लोकदर्शन ÷ अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३
उन्हाळ्याचे दिवस चालू असतात. भर दुपारी उन्हाचा कडाका अंगाची लाहीलाही करत असतो. जमीन अगदी चटके बसतील, अशी तापलेली व हवा अजिबात पडलेली. झाडाचे तर पानही हलत नाही आणि बघता बघता लांबवर कुठेतरी जमिनीवरची पडलेली पाने वाऱ्याने गोलगोल भिरभिरताना दिसू लागतात. बघता बघता तीच पाने उंचावर उचलली जातात. त्यांच्याबरोबरच धुळीचा लोटही उफाळताना, गरगरताना दिसतो. काही सेकंदातच वाऱ्याची वावटळ आपल्यालाही घेरून टाकते. हेलकावणारी झाडे, वाऱ्याचा सोसाट्याचा आवाज, नाकातोंडात जाणारी धूळमाती यांमुळे सारेच कसे भीषण वाटत असते. ही असते चक्रीवादळाची सुरुवात.
चक्रीवादळ म्हणजे वातावरणातील एखाद्या विवक्षित ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या काही मैलांच्या परिसरापेक्षा कमी अथवा जास्त झाल्याने दिसून येणारे वातावरणातील बदल. हे बदल फार मोठ्या वेगाने घडतात, त्यात वाऱ्याची फार मोठी ताकद सामावलेली असते. त्या विवक्षित ठिकाणी हवेचा दाब कमी होतो वाह वाढतो. तो चक्रीवादळाचा केंद्रबिंदूच असतो. दाब कमी झाल्यास तेथील हवेची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न म्हणून वातावरणातील हवेत एक प्रकारचे भोवरे तयार होतात. याउलट दाब वाढला असल्यास त्या पट्टय़ातील हवा दाबामुळे केंद्राकडे खाली दाबली जात असते. याही क्रियेमध्ये वारे वाहणे वेगाने सुरू होते, पण त्यांची तीव्रता खूपच कमी असते. बहुतेक चक्रीवादळांचा केंद्रबिंदू समुद्रावरच सुरू होतो. कसलाही अडथळा वाटेत नसल्याने हे वादळ स्वतःभोवती फिरत वेगाने घोंगावत इकडे तिकडे हेलकावत राहते. पण समुद्री वार्यांमुळे हलके हलके जमिनीकडे येऊ लागते. सुरुवातीला जमिनीवरचा मोठा पट्टा त्यामुळे त्याच्या तडाख्यात सापडतो, पण त्याचबरोबर त्याचा वेग हळूहळू कमी होत पसरत जातो व काही काळाने ते संपूनही जाते. समुद्रपातळीपेक्षा जमिनीची वाढलेली उंची, वाटेत येणारे अडथळे व जमिनीवरील बरेचसे स्थिर तापमान यांमुळे या चक्रीवादळांचा वेग मंदावतो.
चक्रीवादळ बहुधा स्वतःबरोबर सोसाटयाचा पाऊसही आणते. खूप मोठ्या आकारमानात हे पसरलेले असल्याने (चारशे ते सहाशे किलोमीटर) या सर्व भागातील निरनिराळे ढग यात ओढले गेलेले असतात. या ढगांचे एकत्रीकरण होताच त्यातील बाष्पही एकत्र येऊन त्यापासून पाऊस पडेल, असे मोठे बाष्पकण तयार होतात. सुरुवातीला प्रचंड वेगाने वाहणारे वारे, धुळीचे वातावरण व नंतरच्या पावसाचे तडाखे ही चक्रीवादळाची खासियतच म्हणायला हवी. चक्रीवादळांचा वेग जमिनीवर पोहोचल्यावर अनेकदा ताशी साठ ते ऐंशी किलोमीटर इतका असतो. समुद्रावरील वेग मोजण्याची पद्धत नाही, पण तो कदाचित यापेक्षाही जास्त असू शकतो.
समुद्रावरील बोटी या वादळात सापडल्यास अनेकदा त्यांचे गंभीर नुकसान होण्याइतका त्यांना तडाखा बसलेला असतो. वादळाचा पट्टा ओलांडण्यास त्यांना एक ते चार दिवस लागत असल्याने तोवर राक्षसी लाटांचे तांडव असहाय्यपणे बघणे एवढेच त्यांच्या हातात असते. अनेकदा या लाटांची उंची तीस ते पस्तीस फुटांपर्यंतही असू शकते. ही वादळे सागरी अपघात व दुर्घटना यांचे एक मुख्य कारण असल्याने या वादळी टापूंची सतत माहिती घेऊन त्याप्रमाणे मार्ग आखणे, बदलणे बोटीच्या कप्तानाने कामच राहते. किनाऱ्यावर जेव्हा ही वादळे येतात, तेव्हा उंच झाडे उन्मळून पडणे, सागरी लाटा खोलवर घुसून त्यामुळे नुकसान होणे, घरांचे पत्रे उडणे या गोष्टी होतात.
चक्रीवादळांची सूचना हल्ली उपग्रहांमुळे खूपच लवकर मिळू शकते. उपग्रहांमधून या सर्व वादळांचा नेमका प्रवास, हवेतील घडत जाणारे बदल यांचे फोटो मिळतात. या खेरीच एक मोठी विलक्षण पद्धत चक्रीवादळांच्या अभ्यासासाठी गेली २० वर्षे वापरली जात आहे. अत्यंत धोकादायक अशा पद्धतीत लष्करी जेट विमानातून संशोधक या चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूकडेच प्रवास सुरू करतात. थेट केंद्रबिंदूचा वेध घेऊन विमान वर न्यावयाचे व त्या दरम्यान विविध शास्त्रीय निरीक्षणे करायची, अशी ही पद्धत आहे. निष्णात वैमानिक व जिवावर उदार झालेले संशोधक यांचा चमू हे काम करतो. या प्रकारात विमान पार वेडेवाकडे होऊन दोन तीन हजार फूट लांबवर एखाद्या खेळण्याप्रमाणे भिरकावलेही गेले आहे. तरीही सुखरूप उतरल्यावर नवीन चक्रीवादळाची सूचना कधी मिळते, इकडेच या चमूचे लक्ष असते.
धाडस व जिज्ञासा यांचा संगम काय करू शकतो, याचे हे एक थरारक उदाहरण आहे.
संकलन व संकल्पना
अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३
साभार
*’सृष्टी विज्ञानगाथा’ या पुस्तकातून*