लोकदर्शन👉संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
आज 24 फेब्रुवारी.
जेष्ठ अभिनेत्री ललिता पवार यांच्या स्मृतिदिनानिमि
*☝️ललिता पवार यांचा जीवनप्रवास*
चित्रपटसृष्टीच्या चंदेरी दुनियेची सर्वांनाच भुरळ पडते. ह्या दुनियेने अनेकांना प्रसिद्धी दिली. अनेकांना “सुपरस्टार” बनवले. झगमगत्या ह्या चित्रपटसृष्टीने अनेक दिग्गज कलाकारांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवले.
प्रेक्षकांना अनेक अशा कलाकारांची भुरळ पडते. नायक, नायिका ह्यांच्याबरोबरच खलनायक, खलनायिका ह्यांनादेखील प्रसिद्धी मिळाली!
पण काही खलनायक खलनायिका इतक्या समरसून त्यांची भूमिका करतात की प्रेक्षक चक्क त्यांचा तिरस्कार करतात, त्यांचा राग राग करतात.
अशी अनेक नावं आहेत ह्या चित्रपटसृष्टीत की ती प्रसिद्धीस तर आली पण नकारात्मक भूमिकेमुळे लोकं त्यांना शिव्या शाप देतात.
अगदी पूर्वीच्या चित्रपटांपासून आत्ता पर्यंत काही खलनायक किंवा खलनायिका देखील असे भारी आहेत की लोक त्यांचा पार उद्धार करतात.
के. एन्. सिंग, प्राण, अमजद खान, प्रेम चोप्रा, रणजीत, अमरीश पुरी, अजित ह्या खलनायकांना कधीच विसरू शकणार नाहीत प्रेक्षक.
हे खलनायक तर दमदार आहेतच पण, खलनायिका देखील काही कमी नाहीत ह्या सृष्टीत.
बबिता, अरूणा इराणी, बिंदू, हेलन ही नावे उच्चारली की डोळ्यांसमोर येतात त्यांची रूपं, खलनायिका म्हणून त्यांचा डौल, त्यांची भेदक नजर!
पण ह्यामध्ये सगळ्यात जास्त दमदार आणि लोकांनी खूप तिरस्कार केला अशी खलनायिका म्हणजे “ललिता पवार”! त्यांच्या नुसत्या नजरेनेच समोरच्याला जरब बसे!
त्यांचा अभिनय हा कधी अभिनय वाटलाच नाही. समरसून केलेली खलनायिकेची भूमिका त्यांना प्रेक्षकांचा रागच देऊन गेली.
ललिता पवार ह्यांचा जन्म १८ एप्रिल १९१६ रोजी नाशिक येथे झाला. वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी अभिनयाला सुरुवात केली!
सुरुवातीला मराठी चित्रपट सृष्टीत काम करणार्या ललिता पवार ह्यांनी अनेक मराठी चित्रपट केले. नेताजी पालकर, संत गोरा कुंभार, संत दामाजी, अमृत इत्यादी अनेक मराठी यशस्वी चित्रपटांमध्ये ह्यांनी काम केलं.
दूरदर्शनवर आता पुनर्प्रसारित होणाऱ्या सुप्रसिद्ध रामायण ह्या मालिकेत त्यांनी मंथरेची भूमिका केली होती.
एकदा त्या त्यांच्या वडिलांबरोबर पुण्याला गेल्या असता तिकडे एका फिल्मचं शूटिंग बघायला गेल्या.
तिकडे निर्देशक नाना साहेब ह्यांनी त्यांना पाहिले आणि बाल भूमिकेसाठी त्यांना विचारलं पण ललिता पवार ह्यांचे वडील ऐकतच नव्हते, मुलींच्या शिक्षाणाची बोंब त्या काळात चित्रपटात काय पाठवणार?
तरीही खूप आग्रह झाल्यावर त्यांनी ललिता ह्यांना चित्रपटात काम करण्यास परवानगी दिली.
१९२७ मध्ये आलेला त्यांचा प्रथम चित्रपट पतितोद्धार हा मूकपट होता. पहिला बोलपट हिम्मत-ए-मर्दा! त्यात त्यांनी गीतही गायले होते. “नील आभा में प्यारा गुलाब रहे” हे गाणॆ खूपच लोकप्रिय झाले होते त्या काळात.
त्यानंतर हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये प्रयोग आणि थ्रिलर फिल्म बनवण्यास सुरुवात झाली होती.
तोपर्यंत स्त्रिया चित्रपटात काम करू लागल्या होत्या, त्यामुळे हे चित्रपट थोडे काळाच्या पुढे, ‘बोल्ड’ होऊ लागले होते.
१९३२ मध्ये आलेला मस्तीखोर माशूक और भवानी तलवार, १९३३ मध्ये प्यारी कटार आणि १९३५ मध्ये कातिल कटार ही अशाच चित्रपटांची उदाहरणे आहेत. ह्याशिवाय पौराणिक चित्रपटातही त्यांनी काम केले.
नंतर आला दैवी खजाना ज्यात त्यांनी स्विमिंग सूट घालून शूट केलं होतं, पण ह्या गोष्टीचं त्यावेळी एव्हढं कोणी काही वाटून घेतलं नाही, जास्त हंगामा झाला नव्हता तेव्हा!
कारण चित्रपटात काम करणाऱ्या स्त्रियांना त्यावेळी वेगळेच मानले जाई.
त्यावेळी त्यांनी अजूनही १ असंभव वाटणारी गोष्ट केली होती, ती म्हणजे “पतिभक्ति” ह्या चित्रपटात त्यांनी किसिंग सीन केले होते. तेव्हा त्यांनी हे कसे केले हे कल्पनातीत आहे.
ह्याशिवाय त्यांनी ऍक्शन फिल्म मध्येही स्टंट केले होते. “दिलेर जिगर “ हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.
आज काल स्त्रियांनी चित्रपट प्रोड्युस केला तर लोकं (मिडिया वगैरे) त्यांचं खूप कौतुक करतात, पण ललिता पवार ह्यांनी त्या काळात “कैलाश” नावाचा चित्रपट प्रोड्युस केला होता!
ज्यात त्यांनी तीन रोल केले होते. ह्याशिवाय टॉलस्टॉय ह्यांच्या कादंबरीवर आधारित ‘दुनिया क्या है’ हा चित्रपटही निर्देशित केला होता.
ह्याशिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे “चतुर सुंदरी” ह्या चित्रपटात त्यांनी चक्क १७ रोल केलेत! तेव्हा हे असे रोल म्हणजे खरोखर अद्भूत गोष्ट आहे.
सगळं काही मस्त चाललं होतं. ललिता पवार ह्यांच्या फिल्मी करिअरचा आलेख वर वर चढत होता.
पण, १९४२ साली ‘जंग-ए-आज़ादी” ह्या चित्रपटाचं शूटिंग चालू असताना एक असा सीन होता की भगवान दादा ललिता पवार ह्यांच्या श्रीमुखात लगावतात.
हा सीन म्हणावा तसा जमत नव्हता, त्यावेळी जास्त रिटेक घेणे परवडणारे नव्हते. भगवान दादा काही खऱ्यासारखा सीन देत नव्हते, खरोखरच श्रीमुखात भडकावणे हे त्यांना काही पटत नव्हते!
खूप वेळ असा गोंधळ झाल्यावर शेवटी दादांनी लगावून दिली ललिता पवार ह्यांना! पण ही थप्पड इतकी जोरात होती त्या जागीच बेशुद्ध झाल्या आणि त्यांच्या कानातून रक्तस्राव सुरू झाला!
डॉक्टरांच्या ट्रीटमेंटने त्यांच्या शरीरावर परिणाम झाला, त्यांना अर्धांग वायुचा झटका आला, त्यातंच त्यांचा एक डोळा बारिक झाला.
पण, त्यांनी हार मानली नाही. “शो मस्ट गो ऑन” ह्या परंपरेला जागून त्यांनी दमदार पुनरागमन केले.
परंतु, त्यांना आता नायिकेच्या भूमिका न मिळता खलनायिकेच्या, खाष्ट सासूच्या भूमिका मिळू लागल्या होत्या.
१९५५ मध्ये त्यांनी राज कपूरच्या श्री ४२० मध्ये कोमल मनाच्या स्त्रिची भूमिका केली जी खूप गाजली.
त्यानंतर हृषीकेश मुखर्जींच्या अनाडी चित्रपटात त्यांनी एका वरून कठोर पण आतून प्रेमळ असणार्या मिसेस डिसोज़ा असा रोल केला होता ज्याला बेस्ट सपोर्टिंग ऍक्ट्रेस चा पुरस्कार मिळाला.
त्यानंतर त्यांनी शम्मी कपूर अभिनीत प्रोफेसर ह्या चित्रपटात विनोदी भूमिका केली होती.
ललिता पवार ह्यांच्या आयुष्यात असाच एक विचित्र, कल्पनातीत प्रसंग घडला ज्यामुळे त्यांना जातीचे प्रमाणपत्र काढावे लागले.
तो प्रसंग म्हणजे असा, की १९४१ मध्ये वि.स.खांडेकर ह्यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपट “अमृत” आला ज्यामध्ये ललिता पवार ह्यांनी चांभाराची भूमिका केली होती.
अर्थातच ही भूमिकादेखील त्यांनी सहजतेने, समरसून केली! त्याचा परिणाम काय झाला? तर भूमिका अपेक्षेप्रमाणे खूप गाजली!
*त्या काळी स्पृश्यास्पृश्यतेचा भेदाभेद कमी झाला असला तरी ललिता पवार ह्यांना अस्पृश्यतेसारखी वागणूक मिळू लागली. हे सगळं टाळण्यासाठी त्यांनी जातीचे प्रमाणपत्र काढले.*
*एखाद्या कलाकारासाठी ही खूपच अपमानास्पद आणि खेदाची गोष्ट आहे. पण ही भूमिकेला दादही म्हणता येईल! नाही का?*
*आयुष्यभर संघर्ष करून शेवटीही ललिता पवार ह्यांना तोंडाच्या कॅन्सरला तोंड द्यावे लागले. २४ फ़ेब्रुवारी १९९८ रोजी पुण्यातल्या त्यांच्या आरोही ह्या बंगल्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.*
संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973.