचांदूर नगर परिषदेत माञ कांग्रेस – राष्ट्रवादी ची आजतागायत सत्ता होती. तथापि, दोन दिवसापूर्वी पार पडलेल्या विविध सभापतींच्या निवडणुकीत काँग्रेस -राष्ट्रवादी पक्षाने शिवसेनेला सभापती चे एक पद दिल्याने आता गडचांदूरात ही राज्यातील महाविकास आघाडी अस्तित्वात आल्याचे मानले जात आहे.
सुमारे दोन वर्षांपूर्वी गडचांदूर नगरपरिषदेची निवडणूक पार पडली. यामध्ये कांग्रेस ला पाच, राष्ट्रवादी काँग्रेस ला चार शिवसेनेला पाच, भाजपाला दोन, व शेतकरी संघटनेला एक असे सतरा नगरसेवक निवडुन आलेत. खुले अध्यक्षपद असल्याने कांग्रेस च्या महिला उमेदवार निवडून आल्यात.
पहिल्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष राष्ट्रवादी आणि इतर सभापती पदे कांग्रेस व राष्ट्रवादी ने आपल्या कडे ठेवलीत. राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात असताना सुद्धा शिवसेनेने या कडे पाठ फिरवल्याने कांग्रेस – राष्ट्रवादी ने सुमारे दोन वर्ष ही सत्ता उपभोगली.
दरम्यान अलीकडेच पार पडलेल्या सभापती च्या निवडणुकीत शिवसेना ही कांग्रेस – राष्ट्रवादी च्या येथील सतेत सहभागी झाल्याने एक सभापती पद मिळविण्यास यश मिळाले. गडचांदूर नगरपरिषदेतील शिवसेनेचे गटनेते सागर ठाकूरवार यांनी थेट कांग्रेस – राष्ट्रवादी शी हात मिळवणी करुन राज्याप्रमाणे गडचांदूरात ही महाविकास आघाडी अस्तित्वात आणली. यामध्ये काँग्रेसचे गटनेते विक्रम येरने यांची भूमिका मोलाची ठरलीय. परिणामी, एक सभापती पद शिवसेनेला मिळाले.
दोन दिवसापूर्वी पार पडलेल्या या सभापती च्या निवडणुकीत अरविंद मेश्राम (कांग्रेस) यांना बांधकाम, नियोजन व वित्त, तर अश्विनी कांबळे (राष्ट्रवादी) यांना आरोग्य व स्वच्छता विभाग मिळाला. शिवसेनेच्या किरण अहिरकर यांना महिला व बालकल्याण सभापती तर राष्ट्रवादी च्या कल्पना अरुण निमजे यांची उपसभापती पदी निवड करण्यात आली.
उल्लेखनीय असे कि, येथील कांग्रेस चे आमदार सुभाष धोटे यांच्या दूरदृष्टीने शिवसेनेला महाआघाडीत सहभागी करण्यात यश मिळाल्याचे मानले जात आहे.
राजुरा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ची सुरुवातीपासूनच युती असुन आता शिवसेना ही पालीकेत सहभागी झाल्याने खऱ्या अर्थाने गडचांदूरात महाविकास आघाडी अस्तित्वात आल्याचे दिसून येत आहे.