By 👉 Shankar Tadas
१८७० / १९५० / आज
भारतात ज्या संंग्रहालयाच्या स्थापनेला १५० पेक्षा जास्त वर्षे पूर्ण केली आहेत, अशा मोठ्या १० संग्रहालयात ‘मध्यवर्ती संग्रहालय, नागपूरचा” चौथा क्रमांक ला गतो.
हे संग्रहालय २०२२ मध्ये १५९ वर्षे पूर्ण करीत आहे. या संग्रहालयाची स्थापना सन १८६३ रोजी झाली होती व हे महाराष्ट्रातील सर्वात जुने संग्रहालय आहे.महाराष्ट्रात सुमारे ७० ते ७५ संग्रहालये आहेत. त्यापैकी १३ संग्रहालये ही महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालये यांच्या अधिपत्याखाली आहेत. या सर्व संग्रहालयामध्ये ‘मध्यवर्ती संग्रहालय’ नागपूर हे सर्वात जुने संंग्रहालय आहे. या संग्रहालयाच्या स्थापनेची पहिली बैठक २७ ऑक्टोबर १८६२ साली झाली.
या संग्रहालयाच्या इमारतीचा नकाशा कॅप्टन कोब यांनी तयार केला. तत्कालीन नगरपालिकेने या संग्रहालयाच्या इमारतीकरिता आर्थिक तरतूद केली. सर रिचर्ड टेम्पल हे नागपूर प्रांताचे आयुक्त असताना सन १८६३ मध्ये संग्रहालयाची स्थापना झाली.
सन १८६३ पासून आजपर्यंतच्या दीडशेपेक्षा अधिक वर्षांच्या कार्यकाळात मध्यवर्ती संग्रहालयात अनेक बदल झाल्याचे दिसून येते.
भारतातील जुन्या संग्रहालयापैकी एक असल्याने या संग्रहालयात विविध प्रकारचे पुरावशेष, शिल्पे, चित्रे, स्टफ प्राणी इत्यादी संग्रहित आहेत व त्यांच्या आधारावरच संग्रहालयाच्या विविध दालनाची रचना करण्यात आली आहे. सद्यस्थितीत मध्यवर्ती संग्रहालयात निसर्ग विज्ञान, पाषाणशिल्प, शस्त्र, पुरातत्त्व, आदिवासी कला व संस्कृती इत्यादी दालनात संबंधित विषयाच्या वस्तू प्रदर्शित केलेल्या आहेत